इंद्रजित भालेराव8 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पौषातल्या रविवारची सकाळ निसर्गाच्या रंग, गंध अन् आकारात रमवायची. ती मनाला विलक्षण वेगळ्या भावविश्वात न्यायची. कसला तरी उदात्त आनंद मिळवून द्यायची.
सध्या पौष महिना सुरू आहे आणि आज रविवारही आहे. पौष महिन्यातील रविवार विशेष समजला जातो. आमच्याकडं रविवारला आईतवार म्हणायचे. खरं तर हा सूर्याचा वार. रवी म्हणजे सूर्य आणि आदित्य म्हणजे देखील सूर्यच. त्याचं संस्कृत नाव आदित्यवार असंच आहे. त्या आदित्यवाराचंच बोलीत आईतवार झालं. पौष महिन्यातल्या रविवारी सूर्याची पूजा करतात. ती का करतात, ते नेमकं नाही सांगता येणार. असेल त्याचं काहीतरी कारण. पण, लहानपणी पौष महिन्यातील रविवारी सकाळी सकाळी या पुजेचं सामान गोळा करण्याचं काम माझ्याकडं असायचं. ते मला फार आनंददायक वाटायचं. एरवीही घरात अमावस्या, पौर्णिमा असेल आणि त्या दिवशी उटी, उपहार असेल, तर देवाला लागणारी फुलं गोळा करण्याचं काम माझ्याकडंच असे. त्यामुळं त्या दिवशी पहाटेच उठून जिथं कुठं फुलाची झाडं आहेत, तिथं जाऊन फुलं गोळा करण्याचं काम मी करायचो.
तेव्हा फार वेगळी अशी फुलं आमच्या गावात नव्हती. फुलाची कुठली झाडंही नव्हती. फक्त पांढऱ्या आणि तांबड्या रंगाची कण्हेरीची फुलं मात्र तीन – चार ठिकाणी मिळायची. असलीच तर कुणाच्या शेतातल्या बांधावर झेंडूची झाडं असायची. झेंडूचा गडद रंग आणि उग्र वास फार आवडायचा. बाकी बारा मैलात एक चमेलीचं झाडंही होतं. त्याचाही वेगळा गंध यायचा. जाई, जुई, शेवंती, मोगरा, गुलाब ही फुलांची नावंही आम्हाला माहीत नव्हती. कण्हेरीचं एक झाड दतराव बापूराव यांच्या ओढ्याकाठच्या झऱ्यावर होतं, बारा मैलातल्या कॅनॉलवरच्या बंगल्यावर काही झाडं होती. तिथून ही फुलं आणावी लागायची. पण, पौष महिन्यातील रविवारी या फुलांची फारशी गरज नसायची. असली तर चालायची आणि नसली तरी भागायचं.
पौष महिन्यातल्या रविवारी शेतात असलेली प्रत्येक गोष्ट पुजेला असली तरी चालायची. विशेषच वस्तू पाहिजे, असं या पुजेचं नसायचं. पण या पुजेसाठी हरभऱ्याचा डहाळा, वाळूक, बोरं, उसाचं टिपरू, करडईच्या रंगीत फुलांचा केशर अशा शेतातल्या गोष्टी आई हमखास आणायला सांगायची. इतरांच्या घरी पाटावर सूर्य काढून सूर्याची पूजा केली जात असे. सोनार कुटुंबातील माझा मित्र प्रभाकर याच्या घरी त्याची आई पाटावर सुंदर सूर्याचं चित्र काढून त्याची पूजा करायची. पण, आमच्या घरी सूर्य काढला जात नसे. आमचे जे महानुभावांचे देव देव्हाऱ्यात आहेत, त्यासमोरच ही सगळी पूजा केली जायची. खरं तर रविवारच्या या पुजेला सूर्याची पूजा म्हणून जास्त महत्त्व असायचं. पण, महानुभावेतर लोक जो जो सण साजरा करतात, त्यांच्या देवाची पूजा करतात, तो सण आपणही साजरा करायचा; मात्र आपल्याच देवाची पूजा करून, अशी महानुभाव अनुयायांची रीत असायची. त्यामुळं आमच्या घरी पुषा रविवारी आमच्याच देवाची पूजा केली जायची. पण, ती करण्याची पद्धत नेहमीसारखी नसायची. अन्य लोकांच्या घरी सूर्याच्या पुजेची जी पद्धत होती, त्या प्रकारेच ही पूजा केली जायची. पाटावर या सगळ्या वस्तू ठेवून त्यांना हळद-कुंकू वाहिलं जायचं.
