- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Rasik Purvani Netstream Sadar Written By Sameer Gaikwad On Binge Watching
समीर गायकवाड27 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
वर्षभर चाललेल्या या लेखमालेतील हा अंतिम लेख. त्या अनुषंगाने काही गरजेच्या मुद्द्यांवर चर्चा करूया. ‘बिंज वॉचिंग’ करताना, म्हणजे ऑनलाइन स्ट्रीमिंग होणारा कंटेंट पाहताना काही भान असणे आता अनिवार्य झाले आहे. अन्यथा, मानवी सुखभावनांचा कडेलोट होऊन आयुष्य अकारण अनेक वाईट संभावनांच्या गर्तेत जाईल. वरवर ही अतिशयोक्ती वाटेल, पण हे दारुण वास्तव आहे. ‘नेटस्ट्रीम’मध्ये अशा अनेक सिनेमांचा उल्लेख करता येईल, जे पाहताच मनावर खोल, गंभीर आिण दीर्घकालीन परिणाम होतात. यातील काही परिणाम अपरिवर्तनीय म्हणजेच इर्रिव्हर्सिबल आहेत. ही बाब अतिशय क्लेशदायक आहे, येणाऱ्या पिढीचे मन:स्वास्थ्य कमकुवत करणारी आहे.
या संदर्भात ‘चेर्नोबिल’ या सिरीजचे उदाहरण घेता येईल. १९८६ मध्ये रशियामध्ये झालेल्या आण्विक आपत्तीचे चित्रण करणारे ‘चेर्नोबिल’सारखे शो पाहिल्यास प्रेक्षकांवर विविध प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात हे आता मान्य केले गेले आहे. चेर्नोबिल शहरात अणुभट्टीचा स्फोट होऊन मोठी जीवितहानी झाली, निसर्गसाखळी दीर्घकाळासाठी बाधित झाली. कधीही भरून निघणार नाही अशी ही हानी होती. ही पार्श्वभूमी असलेल्या या सिरीजमधील त्या घटनेचे ग्राफिक्स मनावर आघात करणारे होते. प्रेक्षकांच्या संवेदनेचा अंत पाहणारे डार्क ग्रे शेडमधले प्रखरानुभूतीचे भडक चित्रण मन सुन्न करण्यास पुरेसे होते. या घटनेशी थेट संबंध असला-नसला तरी पाहणाऱ्याच्या संवेदना गोठवण्याची ताकद त्यात होती. प्रेक्षकांपैकी संवेदनशील व्यक्तींमध्ये चिंता, भीती, नैराश्य वा अन्य मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवल्याचे आढळले. यात चित्रित केलेली अगतिकता आणि निराशा डिप्रेशन किंवा शून्यवादाची भावना निर्माण करू शकेल, इतकी प्रबळ होती. ‘चेर्नोबिल’सारखे शो पाहिल्यामुळे येणारा ताण आणि चिंता ही डोकेदुखी, थकवा, निद्रानाश, स्नायूंचा ताण, पचनक्रियेच्या समस्या किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती यांसारख्या शारीरिक विकारांमध्ये प्रकट होऊ शकेल, इतकी ती प्रभावी होती. असे अनेक साइड इफेक्ट बिंज वॉचिंग करणाऱ्यांमध्ये जाणवू लागले आहेत.
अशा थीमच्या अनेक सिरीज काही नाटकीय, तर काही काल्पनिक बदलांसह मोठ्या प्रमाणात येऊ लागल्यावर याचे व्यापक दुष्परिणाम चर्चेत आले. मात्र, तोवर अनेकांचे बरेच नुकसान झाले होते. अशा मालिका किंवा शो काही अंशी सत्यकथेवर आधारित असले तरी मनोरंजनासाठी त्यात काही महत्त्वाचे बदल केलेले असतात याचे भान पाहणाऱ्याला नसते. केवळ अल्प प्रमाणात काही प्रेक्षकांनाच हे पक्के ज्ञात होते की, ही सिरीज / शो संपूर्णतः खरा नसून त्याला टीआरपीसाठीचा मुलामा दिला आहे. याची आणखी एक बाजू होती, ती म्हणजे ज्यांना हा मनोरंजनाचा कंटेन्ट वाटत नव्हता, त्यांना तो एक माहितीपट वाटू लागला. परिणामी ते याला महत्त्वाचा दस्तऐवज समजू लागले. त्यातून त्यांच्या मनात भ्रामक कल्पना अन् त्यांचा कथाविस्तार वास्तव म्हणून आकाराला आला.
