
रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल आणि त्यांच्या सर्वांत पहिल्या सुपरहिट, संस्मरणीय ‘लव्ह स्टोरी’ या सिनेमाविषयी.. मला आठवतेय, हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा मी १५ वर्षांचा होतो; पण तो मला खूप आवडला होता. सिनेमाच्या पडद्यावर पहिल्यांदाच नवतारुण्यातील आगळी प्रेमकहाणी पाहायला मिळाली होता. यातील सगळी गाणी सुपरहिट होती. कुमार गौरवची तर अशी क्रेझ बनली होती की प्रत्येक मुलगी जणू स्वप्नात त्यालाच पाहात होती. माझे नशीब म्हणजे मला रवैलजींसोबत काम करण्याची संधी मिळाली. गेल्या ३५ वर्षांपासून त्यांच्याशी माझा ऋणानुबंध आहे. या काळात मी त्यांच्याकडून खूप सारे किस्से ऐकले आहेत. आज मी तुम्हाला ‘लव्ह स्टोरी’शी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहे.
या सिनेमातील हिट गाण्यांपैकी एक म्हणजे.. ‘तेरी याद आ रही है..’ राहुलजींनी मला सांगितले होते… आर. डी. बर्मन यांनी या गाण्याची चाल निश्चित केली आणि आनंद बक्षींसोबत बसून गाण्याच्या ओळी तसेच बोल निश्चित करण्यात आले. विजयता पंडितवर चित्रीत होणाऱ्या लताजींच्या ओळी कोणत्या आणि कुमार गौरववर चित्रीत होणाऱ्या अमितकुमारच्या ओळी कोणत्या, हेही ठरले. मग मी शूटिंगसाठी काश्मीरला गेलो. रेकॉर्डिंगच्या वेळी मी नव्हतो, पण निर्माते राजेंद्रकुमार मात्र उपस्थित होते. गाणे रेकॉर्डिंग होऊन माझ्याकडे आल्यावर ते ऐकून मी आश्चर्यचकित झालो. कारण ते पूर्णपणे उलट रेकॉर्ड झाले होते. अमितकुमारसाठी फायनल केलेल्या ओळी लताजींच्या आवाजात होत्या आणि लताजींसाठीच्या ओळी अमितकुमारच्या आवाजात होत्या. मला वाटले, कदाचित चुकून असे घडले असावे. पण, चौकशी केल्यावर कळले की, कोणत्या ओळी कुमार गौरवला आणि कोणत्या विजयता पंडितला द्यायच्या, हा बदल राजेंद्रकुमारजींनी केला होता. पण, मी ज्या ज्या ओळी ज्यांच्यासाठी फायनल केल्या होत्या, त्याप्रमाणेच त्या चित्रीत केल्या. शूटिंगच्या वेळी विजयता पंडितला मी अमितकुमारचा प्लेबॅक दिला आणि लताजींचा प्लेबॅक कुमार गौरवला दिला. नंतर या गाण्याचे एडिटिंग पाहताना खूप मजा आली, कारण त्यात अमितकुमारचा प्लेबॅक विजयता पंडितच्या वेळी आणि लताजींचा प्लेबॅक कुमार गौरवच्या वेळी ऐकू येत होता. पुढे लताजी आणि अमितकुमार यांच्या ओरिजनल ओळी त्यांच्या आवाजात डब करुन फिल्मसोबत जोडण्यात आल्या.. असो.
