
पिंपरी : निगडी, प्राधिकरणातील दरोड्याचा छडा लावण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून, आरोपींनी मोबाईलऐवजी ‘वॉकी टॉकी’चा वापर केल्याचे तपासात निदर्शनास आले आहे.या टोळीतील आरोपींचा राजस्थानपर्यंत बाराशे किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी सुरेश लादुराम ढाका (वय २९, रा. राजस्थान) याला अटक केली. तर, त्याचा साथीदार महिपाल रामलाल बिष्णोई (वय १९, वडगाव मावळ. मूळ रा. राजस्थान) याला तळेगाव दाभाडे येथून ताब्यात घेतले. त्यांचा मुख्य सूत्रधार आणि अन्य तिघांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरण परिसरात एका बंगल्यात काम करणाऱ्या कुटुंबाला आणि घरमालक व्यावसायिकाला बांधून, पिस्तूलाचा धाक दाखवून लुटण्याची घटना १९ जुलै रोजी घडली. घटनेच्या दिवशी बंगल्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम येणार असल्याची माहिती आरोपींना मिळाली. त्यानुसार त्यांनी संपूर्ण कट रचला. मात्र, बंगल्यात त्यांना केवळ पाच हजार रुपये मिळाले. दरोडेखोरांनी तक्रारदाराला दागिने आणि रोख रक्कम कुठे आहे, याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी कोणतीही रोख रक्कम घरात नसल्याचे सांगितले. दरोडेखोरांनी सर्व कपाटांमध्ये शोध घेऊन एक पिशवी भरून दागिने जमा केले. आरोपींनी वॉकी टॉकीचा वापर केला. मोबाईल संचाचा वापर केल्यास तांत्रिक तपासात लवकर पकडले जाऊ, या भीतीने आरोपींनी मोबाईल संचाचा वापर टाळल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्ह्यात वापर झालेल्या मोटारीची ओळख पटवून १२०० किलोमीटर पर्यंत पाठलाग केला. या अंतरात २०० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. आरोपींनी वापरलेल्या मोटारीला मराठी भाषेत बनवलेली बनावट नंबर पाटी वापरली होती. रस्त्यात एका ठिकाणी ही पाटी बदलून आरोपींनी मूळ पाटी बसवून प्रवास केला. सुरेशला शामनगर जयपूर येथून अटक केली. त्याच्याकडून चार वॉकी टॉकी, दोन मोबाईल संच, कागदपत्रे, मोटार जप्त केली. महिपालला तळेगाव येथून अटक केली. त्याच्याकडून बनावट नंबर पाटी, नकली दागिने, घड्याळ जप्त केले आहे. दरोडा घातल्यानंतर आरोपींनी दागिन्यांची पाहणी केली असता बहुतांश दागिने खोटे असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी खोटे दागिने महिपालकडे ठेवले होते.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर पोलीस पथके आहेत. त्याला आणि आरोपी महिलेला लवकरच अटक केली जाईल. ही कामगिरी करणाऱ्या पथकाला पोलीस आयुक्तांकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड