[ad_1]
- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Lover’s Special Article Pustakamaghe Ghostha Column Written By Aadubal
आदूबाळ4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
काझुओ इशिगुरो
काही लेखन वाचकाला अनेक अर्थांनी समृद्ध करून जातं. जपानी – ब्रिटिश लेखक काझुओ इशिगुरो अशा समकालीन लेखकांमध्ये मोडतात. त्यांचं लेखन एखाद्या वेलबुट्टीसारखं आहे.. गुंतागुंतीचं पण सुंदर. अनेकविध प्रेरणा त्यात जाणवतात, लेखकाचे अनुभव आणि त्यातून लेखकाने केलेलं चिंतन दिसतं. यामुळे पात्रयोजनेत आणि कथानकात आलेले बारकावे जटिल न होता सौंदर्यपूर्ण होतात.
पण हे अनुभव येतात कुठून? त्याचा स्रोत काय आहे? याचं उत्तर इशिगुरो यांच्या द्विभाषक – द्विसांस्कृतिक ओळखीत सापडेल. त्यांचा जन्म नागासाकीमध्ये झाला आणि ते पाच वर्षांचे असतानाच त्यांच्या कुटुंबाने इंग्लंडमध्ये स्थलांतर केलं. असं असलं, तरी जपानी संस्कृतीशी असलेली त्यांची नाळ तुटली नाही. उलट लेखक म्हणून त्यांच्या लेखनात पूर्व – पश्चिमेचा संकर असलेले सांस्कृतिक पैलू येण्यासाठी त्याचा उपयोगच झाला. त्यांची अनेक पात्रं आणि त्यांचे संघर्ष कित्येकदा बहुसांस्कृतिकतेतून, स्व-ओळखीबाबत स्वतःला आणि जगाला विचारलेल्या प्रश्नांतून येतात. आपल्या मूळ संस्कृतीपासून दूर राहणाऱ्या लोकांमध्ये जो ‘सांस्कृतिक तुटलेपणा’ (Cultural Displacement) दिसतो, त्याचा परिपाक म्हणजे हे स्व-ओळखीचे प्रश्न. लेखकाच्या प्रेरणा शोधणे नेहमीच रंजक असतं. इशिगुरो यांच्या मुलाखती वाचल्या, तर त्यांनी जपानी भाषेत लिहिणाऱ्या साहित्यिकांकडून प्रेरणा घेतल्या आहेत, हे लक्षात येतं. जपानी साहित्यात दिसणारे स्वभाव आणि परिसरचित्रणाचे बारकावे ते आपल्या इंग्रजी लेखनात आणतात. त्याचवेळी जेन ऑस्टेन आणि ई. एम. फॉर्स्टरसारख्या पाश्चात्त्य कादंबरीकारांच्या कथनशैलीचा प्रभावही त्यांच्यावर आहे. परिणामी त्यांच्या लेखनाला एक वेगळंच; पूर्व – पश्चिम असं पाणी चढलं आहे.
‘द रीमेन्स ऑफ द डे’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीत या प्रेरणा ठळकपणे जाणवतात. एका ब्रिटिश उमरावाच्या घरात घडणारं हे कथानक आहे. काळ दुसऱ्या महायुद्धानंतरचा आणि कादंबरीचा निवेदक आहे स्टीव्हन्स नावाचा त्या उमरावाचा बटलर. या निवेदकाच्या माध्यमातून इशिगुरो कर्तव्यभावना, विश्वास, प्रामाणिकपणा या मानवी संवेदनांचा मागोवा घेतात. खूप काळ दबून राहिलेली प्रेमभावना व्यक्तीच्या आयुष्यावर काय परिणाम करू शकते, हे स्टीव्हन्सच्या चित्रणावरून ते लक्षात आणून देतात. ब्रिटिश उच्चवर्गावर (Aristocracy) आधारित ही पहिलीच कादंबरी नाही. किंबहुना ती चांगलीच मळलेली वाट आहे. तरीही इशिगुरोंचा त्या वर्गाकडे बघायचा दृष्टिकोन पूर्वसूरींपेक्षा संपूर्णपणे अनोखा आहे. इंग्लंडमध्ये लहानाचं मोठं होताना त्यांनी एका बाह्य निरीक्षकाच्या भूमिकेतून या जगाकडे पाहिलं. दुसऱ्या महायुद्धानंतर वेगाने बदललेल्या समाजाचा तर त्यांना प्रत्यक्ष अनुभवच होता.
