माझ्या हिश्श्याचे किस्सेः जेव्हा किशोरदांची ती दुआ कामी आली…: आजच्याच दिवशी 13 ऑक्टोबर 1987 ला किशोरकुमार यांचे निधन झाले होते

0
16
माझ्या हिश्श्याचे किस्सेः जेव्हा किशोरदांची ती दुआ कामी आली…:  आजच्याच दिवशी 13 ऑक्टोबर 1987 ला किशोरकुमार यांचे निधन झाले होते


रूमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आज १३ ऑक्टोबर आहे, याच दिवशी ३७ वर्षांपूर्वी म्हणजेच १३ ऑक्टोबर १९८७ ला किशोरकुमार आपल्या सर्वांना सोडून गेले. त्यामुळे आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये किशोरकुमार यांच्याबद्दल सांगणार आहे. मी त्या मोजक्या नशीबवान लोकांपैकी एक आहे, ज्यांनी किशोरकुमार यांना फक्त पाहिलेच नाही, तर त्यांना गाणे गाताना आणि ते रेकॉर्ड करतानाही पाहिले आहे. माझ्यासाठी तो अविस्मरणीय किस्सा आहे. ही १९८६ ची गोष्ट आहे. तेव्हा मी पंजाब मेलने भोपाळहून मुंबईला येत होतो. मी रिझर्वेशन केले नव्हते, कारण मला घरच्यांपासून दूर जायची इच्छा नसायची. म्हणून मग मी दररोज एक एक दिवस पुढे ढकलायचो. असो. मला ऐनवेळी ट्रेनमध्येही रिझर्वेशन मिळेल, याची खात्री होती. कारण त्यावेळी भोपाळचे अनेक हॉकीपटू रेल्वेच्या सेवेत होते. ते टीसीला सांगायचे आणि टीसी माझे रिझर्व्हेशन करून द्यायचे. तर डब्यात चढल्यावर टीसी मला म्हणाले, ‘बर्थ नंबर १० वर बस, मी स्लिप नंतर देतो.’ मी बर्थ नंबर १० वर बसलो.

माझ्या शेजारी एक पोलिस इन्स्पेक्टर बसले होते. ते लाच न देता रिझर्वेशन मिळवण्याचा प्रयत्न करत होते. टीसी त्यांना बर्थ देत नव्हता. ते अडून बसले. म्हणाले, ‘तुम्ही मला बर्थ दिला नाही, तर कोणालाही द्यायचा नाही.’ खूप वाद झाला आणि त्यामुळे टीसीने मला बर्थही दिला नाही. बरं, त्या काळात लोकांचा कोणावर फारसा संशय नसायचा. त्यांचा माणसांवर विश्वास असायचा. रिझर्वेशन नसले, तरी मला डब्यातून बाहेर जायला कुणी सांगितलं नाही. मी बसून राहिलो. रात्र झाली तेव्हा सगळे झोपण्याच्या तयारीला लागले. मी माझी हॅन्डबॅग डोक्याखाली घेतली आणि खाली झोपलो. खंडव्याला अचानक पोलिस ट्रेनमध्ये चढले आणि रिझर्वेशन नसलेल्या सर्वांना बाहेर काढले आणि ट्रेन निघून गेली. आम्ही रिझर्व्हेशन नसलेले जेवढे लोक होतो, त्यांना स्टेशन मास्तरच्या खोलीत घेऊन गेले. तिथे खूप वाद झाले. मग मी म्हणालो, ‘मी विनातिकीट नसताना तुम्ही मला खाली उतरवले. मला जनरल डब्यात बसवून दिले असते, मला मुंबईला पोहोचणे खूप महत्त्वाचे होते.’ असो.

स्टेशन मास्तर खूप सभ्य गृहस्थ होते, ‘ते म्हणाले, आता थोड्या वेळात महानगरी ट्रेन येईल, त्या गाडीने तुम्ही मुंबईला जा.’ डिसंेबर महिना असल्यामुळे स्टेशनवर खूप थंडी होती. मी फलाटावरच्या बाकावर बसला होतो. मला थंडी सहन होत नव्हती. बाजूला काही फकीर गोधडी ओढून झोपलेले दिसले. मी हळूच माझे पाय त्यांच्या गोधडीत टाकले. थंडीपासून थोडा तरी बचाव झाला. मनात विचार आला की, हे तेच खंडवा आहे, जिथे किशोरकुमार यांच्यासारख्या महान कलाकाराचा जन्म झाला. आपल्याला आयुष्यात कधी किशोरकुमारांना प्रत्यक्ष पाहण्याची, ऐकण्याची संधी मिळेल का, या विचारात मी गढून गेलो.

महानगरी एक्स्प्रेस आली. त्या गाडीत बसून मी मुंबईला पोहोचलो. दुसऱ्याच दिवशी माझा मित्र आणि भाऊ हरदेवसिंग साहनी आले. त्यांनी त्यांचा मित्र योगेश गोयल यांच्याशी माझी ओळख करून दिली. त्यावेळी योगेश गोयल गोविंदा आणि मीनाक्षी शेषाद्री यांना घेऊन ‘जानेजाना’ नावाचा सिनेमा करत होते. ते म्हणाले की, ‘मेहबूब’मध्ये माझा सेट उभारला जातोय आणि फिल्म सेंटरमध्ये माझ्या गाण्याचे रेकॉर्डिंग आहे. तुम्हाला पाहायचे असेल तर या. मी फिल्म सेंटरमध्ये पोहोचलो. मी तिथल्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये प्रवेश केला, तेव्हा जणू काही माझ्यासाठी वेळ थांबली होती. माझा माझ्या डोळ्यांवर, कानांवर, मी काय पाहत होतो, काय ऐकत होतो, यावर विश्वासच बसत नव्हता. मी पाहिले की, आर. डी. बर्मन, किशोरकुमार यांच्या गाण्याची तालीम घेत आहेत. माझ्यात हिंमत नव्हती, तरीही मी माझे दोन्ही हात वर करून नमस्कार केला. आर. डी. बर्मन यांची पाठ माझ्याकडे होती. किशोरकुमार साहेबांचा चेहरा माझ्याकडे होता. त्यांनीही इशाऱ्याने नमस्काराचे उत्तर दिले आणि तिथेच थांबून बसायला सांगितले. मी संपूर्ण रेकॉर्डिंग पाहिले आणि गाणे ऐकले.

रेकॉर्डिंग संपल्यावर मी बाहेर आलो. काही वेळाने किशोरकुमार बाहेर आले आणि गाडीत बसू लागले. मी त्यांना सांगितले की, काल रात्री मी खंडव्यामध्ये होतो आणि तुमची भेट व्हावी म्हणून प्रार्थना करत होतो. बघा, आज मी भेटलो. किशोरकुमार माझ्याकडे बघून म्हणाले, ‘घरातून पळून आलाय की आशीर्वाद घेऊन आलाय?’ मी म्हणालो, ‘हो, आशीर्वाद घेऊन आलोय..’ ते उत्तरले, ‘असेच पुढे जात राहा, काहीतरी बनशील.’ एवढं बोलून किशोरकुमार गाडीतून निघून गेले. त्या दिवसाचा प्रत्येक क्षण आणि ती वेळ आजही माझ्या डोळ्यांत ताजी आहे. ते गाणं, त्यांचा आवाज आजही माझ्या कानात घुमतोय. यावरुन मला बशीर बद्र यांचा एक शेर आठवतोय…

न जी भर के देखा न कुछ बात की,

बड़ी आरज़ू थी मुलाक़ात की।

याला ईश्वराची कृपाच म्हटलं पाहिजे की मनापासून जी प्रार्थना केली, ती पूर्ण झाली. त्या रात्री खंडवा स्टेशनवर थंडीने थरथरत असताना माझ्या मनातही विचारांची धग सुरू होती… किशोरकुमारांनी या शहरातून जाऊन आपले नाव कमावले, त्याप्रमाणे आपलेही फिल्म इंडस्ट्रीत कुठे तरी छोटे-मोठे नाव झाले पाहिजे. मग ती वेळ आली, जेव्हा ७ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी १३ ऑक्टोबर २०१७ ला खंडव्यामध्ये ‘किशोरकुमार राष्ट्रीय पुरस्कार’ हा मध्य प्रदेशचा सर्वांत प्रतिष्ठित सन्मान मला मिळाला. मी खंडव्याला पोहोचलो, तेव्हा शहरात सगळीकडे किशोरकुमार यांच्यासोबतचे माझे फोटो लागले होते. मी किशोरदांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्या स्मृतींना वंदन केले. आज किशोरकुमार यांच्या स्मरणार्थ त्यांचे हे गाणं ऐका…

चलते चलते मेरे ये गीत याद रखना..

कभी अलविदा न कहना, कभी अलविदा न कहना…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link