
रूमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक31 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
चित्रपट निर्माता राहुल रवैल यांच्यासमवेत ऋषी कपूर.
- ऋषी कपूर आणि राहुल रवैल यांच्या मैत्रीची गोष्ट
ऋषी कपूर आणि राहुल रवैल यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. एक किस्सा त्यावेळचा आहे, जेव्हा राहुल काही कारणाने ऋषी कपूर यांच्यावर नाराज झाले होते. त्यांना राजी करण्यासाठी ऋषी यांनी काय केले, त्याची ही गोष्ट…
वडीलधारे लोक नेहमी असं सांगतात की, तुम्हाला एखाद्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर त्याच्याकडचे कर्मचारी आणि त्याचे मित्र किती जुने आहेत ते पाहा. चित्रपटसृष्टीतील मैत्रीचे मला दिसलेले अनोखे उदाहरण म्हणजे ऋषी कपूर आणि राहुल रवैल यांच्या जिवलग दोस्तीचे. खरं तर ऋषी कपूर आता या जगात नाहीत, तरीदेखील या दोघांच्या मैत्रीचे आजही उदाहरण दिले जाते.
राहुलजी आणि ऋषी कपूर हे ३३ वर्षांपासूनचे माझेही खूप जवळचे मित्र. सकाळी उठल्याबरोबर एकमेकांना फोन करणे हा राहुल आणि ऋषी कपूर या दोघांचा आयुष्यभराचा दिनक्रमच होता. दोघांच्याही स्वभावात जमीन-अस्मानाचा फरक होता. दोघांचे अनेक गोष्टींवर एकमेकांशी फारसे पटत नसे, काही वेळा त्यांच्यात इतका वाद व्हायचा की, दोघांपैकी एक जण फाेन ठेवून द्यायचा. पण, परस्परविरोधी विचार असूनही त्यांच्या मैत्रीत मात्र कधीही फरक पडला नाही. राहुलजींनी दिग्दर्शनाला सुरुवात केली तेव्हा ‘गुनेहगार’ हा पहिला चित्रपट ऋषी कपूर यांच्यासोबत केला. हा चित्रपट चालला नाही, पण तरीही या दोघांच्या मैत्रीत अंतर आले नाही.
या दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. राहुलजींचा मुलगा भरत याचा साखरपुडा होता, पण ऋषी कपूर येऊ शकले नाहीत. ते गोव्यात डेव्हिड धवन यांच्या ‘चश्मेबद्दूर’च्या चित्रीकरणात व्यग्र होते. बस्स, त्यामुळे राहुलजी नाराज झाले आणि त्यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत बोलणे बंद केले. ऋषी कपूर यांनी खूप प्रयत्न केले. बऱ्याच मित्रांनीदेखील राहुलजींना समजावले, पण त्यांनी ऐकले नाही. आम्ही सगळे जवळचे लोक ऋषी कपूर यांना ‘चिंटूजी’ म्हणायचो. चिंटूजींचा मला फोन आला आणि म्हणाले, “रूमी, तू तुझ्या घरी डिनर पार्टी ठेव. सगळ्या मित्रांना बोलव. राहुल आणि मलाही बोलव. पण, जर राहुलने विचारले की चिंटू येणार आहे का? तर तो नाही म्हणाला, असं सांग.’ असं का करायचं हे विचारल्यावर ते म्हणाले, ‘यार, तो माझ्यावर नाराज आहे. तो तुझ्या घरी येईल तेव्हा समोरासमोर भेट होईल आणि त्याची माफी मागेन. आमचा पॅचअप होऊन जाईल. खूप मिस करतोय मी त्याला..’
मी डिनर पार्टी ठेवली. मला चांगलं आठवतंय, त्या वेळी सगळ्यात आधी ऋषी कपूर आले होते. ते राहुलजींसोबत पुन्हा मैत्री करण्यासाठी खूप आतुर होते. त्यानंतर बोनी कपूर साहेब, टूटू शर्मा, डेव्हिड धवन, साजिद नाडियादवाला, श्रीदेवीजींसह माझे २०-२५ मित्र आले. हॉलबाहेरच्या टेरेसवर आम्ही सगळे गप्पा मारत होतो. जशी डोअर बेल वाजायची, चिंटूजी सगळ्यात आधी वळून मुख्य दरवाजाकडं बघायचे, राहुल तर आला नसेल ना? शेवटी राहुलजी आले. ते जसे आले, तसे चिंटूजी त्यांना आणायला गेले. चिंटूजींना पाहून ते रागाने माझ्या रायटिंग रूममध्ये निघून गेले. चिंटूजी रायटिंग रूममध्ये आले, तर ते दुसऱ्या दाराने बाहेर पडले. नंतर ते बेडरूममध्ये गेले, तर चिंटूजीही तिथं गेले. तिथून राहुलजी घराच्या टेरेसवर आले. पार्टीमध्ये आलेले सगळे जण आश्चर्यचकित होऊन पाहत होते की चिंटूजी राहुलजींच्या मागे-मागे फिरत आहेत आणि राहुलजी त्यांच्याशी बोलायचे टाळत होते.