‘नेव्हर लेट मी गो’ ही मला व्यक्तिशः सर्वात आवडलेली कादंबरी आहे. Speculative Fiction आणि Dystopia या दोन्हींचा मेळ घालणाऱ्या या कादंबरीत एक असा भविष्यकाळ आहे, ज्यात मानवी क्लोनिंगला परवानगी आहे. इतकंच नाही, तर क्लोन – मानवांना ‘निरोगी अवयवांची शेतं’ म्हणून पाळलं जातं. ते अवयव दान केल्यामुळे अर्थातच त्यांचा मृत्यू होतो. अशा क्लोन – मानवांच्या एका गटाचा मागोवा ही कादंबरी घेते. नीती – अनीती, माणुसकी या मानवी संकल्पना वैज्ञानिक प्रगतीच्या संदर्भात कशा मांडाव्यात, या अत्यंत मूलभूत प्रश्नाचा वेध ही कादंबरी घेते. समृद्ध आयुष्य जगणं म्हणजे काय, या प्रश्नाबद्दल मुळातच मानवप्राण्यात एकमत नाही आणि इशिगुरो आणखी एक पाऊल पुढे जाऊन त्यात मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीने निर्माण केलेल्या प्रश्नांची भर घालतात. ‘द बेरीड जायंट’ या कादंबरीत ते फँटसी हाताळतात आणि त्याची सांगड ऐतिहासिक कादंबरीशी घालतात. यामध्ये इशिगुरो इतिहास आणि जनस्मृती यांच्या परस्परसंबंधांवर भाष्य करतात.
मानवी अनुभवांबद्दल अपार उत्सुकता इशिगुरो यांच्या लेखनातून जाणवते. पण, या उत्सुकतेमागे करुणा आहे, हेही जाणवतं. कथानकाच्या ओघात ते आपल्या पात्रांच्या आयुष्याला, अनुभवांना सूक्ष्मदर्शकाखाली ठेवतात. त्या अनुभवांचा व्यक्तीवर आणि व्यक्तीचा अनुभवांवर अशा दोन्ही दिशांनी होणाऱ्या परिणामांना ते वाचकांसमोर ठेवतात. इशिगुरोंची थोरवी व्यक्तिचित्रणात आहे. त्यांची कथानकं भूतकाळात, वर्तमानात किंवा भविष्यात घडू शकतात. पात्रांची सामाजिक पार्श्वभूमी वेगवेगळी असू शकते. पण, इशिगुरो त्या व्यक्तीच्या भावनिक गाभ्याला हात घालतात, आपल्या सर्वांना जोडणारी माणूस असण्याची भावना त्यांच्या पात्रांना जिवंत करते.
‘द रीमेन्स ऑफ द डे’ला १९८९ मध्ये बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. इशिगुरोंच्या अनेक कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले आहेत. सर्वात मानाचा असलेला साहित्याचा नोबेल पुरस्कार त्यांना २०१७ मध्ये मिळाला. अशा मोठ्या पुरस्कारांबद्दल कधीमधी कुरबुरी ऐकायला मिळतात. पण, काझुओ इशिगुरोंना हे पुरस्कार मिळायलाच हवे होते, त्यांची पात्रताच तेवढी आहे, असाच सूर सगळीकडे ऐकू येतो.
(संपर्क- aadubaal@gmail.com)
[ad_2]
Source link