सिनेमा पूर्णत्वाला आला असताना काही क्रिएटिव्ह गोष्टींवरुन राजेंद्रकुमार आणि राहुलजींमध्ये मतभेद झाले. सिनेमा तयार झाल्यावर त्याचे पहिले पोस्टर बनवण्यात आले. राहुलजींनी ते पाहिले तर त्यावर लिहिले होते, ‘राजेंद्रकुमार्स लव्ह स्टोरी’ आणि त्यावर दिग्दर्शक म्हणून राहुलजींचे नावच नव्हते. त्यामुळे राहुलजींना खूप वाईट वाटले. खरे तर राजेंद्रकुमार आणि राहुलजींचे लहानपणापासूनचे संबंध होते. राजेंद्रकुमारांनी पूर्वी राहुलजींचे वडील एच. एस. रवैल यांचे सहायक म्हणून काम केले होते. त्यामुळे राहुलजींनी राजेंद्रजींना सांगितले की, तुम्ही पोस्टरवर माझे नाव दिले नाही, त्यामुळे सिनेमातही ते देऊ नका. राहुलजींनी दिलेल्या माहितीनुसार, राजकपूर साहेबांनी त्यांना सांगितले होते की, सिनेमा खूप चांगला बनल्यामुळे दिग्दर्शक म्हणूनही आपले नाव देण्याची राजेंद्रकुमार यांची इच्छा होती. त्यानंतर मग राहुलजींनी कोर्टात धाव घेतली आणि विद्या सिन्हा, अमजद खान, डॅनी, अरुणा इराणी या कलाकारांची प्रतिज्ञापत्रे सादर केली. शेवटच्या दृश्यापर्यंत हा संपूर्ण सिनेमा राहुल रवैल यांनीच बनवल्याचे या सगळ्यांनी सांगितले. त्यावर कोर्टाने निर्णय दिला की, हा सिनेमा राहुल रवैल यांनी बनवला असल्याने आपले नाव द्यावे की देऊ नये, हा त्यांच्या इच्छेचा विषय आहे. परंतु, दिग्दर्शकाच्या जागी अन्य कुणाचे नाव देता येणार नाही. मला वाटते, हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या इतिहासातील हा असा पहिला सिनेमा असेल, जो इतके प्रचंड यश मिळवून ब्लॉक बस्टर ठरला, पण त्यात दिग्दर्शकाचे नाव मात्र दिसत नाही. तथापि, हा सिनेमा राहुल रवैल यांनी दिग्दर्शित केला असल्याचे साऱ्या इंडस्ट्रीला माहीत आहे.
मला राहुलजींच्या बाबतीत घडलेली आणखी एक घटना आठवतेय. राहुलजींचा थोरला मुलगा भरत हा मोठा फोटोग्राफर आहे. दुसरा मुलगा शिव रवैल याने ‘रेल्वे मॅन’ ही वेब सिरीज दिग्दर्शित केली आहे. राहुलजींना ही मुले झाली तेव्हा त्यांच्या जन्माच्या दाखल्यावरील रिलीजन (धर्म) या रकान्यात त्यांनी ‘इंडियन’ असे लिहिले. तेव्हा तिथल्या अधिकाऱ्याने त्यांना तसे लिहिण्यास मनाई केली आणि या रकान्यात तुमचा धर्म लिहावा लागेल, असे सांगितले. राहुलजी म्हणाले, ‘मी हिंदुस्तानी आहे, माझा धर्म इंडियन आहे, तुम्हाला तसे लिहावेच लागेल.’
राहुलजींनी त्या अधिकाऱ्याला एक लेखी नोटिस पाठवली आणि अखेर त्यालाही ते मान्य करावे लागले. शिव आणि भरत यांच्या जन्माच्या दाखल्यावर धर्माच्या रकान्यात ‘इंडियन’ लिहिले आहे. राहुलजींनी याविषयी मला सांगिल्यावर माझ्या मनातील त्यांच्या विषयीचा आदर दुणावला. या गोष्टीवरुन मला नवाज देवबंदी यांचे दोन शेर आठवताहेत…
रोशनी का कुछ न कुछ
इमकान होना चाहिए
बंद कमरे में भी
रोशदान होना चाहिए।
माथे पे आप के चाहे
कुछ भी लिखा हो
सीने पे मगर
हिंदोस्तान होना चाहिए।
उद्या, म्हणजे ७ एप्रिलला राहुलजींचा वाढदिवस आहे. माझ्याकडून, प्रत्येकाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा! ज्या गाण्याचा किस्सा मी नुकताच तुम्हाला सांगितला, ते ‘लव्ह स्टोरी’मधील गाणे आज राहुलजींसाठी ऐकूया…
याद आ रही है,
तेरी याद आ रही है…
स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.