प्रिया शिंदेंचा कुणबी दाखला वैधच, वंशावळीत उल्लेख आहे; महेश शिंदेंचा दावा

0
1


सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे (Priya Shinde) यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सादर केलेला कुणबी दाखला हा चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात आला असल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेनेचे कोरेगावचे आमदार आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांचे पती महेश शिंदे (Mahesh Shinde) पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला आहे. 

प्रिया शिंदे यांच्या माहेरकडील वंशावळीमध्ये कुणबी हा उल्लेख असल्याने हा दाखला वैध असल्याचं आमदार महेश शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबत मीडिया ट्रायल करू नये, असं आवाहन देखील त्यांनी केलं. आमच्याकडून ओबीसींवर कोणताही अन्याय झाला नसून समोरून कुणबी उमेदवार दिल्याने आम्ही देखील कुणबी उमेदवार दिला असल्याचं स्पष्टीकरण आमदार महेश शिंदे यांनी दिलं आहे. 

महेश शिंदेंनी वंशावळ मांडली

आमदार महेश शिंदे म्हणाले की, महायुती सरकारने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कुणबी दाखले द्यायला सुरुवात केली. कुणबी दाखले देत असताना प्रत्येक कुटुंबाची वंशावळ पाहिली जाते, याची अधिकृत माहिती महसूल विभागाकडे आणि मोडी लिपीमध्ये पण असते. 1812 साली बाबाजी बर्गे यांची म्हणजेच जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांचे खापर पंजोबा यांची पहिली नोंद आहे. 

महेश शिंदे म्हणाले की, “कुणबी म्हणजे शेती करणारा शेतकरी. याचे पूर्ण सातबारा उतारे आहेत. एवढं सर्व विषय क्लियर असताना अशा पद्धतीने मीडिया ट्रायल व्हायला नको होती. प्रिया शिंदे या सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढल्या आहेत. ज्यामध्ये कोणीही निवडणूक लढवू शकतो. जर यामध्ये काहीही चुकीचं असतं तर जिल्हाधिकाऱ्यांनी ते बाद ठरवलं असतं.”

ओबीसींना प्राधान्य दिल्याचा शिंदेंचा दावा

आमचं घडलं ते चुकीचं आणि त्यांचं घडलं ते बरोबर आहे हे बोलणं चुकीचं. सातारा जिल्ह्यामध्ये पाहिलं तर मी सात ओबीसी जातींना मी प्राधान्य दिलं आहे. तीन गटांमध्ये आम्ही सामान्य सदस्य दिल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी हरलो. महाविकास आघाडीला माझा सवाल आहे, तुमचा उमेदवार फडतरे कोण आहे? ते जर कुणबी ओबीसी होऊ शकतात तर  प्रिया शिंदे कुणबी ओबीसी होऊ शकत नाही का?

महेश शिंदे म्हणाले की, “सभापती निवडीच्या वेळी कामेश कांबळे या राष्ट्रवादीच्या सदस्यासोबत नेते मंडळींची बैठक झाली. राष्ट्रवादीच्या पाच सदस्यांना महाविकास आघाडीसोबत जाणं पटत नव्हतं. माझी आणि शशिकांत शिंदे यांची बांधावरची दुश्मनी नाही. मात्र राजकीय विचाराने आम्ही एकमेकांचे शत्रू आहोत. राष्ट्रवादीचे अजून तीन सदस्य आमच्या सोबत सहभागी व्हायला तयार होते. त्यांना महायुतीचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य होतं.”

हा राग थोडे दिवस असेल

खरंतर ही सर्व न्यायप्रविष्ट बाब आहे. यामध्ये बोललं नाही पाहिजे. पण आता जे झालेला आहे ते योग्य झालेलं आहे . पंधरा दिवस आधी ही अर्जाची प्रक्रिया केली होती. गुवाहाटीला गेलो होतो तरीसुद्धा अजून ही आम्ही अपात्र ठरलेलो नाही असं महेश शिंदे म्हणाले. 

पालकमंत्री शंभूराज देसाई यांना जरी मुख्यमंत्र्यांनी खासदारकीचे तिकीट दिले तरी जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे आणि मला त्या ठिकाणी काम करावे लागणार आहे. हा राग थोडे दिवस राहणार आहे. मिठाचा खडा तेवढा बाजूला ठेवणं गरजेचं आहे, असं महेश शिंदे म्हणाले. 

एकनाथ शिंदेंच्या कानावर घातलं होतं

जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युतीबाबत मी सर्व कल्पना दिली होती. मी कोणालाही अंधारात ठेवलेले नाही माझी भूमिका स्पष्ट आहे. माझ्यावर कारवाईबाबतचा प्रस्ताव पालकमंत्र्यांनी जर दिला असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समजूतदार आहेत. ते दोघे बसून ठरवतील, असं महेश शिंदे म्हणाले. 

जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा ज्या सदस्यांवर पात्रतेची शंभर टक्के कारवाई होणार नाही. थोडा मानसिक त्रास झाला हे निश्चित आहे, असं महेश शिंदे म्हणाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर स्वतःचा बंगला पालकमंत्री शंभूराज देसाईंना देत असतील तर त्यांच्यावर किती प्रेम आहे पाहा. कायम त्यांना झुकतं माप दिलं आहे, पाटणच्या विकासामध्ये सगळ्यात जास्त निधी फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आहे.

शशिकांत शिंदेंचं स्वागत

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना महेश शिंदे यांनी उपहासात्मक टोला लगावला. शशिकांत शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशावर विचारले असता आमदार महेश शिंदे म्हणाले की, असं असेल तर मी त्यांचे स्वागत करेन. मी त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नेतृत्व मान्य करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला देखील दिला आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसून आगामी काळामध्ये सर्व काही व्यवस्थित होईल, असं देखील आमदार महेश शिंदे म्हणाले.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link