
Fatty Liver Health: आजच्या धावपळीच्या जीवनात आपण रोज खात असलेले काही पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात, विशेषतः यकृतासाठी. यकृत आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या शरीरातील 500 हून अधिक महत्त्वाचे कार्य करतो जसे की; शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे, पचनास मदत करणे, उर्जा साठवणे, रक्तासाठी प्रथिने तयार करणे आणि संसर्गाशी लढणे. म्हणूनच, यकृताची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तज्ज्ञांच्या मते, फॅटी लिव्हर (Non-Alcoholic Fatty Liver Disease) ही समस्या भारतात वेगाने वाढत आहे. सुमारे 25 ते 30 टक्के भारतीयांना याचा त्रास आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रोजच्या आहारातील काही सामान्य पदार्थ, जे यकृतात चरबी साठवतात आणि त्याचे कार्य बिघडवतात. जसे की, प्रोसेस्ड शुगरयुक्त पदार्थ जसे कोल्ड ड्रिंक्स, केक, बिस्किटे आणि चॉकलेट्स. यातील फ्रक्टोज हे यकृतात थेट चरबीमध्ये रूपांतरित होते. संशोधनानुसार रोज एक कॅन कोल्ड ड्रिंक पिणाऱ्यांना फॅटी लिव्हरचा धोका 80 टक्क्यांनी वाढतो.
याशिवाय दुसरे धोकादायक पदार्थ म्हणजे तळलेले आणि डीप फ्राय केलेले फ्रेंच फ्राईज, समोसे, वडापाव आणि चिप्स. यातील ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स यकृतात इन्फ्लेमेशन वाढवतात. विशेषतः हिवाळ्यात थंड वातावरणामुळे सर्वांना गरम आणि तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. पण रोज बाहेरील तेलकट पदार्थांचे सेवन केल्यास फॅटी लिव्हरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
तिसरा पदार्थ आहे रिफाइंड तेल आणि मैद्याचे पदार्थ जसे व्हाइट ब्रेड, पास्ता, नान किंवा पिझ्झा. यातील रिफाइंड कार्ब्स रक्तातील साखर जलद वाढवतात आणि यकृतात चरबी साठवतात. तज्ज्ञ सांगतात, हे पदार्थ खाणे टाळल्यास फॅटी लिव्हरचा धोका 50 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणे थकवा, पोटात जडपणा, वजन वाढणे अशी असतात. यावर उपाय म्हणून तुम्ही तुमच्या आहारात होल ग्रेन्स, हिरव्या भाज्या, नट्स यांचा समावेश करू शकता. तसेच नियमित व्यायाम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याशिवाय रोज कमीत कमी 30 मिनिटे चालल्याने यकृत निरोगी ठेवण्यास मदत होते.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)








