माझ्या हिश्श्याचे किस्से: क़मर जलालाबादी : राज कपूर यांनाही गाणी लिहायला दिला होता स्पष्ट नकार

0
19
माझ्या हिश्श्याचे किस्से: क़मर जलालाबादी : राज कपूर यांनाही गाणी लिहायला दिला होता स्पष्ट नकार


  • Marathi News
  • Opinion
  • Qamar Jalalabadi: Raj Kapoor Was Also Given A Clear Refusal To Write Songs | Divya Marathi Rasik Article Written By Rumi Jaffrey On Raj Kapoor And Qamar Jalalabadi

रूमी जाफरी3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

क़मर जलालाबादी (उजवीकडे) यांनी राज कपूर यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांसाठी गाणी लिहायला नकार दिला होता. मात्र, नंतर राज यांनी अभिनय केलेल्या ‘छलिया’ची गाणी लिहिली. त्यांनी लिहिलेल्या ‘छलिया मेरा नाम, छलना मेरा काम..’ या गाण्यातील एका दृश्यात राज कपूर.

आज माझ्या हिश्श्याचे किश्श्यांमध्ये मी प्रसिद्ध गीतकार आणि कवी ओमप्रकाश भंडारी तथा क़मर जलालाबादी यांच्याबद्दल सांगणार आहे. मी १९८६ किंवा ८७ मध्ये क़मर साहेबांना जुहूच्या युनिटी कंपाउंडमधील त्यांच्या घरी भेटलो होताे. भोपाळमधील सैफ कमाल नावाचे एक गृहस्थ होते. ते रेल्वेमध्ये नोकरी करायचे आणि जोडीला चित्रपटही बनवत होते. चित्रपटाचे नाव होते ‘सिला’. त्यात राजकिरण आणि प्रिया तेंडुलकर होत्या. चित्रपटाचे दिग्दर्शक बी. आर. इशारा होते. त्याचे शूटिंग कमर साहेबांच्या बंगल्यात सुरू होते. मी तेथे पोहोचल्यावर सैफ भाईंनी सर्वांसोबत क़मर साहेबांशीही माझी ओळख करून दिली.

माझे वडील, मोठे काका असे सगळे शायर आहेत, असे सैफ भाईंनी सांगितल्यावर क़मर साहेबांनी मला स्वत:जवळ बसवले आणि माझ्याशी खूप प्रेमाने बोलले. तिथून जवळच लेखिका जोहरा जमाल या भाऊ जावेद मेहमूदसोबत राहात होत्या. मी त्यांनाही अनेकदा भेटायला जायचो. क़मर साहेब त्याच परिसरात राहत होते आणि त्यांना आधी भेटलोही होतो. तरीही आणखी दोन-तीनदा मी त्यांना भेटायला गेलो. तो इतका चांगला काळ होता की, कुणाच्या घरी न सांगता गेलो, तरी त्यांना कधी वाईट वाटायचे नाही.

असेच एकदा त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी मला खूप प्रेमाने बसवून घेतले, चहापाणी केले. अनेक प्रसंग, किस्सेही सांगितले. मला प्रोत्साहन देतानाच, ते स्वत: या इंडस्ट्रीत कसे आले, तेही सांगितले. त्यांच्याकडून ऐकलेले काही किस्से, घटना मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. त्यांनी सांगितले की, “अनारकली’चे लेखक इम्तियाज अली ताज यांनी “पंचोली’ चित्रपटासाठी माझे नाव सुचवले होते. संगीत गुलाम हैदर साहेबांंचे होते आणि मला गाणी लिहिण्याची संधी मिळाली. चित्रपटाचे नाव होते ‘जमीनदार’. त्यातील गाणी खूप गाजली. त्यानंतर मी पुण्याला गेलाे. तिथे प्रभात फिल्म्समध्ये हुस्नलाल- भगतराम यांच्यासाठी गाणी लिहिली. चित्रपटाचे नाव होते “चाँद’. हा त्यांचाही पहिलाच चित्रपट होता.