हा सगळा पाटावर ठेवलेला रानमेवा आणि त्यावर वाहिलेलं हळदी-कुंकू, देवासमोर लावलेला तेलाचा दिवा किंवा फुलवात, अगरबत्ती हे सगळंच मोठं छान वाटायचं. पाहत राहावं वाटायचं. मांडलेली ही पूजा दिवसभर तशीच देवासमोर ठेवली जायची. संध्याकाळच्या वेळी ती उचलली जायची. इतका वेळ देवाच्या पुजेमध्ये असलेल्या या सगळ्या वस्तू खाण्याची आम्हाला परवानगी मिळायची. त्यामुळे पुजेतलं वाळूक, बोरं, उसाचं कांडं आम्हाला खायला मिळत. हरभऱ्याचा डहाळा खाण्यासारखा असेल, तर तोही आम्ही खायचो.
करडीच्या फुलाचे केशर मात्र खायच्या उपयोगाचे नसत. पण, ते डोळ्याला फारच अाल्हाददायक वाटायचे. मला करडीचं फुल खूपच छान वाटायचं. या सगळ्या वस्तू पाटावर मांडून त्यावर करडईच्या फुलाचे केशर पसरले, तरी ते हळदी-कुंकू लावल्यासारखं वाटायचं. कारण हे केशर जर्द लाल आणि गर्द पिवळ्या रंगाचे असायचं. बऱ्याचदा शेतातही हे केशर हातावर घेऊन मी त्याकडं पाहत राहायचो. या गोष्टी फार आनंददायक वाटायच्या. हरभऱ्याच्या झाडाला येणारी जांभळी फुलं, वाळकाच्या झाडाला येणारी पिवळी फुलं, ज्वारीच्या कणसावर येणारा पिवळा फुलोरा या सगळ्याच गोष्टी तळहातावर घेऊन बघत राहाव्यात, असं वाटायचं.
निसर्गानं या वस्तूंना दिलेले आकार, रंग आणि गंध विलक्षण वेगवेगळा असायचा. त्यामुळं पंचेंद्रियांना सुख मिळायचं. रंगानं डोळे निवायचे, गंधानं घ्राणेंद्रिय सुखावायचं, आकारानं मन प्रसन्न व्हायचं आणि मनातल्या मनात खूप आनंद वाटायचा. हे सगळं निसर्गाचं कौतुक आहे, याची तेव्हा जाणीव नसायची. हे काहीतरी विलक्षण आहे, असं मात्र वाटत राहायचं. त्या विलक्षणाकडं पाहात त्याचा अानंद अनुभवाचा. कधी कधी मी ही फुलं पुडीत बांधून ठेवायचो. काही दिवसानंतर त्या पुड्या उकलून पाहिल्या की, त्या फुलांचा रंग नष्ट झालेला असायचा, पण गंध मात्र मोहोळाच्या मधासारखा यायचा. जणू मधमाशा या फुलातून जो गंध नेत असत, तोच इथं साठलेला असायचा.
हरभऱ्याच्या झाडाचा आकार, त्याच्या फांदीचा आकार, त्याच्या पानाचा आकार हे सगळंच काही विलक्षण वाटायचं. ओल्या भाजीची चव भारी वाटायची. हरभऱ्याच्या झाडावर आलेली आंब आमच्या चोळण्याला लागायची आणि चोळण्याला रक्ताचा डाग पडल्यासारखं वाटायचं. त्यामुळं हरभऱ्याच्या पिकातून जाताना थंडीच्या दिवसात पायाला हरभरा झोंबला तरी चालेल, पण चोळणा वर करावा लागायचा. नाही तर त्या चोळण्याला पडलेले डाग नंतर कितीही साबण लावला तरी निघायचे नाहीत. पौष महिन्यातल्या या चार रविवारची सकाळ अशी मस्तपैकी निसर्गाच्या रंग, गंध अन् आकारात रमून जायला भाग पाडायची. ती मनाला विलक्षण वेगळ्या भावविश्वात न्यायची. कसला तरी उदात्त आनंद मिळवून द्यायची.
(संपर्कः inbhalerao@gmail.com)