बिंग वॉचिंगमुळे झोपेच्या चक्रावर नकारात्मक प्रभाव पडतो. पश्चात्तापाची भावना निर्माण होऊ शकते, ती पहाटेपर्यंत वाढू शकते, झोपेवर आणि पुढच्या दिवसावर परिणाम करू शकते. शिवाय, निद्रानाशाचा आणि झोपेची गुणवत्ता कमी होण्याचा त्रास होऊ शकतो, हे सिद्ध झाले. वारंवार बिंज वॉचिंग करणाऱ्यांना दु:ख, चिंता, तणावांनी ग्रासल्याचे आणि त्यांचा आत्मसन्मान कमी झाल्याचे जाणवले. दीर्घकाळ बिंज वॉचिंगमुळे व्यसनाधीनतेसारखी लक्षणे दिसू लागली.
नेटफ्लिक्सने केलेल्या एका सर्वेक्षणात, ७३ % लोक एका टीव्ही शोचे दोन ते सहा एपिसोड एकाच बैठकीत पाहतात. यामुळे त्यांची द्विधा मन:स्थिती वाढू लागते. २०१७ च्या एका अभ्यासातून, झोपेच्या खराब गुणवत्तेशी, निद्रानाश व थकवा वाढण्याशी बिंज वॉचिंगचा संबंध असल्याचे समोर आले. बिंज वॉचिंग करणाऱ्या ९८ % प्रेक्षकांच्या झोपेचा स्तर खराब असण्याची शक्यता जास्त होती. ते झोपण्यापूर्वी जास्त सतर्क होते, त्यांना अधिक थकवा जाणवत होता. दीर्घकाळ बिंज वॉचिंगमुळे प्रेक्षक स्क्रीन व्यसनाधीन होऊ शकतात. त्यातून प्रसवणारा झटपट तृप्तीचा प्रकार जुगार वा इंटरनेट / सोशल मीडियाच्या व्यसनासारखाच असू शकतो. नियमित प्रेक्षक सहसा वास्तवापासून सुटका म्हणून आणि एकटेपणा, कंटाळा दूर करण्यासाठी बिंज वॉचिंग करतात.
दुसऱ्या एका अभ्यासातून, बिंज वॉचिंग आणि कामात उशीर करणे यामध्ये परस्परसंबंध आढळला. आत्मनियंत्रण कमी होणे, निकड, पश्चात्ताप, कर्तव्याकडे दुर्लक्ष, नकारात्मक सामाजिक आणि आरोग्यविषयक परिणाम, खोटे बोलणे किंवा चिंता, अस्वस्थता, राग, एकाग्रता नसणे तसेच माघार घेण्याची लक्षणे बिंज वॉचिंग करणाऱ्यांमध्ये आढळतात. आपल्याकडे तर यामुळे गुन्ह्यात वाढ झाल्याचे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.
एकूणच, नेटस्ट्रीम करताना प्रत्येकाने भान राखणे अनिवार्य आहे; अन्यथा करमणूक किंवा ज्ञानार्जनाऐवजी अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल. यातून आयुष्याला वाईट वळणही लागू शकते. त्यामुळे काय पाहायचे नि किती पाहायचे याचे नियम ज्याने त्याने स्वतःला घालून दिले पाहिजेत. तसे झाले नाही तर हे मनोरंजन आपल्यासाठीच एक ‘चेर्नोबिल’ ठरेल. त्यात आपले कुटुंबही होरपळेल. म्हणून आपल्या हातातील रिमोटचा, मोबाइल, लॅपटॉप वा आयपॅडचा वापर तारतम्यानेच केला पाहिजे!
(संपर्क- sameerbapu@gmail.com )