क़मर साहेब सांगत होते… प्रत्येक शायरचे एक टोपणनाव (तख़ल्लुस) असते. त्यामुळे आपले टोपणनाव काय ठेवावेे, या विचारात मी पडलो होतो. ओमप्रकाश भंडारी हे शायर आणि गीतकाराचे नाव वाटत नव्हते. माझा एक मित्र होता, अमर चंद नावाचा. मी त्याला, ‘माझं टोपणनाव काय ठेवू?’ असं विचारलं. तो म्हणाला, माझ्या नावात जसे वजन आहे, तसे तोलामोलाचे नाव ठेवलेस, तर मी तुला मानेन. मी म्हणालो, अमरसारख्या वजनाचे नाव तर क़मर होते. बस्स! त्या दिवसापासून मी माझे नाव ‘क़मर’ ठेवले आणि मी जलालाबादचा असल्यामुळे ते केले ‘क़मर जलालाबादी’.

हळूहळू मी चित्रपटांच्या गीतलेखनात व्यस्त झालो. एके दिवशी मुंबईत रेल्वे स्टेशनवर माझी राज कपूर यांच्याशी भेट झाली. ते मला म्हणाले की, मी खूप दिवसांपासून तुम्हाला भेटण्याची इच्छा होती. आमचे दिग्दर्शक राजा नवाथे यांनाही मी तुमच्या घरी पाठवले होते. कारण माझ्या मागच्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक राम गांगुली होते आणि बेहज़ाद लखनवी यांच्याकडून गाणी लिहून घेतली होती. त्यावेळी बेहज़ाद साहेब पाकिस्तानला गेले होते की जाणार होते, हे आता मला नीट आठवत नाही. पण, तेव्हा राज कपूर म्हणाले की, मला तुमच्याकडून गाणी लिहून हवी आहेत. यावर मी सांगितले की, माझ्याकडे खूप चित्रपट आहेत आणि तुमच्यासाठी गाणी लिहायला माझ्याकडे वेळ नाही. असो. त्यानंतर राज कपूर यांची शंकर जयकिशन, हसरत जयपुरी, शैलेंद्र यांच्यासोबत चांगली टीम तयारी झाली. त्यानंतर जेव्हा कधी राज कपूर मला एखाद्या पार्टीत वा कार्यक्रमात भेटायचे, तेव्हा म्हणायचे की, क़मर साहेब, तुमच्याकडे तर आमच्यासाठी वेळच नाही. “छलिया’ चित्रपटात ते नायक होते, म्हणून मी त्यासाठी गाणी लिहिली- “मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे कि तेरा नाम..’ दुसरे गाणे होते- “तेरी राहों में खड़े हम दिल थाम के..’ तेव्हा राज कपूर साहेब माझी चेष्टा करीत म्हणाले होते.. ‘चला, माझ्या दिग्दर्शनासाठी, निर्मितीसाठी नाही तर नाही, पण तुम्ही माझ्यासाठी तरी गाणी लिहिली!’

क़मर साहेबांनी सांगितले की, “हिमालय की गोद में’साठीही मी एक गाणे लिहिले होते. ते मी कल्याणजी-आनंदजींना ऐकवले, तर त्यांना आवडले नाही. गाण्याचा मुखडा असा होता.. ‘मैं तो एक ख्वाब हूँ, इस ख्वाब से तू प्यार ना कर..’ तेव्हा या गाण्यावरून खूप उलटसुलट चर्चा झडली. कल्याणजी-आनंदजी भाईंचे म्हणणे होते की, रोमँटिक गाण्यात कधीच कोणी म्हणत नाही की माझ्यावर प्रेम करू नकोस. प्रेम करण्यासाठी गाणी बनतात, प्रेम न करण्यासाठी नाही. आणि तसे बनवले तर ते चालणार नाही. असो. ते मानायलाच तयार नव्हते. एक दिवस ही गोष्ट इंदीवरजींंना समजली. ते मोठे शायर आणि गीतकार होते. त्यांनी हा मुखडा ऐकला आणि ते कल्याणजी-आनंदजींना म्हणाले, ‘हे गाणं सुपरहिट होणार आहे. ही कल्पनाच सुपरहिट आहे. हे तुम्ही रेकॉर्ड करा.’ मग ते गाणं रेकॉर्ड झालं आणि खूप हिट झालं क़मर साहेबांची अनेक गाणी तुम्ही ऐकली असतील. पण, आज मी त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्याच गझलेतील काही शेर लिहीत आहे… कर लूंगा जमा दौलत ओ ज़र उस के बाद क्या ले लूंगा शानदार सा घर उस के बाद क्या मय की तलब जो होगी तो बन जाऊंगा रिन्द कर लूंगा मयकदों का सफ़र उस के बाद क्या होगा जो शौक़ हुस्न से राज़ ओ नियाज़ का कर लूंगा गेसुओं में सहर उस के बाद क्या शे’र ओ सुखन की ख़ूब सजाऊंगा महफ़िलें दुनिया में होगा नाम मगर उस के बाद क्या। यासोबत मला आणखी एक प्रसंग आठवला. मी पहिल्यांदा क़मर साहेबांच्या घरी ‘सिला” चित्रपटाचे शूटिंग पाहात होतो तेव्हा दिग्दर्शक बी. आर. इशारा म्हणाले की, मी तुला एक अशी गोष्ट सांगतो जी क़मर साहेब तुला स्वत:हून कधीच सांगणार नाहीत. मग त्यांनी राजकिरण, प्रिया, सैफ कमाल साहेब यांनाही बोलावले. म्हणाले, इकडे या, मी तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगणार आहे. हे ऐकून क़मर साहेब म्हणाले, ‘नाही, नाही.. काही सांगायची गरज नाही.’ त्यावर इशारा साहेब म्हणाले, ‘मला माहीत आहे, तुम्ही सांगू देणार नाही. पण, तरीही मी सांगेन. मलाही जरा आश्चर्यच वाटलं की, अशी कोणती गोष्ट इशारा साहेब सांगणार आहेत, जी क़मर साहेब नको म्हणताहेत. इशारा साहेब म्हणाले, ‘तुम्हाला माहीत आहेे का, हे कोणते घर आहे? माझ्या आयुष्याला आकार देण्यात या घराचा मोठा वाटा आहे. मी या घरात कामाला होतो..’ हे ऐकून सगळ्यांना धक्का बसला. ते पुढे सांगू लागले, ‘या घरात राहून मला मोठा फायदा झाला. रिकाम्या वेळी मी क़मर साहेबांजवळ बसायचो. ते म्हणायचे की, तुला आयुष्यात मोठं व्हायचं, प्रगती करायची नाही का? इथे एवढी पुस्तकं आहेत, ती वाचत जा. माझ्याकडून शिकत जा.’ इशारा साहेब सांगत होते, की यांच्यासोबत राहिल्यामुळे मला पुस्तके वाचण्याचा छंद लागला.

हे सगळे ऐकून मी अवाक झालो. इशारा साहेबांचेही मोठेपण होते की ते आपण या घरात कामाला होतो, हेे सांगत होते. क़मर साहेब मोठ्या मनाने एवढंच म्हणत होते की, नाही, नाही.. हा खूप चांगला मुलगा होता. प्रत्येक काम मन लावून करायचा. मला माहीत होतं की एक दिवस हा खूप यशस्वी होईल. त्यांनी मलाही हेच सांगितलं होतं की, लेखक बनायला आला आहेस, तर खूप अभ्यास कर. बरं-वाईट काही असो, वाचत राहा आणि लिहीत जा. चांगले साहित्य वाचण्याची सवय लावून घे. तर चला मग, क़मर साहेबांच्या आठवणीत ‘छलिया’चे शीर्षकगीत ऐकूया… छलिया मेरा नाम, छलना मेरा काम, हिन्दू, मुस्लिम, सिख, ईसाई सबको मेरा सलाम… स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.

लेखक बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक



Source link