थोड्या वेळाने राहुलजी मला म्हणाले, ‘तू मला का नाही सांगितलंस की चिंटूदेखील येणार आहे, मी रागावलोय तुझ्यावर..’ मी त्यांना, ‘राहुलजी, आता झालं गेलं विसरा..’ म्हणालो, तर ते रागारागात हॉलमध्ये गेले आणि तिथे बसलेल्या माझ्या धाकट्या मुलीशी गप्पा मारू लागले. चिंटूजीही हॉलमध्ये गेले, मी आणि माझी पत्नीदेखील तिथे गेलो. ज्या सोफ्यावर राहुलजी बसले होते, तो बराच दबला असल्यामुळे राहुलजी उठू शकले नाही. चिंटूजी पटकन् आले अन् त्यांच्याजवळ बसले. त्यांनी राहुलजींना उठू दिले नाही. मी पण समोर येऊन बसलो. चिंटूजी म्हणाले, ‘यार रूमी, समजाव ना राहुलला. सगळं आयुष्य सोबत घालवलंय. आता म्हातारपणात एकमेकांवर रागवायचं, याला काही अर्थ आहे का? कोणावरही या जगातून जाण्याची वेळ येऊ शकते आणि ज्याला आधी मृत्यू येईल, त्याला म्हातारपणात मैत्री तोडल्याची कायमची सल राहील.’ यावर राहुलजी मला म्हणाले, ‘हा बघ, इमोशनल करतोय मला.’ मीही म्हणालो, ‘हो, ते तुमच्यावर प्रेम करतात, म्हणूनच इमोशनल करताहेत..’ मग तेथे ऋषी कपूर आणि राहुल रवैल यांच्यात पॅचअप झाला. ऋषी कपूर इतके मोठे स्टार, एका स्टारचे वडील अन् स्टारचे पुत्र, तरीही ते मैत्रीला किती महत्त्व देत होते. यावर वसीम बरेलवी यांचा एक शेर…
शर्तें लगाई नहीं जातीं, दोस्ती के साथ कीजिए मुझे क़ुबूल, मेरी हर कमी के साथ।
राहुलजींचे वडील एच. एस. रवैल लाहोरहून आले होते, तेव्हा त्यांच्या बाबतीतही असेच घडले होते. तेसुद्धा तीन मित्र होते. एक विनोदवीर सुंदरजी, एक रिडकूजी आणि स्वतः एच. एस. रवैलजी. रिडकूजींची उंची अडीच ते तीन फूट होती. ते ठेंगणे होते आणि त्यांचे या जगात कोणीही नव्हते. त्यामुळे ते रैवल साहेबांच्या घरी सख्ख्या भावाप्रमाणे राहात होते. राहुलजी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे त्यांच्यावर खूप प्रेम होते. राहुलजी त्यांना चाचाजी म्हणत. रिडकूजी, एच. एस.रवैलजींच्या चित्रपटातही काम करायचे. राहुलजींनी मला सांगितले, की त्यांना एक आजार होता.. एखाद्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांना दिसायचेच नाही, कधी ऐकू यायचे नाही, तर कधी बोलता यायचे नाही. मी राहुलजींना म्हणालो, ‘हे तर मजेदार पात्र आहे, याचा उपयोग सिनेमात करायला पाहिजे.’
जेव्हा मी ‘मुझसे शादी करोगी’ची पटकथा लिहायला बसलो, तेव्हा हे पात्र मी त्यात घेतले. साजिद आणि डेव्हिड साहेबांनाही आवडले. कादर खान यांना त्याबद्दल ऐकवल्यावर तेही खुश झाले. पण एकेदिवशी माझा धाकटा भाऊ अमान जाफरी, जो राहुल रवैल यांच्या ‘जो बोले सो निहाल’ चित्रपटाची कथा लिहित होता, त्याने सांगितले की, राहुलजींनीही त्यांच्या ‘जो बोले सो निहाल’मध्ये असेच पात्र घेतले आहे. मी साजिद आणि डेव्हिड साहेबांना हे सांगितले तेव्हा ते म्हणाले की, रिडकू अंकल राहुलजींचे आहेत. पहिला अधिकार त्यांचा आहे, पण एकदा बोलून बघा. मी राहुलजींना फोन केला आणि म्हणालो, ‘अमानने मला सांगितलं की त्याने तुमच्या चित्रपटात रिडकू अंकलचे पात्र घेतले आहे आणि मी पण ते ‘मुझसे शादी करोगी’मध्ये लिहिले आहे. बघा, इतकी वर्षे ना तुम्ही लिहिलं ना मी. आता दोघांनी लिहिलंय. काय करायचं राहुलजी? तुम्ही म्हणाल तसे मी करेन.’ राहुलजींनी मला विचारले की, तुझ्या चित्रपटात हे पात्र कथा आणि पटकथा पुढे नेण्यास मदत करतेय की नाही? मी त्याला होकारार्थी उत्तर दिल्यावर ते म्हणाले की, मी फक्त कॉमेडी ट्रॅक टाकला आहे. त्यामुळं माझ्या चित्रपटातून ते काढून टाकतो. आणि अशा प्रकारे एवढे मोठे काम त्यांनी फोनवरूनच हलके केले. अशी असते मैत्री आणि नाते जपण्याची गोष्ट. त्यानंतर ‘मुझसे शादी करोगी’ प्रदर्शित झाला आणि त्यात कादर खान यांनी साकारलेली दुग्गल साहब ही व्यक्तिरेखा सुपरहिट झाली, हे साऱ्या जगाला माहीत आहे. पण, याचं श्रेय राहुलजींच्या भलेपणाला आणि त्यांच्यासोबतच्या माझ्या मैत्रीला जातं.
या वळणावर, राहुलजींनी दिग्दर्शित केलेल्या आणि मी लिहिलेल्या ‘अंजाम’ चित्रपटातील हे गाणे ऐका…
बड़ी मुश्किल है, खोया मेरा दिल है.. कोई उसे ढूंढ़ के लाए ना…
स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.






