माझ्या हिश्श्याचे किस्से: वडील स्वप्नात आले म्हणून स्वत:चं नाव ठेवलं ‘समीर अनजान’

0
17
माझ्या हिश्श्याचे किस्से:  वडील स्वप्नात आले म्हणून स्वत:चं नाव ठेवलं ‘समीर अनजान’


रूमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

वडील अनजान यांच्यासमवेत समीर अनजान.  

समीर सांगत होते… ‘मी वडिलांच्या नावाचा कधीच फायदा घेतला नाही. त्यांनी मला धीर देतानाच एक चॅलेंजही दिले की, आधी स्वत:च्या बळावर एक गाणं, किमान एक मुखडा एखाद्या संगीत दिग्दर्शकाकडून ओके कर. त्यानंतरच मी सर्वांना अभिमानाने सांगेन की तू माझा मुलगा आहेस.’

अलीकडेच मी क़मर जलालाबादींवर लिहिलेला कॉलम लोकांना खूप आवडला. त्यामुळे मला वाटले की, गीतकारांविषयी आणि त्यातही माझ्या बहुतांश चित्रपटांतील गाणी लिहिणारे गीतकार, माझे सन्मित्र समीर अनजान यांच्याबद्दलही काही लिहिले पाहिजे. म्हणून आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये समीर अनजान यांच्याबद्दल…

समीर हे प्रख्यात गीतकार अनजान साहेबांचे पुत्र असले, तरी ते बनारसजवळच्या एका गावात लहानाचे मोठे झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना बँकेत नोकरी लागल्याने साऱ्या कुटुंबाला खूप आनंद झाला. ऐंशीच्या दशकात बँकेत नोकरी मिळणे ही मोठी गोष्ट असायची. त्यामुळं मुलाच्या आयुष्याचं सोनं झालं असंच सगळ्यांना वाटलं. त्याविषयी समीर यांनी सांगितले… ‘रुजू झाल्यावर अकाउंटच्या फाइल, पेपर माझ्यासमोर आले तेव्हा मी विचार करू लागलो, समीर तू काय करतोयस? तुझं स्वप्न तर वेगळंच होतं अन् तू काम मात्र काही निराळंच करतोयस. बँकेत नोकरी करणे ही काही तुझी आकांक्षा नव्हती. तू एक कवी आहेस, शायर आहेस. आणि इथं बँकेत दुसऱ्यांची अकाउंट तपासत बसलायस! असा विचार मनात आला आणि त्याच वेळी मी राजीनामा देऊन घरी आलो.’

समीर सांगत होते, ‘एवढी चांगली नोकरी सोडल्यामुळे घरात एकच गोंधळ उडाला. मला माहीत होतं की, माझ्या आत एक कवी आहे. मी माझ्या रचना, शायरी, कविता देशातील वेगवेगळ्या वर्तमानपत्रांना, मासिकांना पाठवायचो. त्या कधी छापून यायच्या, कधी नाही यायच्या. कधीतरी छोट्या-मोठ्या मानधनाचा एखादा चेकही यायचा. मी कधी शीतला पांडेय नावाने, तर कधी राजन पांडेय नावाने लिहायचो. असो. माझ्या वडिलांप्रमाणेच माझी इच्छाही मला मुंबईला घेऊन आली.’

‘मुंबईमध्ये आल्यावर माझी एक मैत्रीण मला म्हणाली, शीतला पांडेय असो की राजन पांडेय; तू या कुठल्याही नावाने लिहिलं, तरी ते कवीचं नाव वाटत नाही. तुझ्या वडिलांनीही ‘अनजान’ नाव घेतलं, तसं तूदेखील एखादं चांगलं नाव घे. मी तिला विचारलं, “तूच सांग, काय नाव ठेवू?’ तिथं एक कादंबरी ठेवलेली होती. त्यावर लेखकाचे नाव होते – समीर. ती म्हणाली, “हे बघ, हे ठेव.. समीर.’ झालं. मग मी ‘समीर’ असं माझं नामकरण केलं. त्या दिवसापासून माझं नाव समीर झालं. माझं नाव ही माझ्या मैत्रिणीची देणगी आहे.

समीर यांनी सांगितले की, माझ्या संघर्षाच्या काळात लक्ष्मीकांत – प्यारेलाल, कल्याणजी – आनंदजी, बप्पी लाहिरी, आर. डी. बर्मन, मजरूह सुलतानपुरी, आनंद बक्षी, जावेद अख्तर, इंदीवर आणि माझे वडील अनजान यांच्यासारखे जितके प्रस्थापित गीतकार, संगीतकार होते, ते सगळेच खूप मोठे होते. परंतु, मी मजरूह साहेब आणि आनंद बक्षी यांचा चाहता होतो. माझ्यापुढचे आव्हान मोठे होते. मी वडिलांच्या नावाचा कधीच फायदा घेतला नाही. त्यांनी मला धीर देतानाच एक चॅलेंजही दिले की, आधी स्वत:च्या बळावर एक गाणं, किमान एक मुखडा एखाद्या संगीत दिग्दर्शकाकडून ओके कर. त्यानंतरच मी सर्वांना अभिमानाने सांगेन की, तू माझा मुलगा आहेस. समीर यांची मोठ्या संगीत दिग्दर्शकांशी ओळख नव्हती म्हणून ते नव्या संगीत दिग्दर्शकांसोबत गाणी बनवू लागले.

पुढे समीर यांची भेट दुलाल गुहा यांचे सहायक अजीज सजावल ऊर्फ पप्पू यांच्याशी झाली. ते आपल्या ‘इलाका’ या पहिल्या सिनेमाचे दिग्दर्शन करत होते. ते समीरना सोबत घेऊन गेले आणि त्यांची नदीम यांच्याशी भेट घालून दिली. नदीमना म्हणाले की, ‘समीरकडून माझ्यासाठी गाणं लिहून घे.’ समीर सांगत होते.. ‘नदीम-श्रवण यांच्यासोबत ते माझं पहिलं गाणं होतं. त्यानंतर वडिलांनी सर्वांना अभिमानानं सांगितलं की हा समीर माझा मुलगा आहे!’

“इलाका’मधील ते गाणं रेकॉर्ड झालं. त्याचे बोल होते.. ‘प्यार से भी ज़्यादा तुझे प्यार करता हूँ..’ त्यानंतर समीर यांनी नदीम-श्रवण आणि आनंद-मिलिंद यांच्यासोबतीने इतिहास रचला. चार हजार चित्रपटगीते लिहिल्याबद्दल समीर यांचे नाव ‘गिनीज बुक’मध्ये नोंदवले गेले. यावरून निदा फ़ाजलींचा एक शेर आठवतोय…

दिल में न हो जुरअत तो

मोहब्बत नहीं मिलती

ख़ैरात में इतनी बड़ी

दौलत नहीं मिलती।

एक दिवस समीरना स्वप्नात वडील दिसले. सकाळी उठल्यावर त्यांनी ठरवले की, आपल्या नावासोबत वडिलांचे नावही लावायचे. ‘हाऊसफुल’चे संगीत रिलीज होणार होते. निर्माता साजिद नाडियादवालांना फोन करून समीरनी सांगितलं की, आजपासून पब्लिसिटीमध्ये माझं नाव समीर नाही, तर समीर अनजान लिहावं.’ साजिद म्हणाले, ‘मला काहीच अडचण नाही, तुझा आनंद तो माझाही आनंद.’ तेव्हापासून प्रत्येक सिनेमात ते समीर अनजान या नावाने लिहू लागले. समीर यांनी हजारो गाणी लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेली अनेक गाणी तुमच्याही आवडीची असतील. त्यातील तुम्हाला आवडणारं गाणं नक्की ऐका. माझ्या आवडीचं गाणं मी लिहिलेल्या ‘हर दिल जो प्यार करेगा’ या सिनेमातील आहे…

उसे हँसना भी होगा,

उसे रोना भी होगा,

उसे पाना भी होगा,

उसे खोना भी होगा,

सुबह शाम तन्हाई में, आहें भरेगा,

हर दिल जो प्यार करेगा।

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link