डायरीची पाने: तुकोबांचे दिवस

0
16
डायरीची पाने:  तुकोबांचे दिवस


इंद्रजित भालेराव5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

माणसाच्या आयुष्यात नेहमीच काही असे तर काही तसे दिवस येत असतात. दिवस बदलत असतात. सदासर्वदा चांगले दिवस राहत नाहीत आणि नेहमीच वाईट दिवसही असत नाहीत. हे सामान्य माणसाच्या आयुष्यात घडत असतं तसंच ते कवींच्या वाङ्मयीन आयुष्यातही घडत असतं. मोठ्या कवींचं वाङ्मयीन आयुष्य शेकडो वर्षांचं असतं. त्यांचं वाङ्मय, त्यांची कविता लोक शेकडो वर्षे वाचत राहतात. त्या कवितेचं महत्त्व वरचेवर वाढत जातं, कमी होत नाही. पण, त्या वाङ्मयीन आयुष्यातही जिवंत माणसाच्या आयुष्यासारखेच बरे-वाईट दिवस येत राहतात. एखाद्या कवीला अचानक काहीतरी निमित्तानं बरे दिवस येतात. नंतर काही दिवसांनी त्या कवीचे दिवस मागे पडतात आणि दुसऱ्या कुठल्या तरी कवीला बरे दिवस येतात. एखाद्या माणसासारखंच या अभिजात कवींच्या वाङ्मयीन आयुष्याचंही असतं. आठ-दहा दिवसांवर आलेल्या तुकाराम बीजेच्या निमित्तानं हे सगळं आठवलं.

संत तुकाराम महाराजांच्या जीवनकालामध्ये त्यांच्या वाङ्मयीन आयुष्याला चांगले दिवस कधी आले नाहीत. आणि लौकिक आयुष्यातही चांगले दिवस आले नाहीत. त्यांच्या काव्यावर सतत आक्षेप येत राहिले, ते वह्या बुडवण्यापर्यंतच्या टोकाला गेले. यातून तुकोबांच्या वाट्याला कायम दुःख आणि दुःखच आलं. या दुःखातच वयाच्या अवघ्या चाळिशीतच त्यांचा देहांत झाला. पण, त्यानंतर त्यांच्या वाङ्मयीन आयुष्याला मात्र चांगले दिवस आले. अर्थात, पुढच्या तीन-साडेतीनशे वर्षांत त्यांच्या कवितेला बरे-वाईट दिवस येत राहिले. तुकोबांनी आयुष्याशी आणि तत्कालीन समाजाशी दिलेली कडवी झुंज, त्यातून प्राप्त केलेली आध्यात्मिक योग्यता ही लोकांच्या आकर्षणाचा, आपुलकीचा विषय ठरली. त्यातून वाढत गेलेल्या त्यांच्या माहात्म्यामुळे त्यांच्या कवितेलाही चांगले दिवस आले. तुकोबांची कविता लोकांना महत्त्वाची वाटू लागली. याच कवितेसाठी तुकोबांनी आपलं आयुष्य पणाला लावलं होतं, आपली कविता जगण्यातून खरी करून दाखवली होती. संप्रदायातही या संतकवीला, त्यांच्या कवितेला खूप मान्यता मिळाली. तुकोबांचे अभंग हळूहळू मराठी संस्कृतीचा अपरिहार्य भाग बनत गेले.

मधल्या काळात ही कविता मागे लोटण्याचा प्रयत्न झाला. पण, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. या कवितेवर त्या काळात अन्याय झाला, हे खरंच. कीर्तनकारांनी तुकोबांचे अभंग कीर्तनात घ्यायला बंदी घालण्यात आली. ब्रिटिशांच्या काळात काही ब्रिटिश अभ्यासकांनी तुकोबांच्या गाथेकडे आवर्जून लक्ष दिलं. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तुकोबांची गाथा सरकारच्या वतीने प्रकाशित केली. आणि पुन्हा एकदा तुकोबांच्या वाङ्मयाकडं लोकांचं लक्ष वेधलं गेलं. प्रार्थना समाजानं आपल्या नित्य भजनावलीत तुकोबांचा आवर्जून समावेश केला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या काही मित्रांनी तुकाराम अभ्यास मंडळ स्थापन करून त्यांच्या अभंगांचा चिकित्सक अभ्यास करायला सुरुवात केली. आठवड्यातला एक वार ठरवून त्या दिवशी हे सर्व विद्वान अभ्यासक एकत्र येत आणि तुकोबांचा एक अभंग चर्चेला घेत. प्रत्येकाची मतमतांतरे नोंदवत, त्या अभंगाचा अर्थ निश्चित करण्याचा प्रयत्न करीत. अशा चिकित्सक मांडणीचे दोन खंड तेव्हा प्रकाशित झाले होते. त्याची नवी आवृत्ती साहित्य अकादमीने मुद्दाम काही वर्षांपूर्वी प्रकाशित केली. पण तरीही संत तुकाराम वाङ्मयीन अभ्यासापासून दूरच राहिले होते. आतापर्यंत सगळे जण तुकोबांकडं आध्यात्मिक अंगानेच पाहत होते. थोड्या पुढच्या काळात ज्ञानदेवांच्या एकूणच वाङ्मयाचा अभ्यास होऊ लागला. विविध विद्यापीठांतील अभ्यासक ज्ञानदेवांच्या वाङ्मयाकडं वाङ्मयीन अंगानं पाहू लागले. विविध अंगांनी ज्ञानदेवांच्या वाङ्मयाची चिकित्सा होऊ लागली.

पुढं स्वातंत्र्योत्तर काळात बहुजन समाजातून नवी पिढी उदयाला आली. त्यातून तुकोबांच्या वाङ्मयाचे जाणते अभ्यासक निर्माण झाले, त्यांनी तुकोबांचा वाङ्मयीन अभ्यास सादर करायला सुरुवात केली. त्याच वेळी तुकोबा सामाजिक अंगानेही अभ्यासले जाऊ लागले. किंबहुना वाङ्मयीन आणि सामाजिक अभ्यासकांमध्ये चढाओढच सुरू झाली. यामध्ये भालचंद्र नेमाडे, अरुण कोलटकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, सदानंद मोरे, म. सु. पाटील, आ. ह. साळुंखे आदींनी संत तुकारामांवर लिहायला सुरुवात केली. तुकारामांच्या कवितेची वाङ्मयीन आणि सामाजिक चिकित्सा होऊ लागली. तुकारामांचं वाङ्मयीन मोठेपण पुढे येऊ लागलं. यातील काही जण निखळ वाङ्मयाचे अभ्यासक होते, तर काही जण पूर्ण सामाजिक अंगानं तुकोबांचा अभ्यास करणारे होते. सदानंद मोरे यांच्यासारखे बहुविध अंगाने तुकोबांकडे पाहणारे अभ्यासकही होते, जे तुकोबांच्या वंशातूनच पुढं आलेले होते. तेव्हापासून अनेकांनी विविध अंगांनी तुकोबांवर लिहायला सुरुवात केली. अगदी अलीकडं ‘अखईं तें झालें’ या नावाचं एक पुस्तक समीर चव्हाण या लेखकानं दोन खंडात सिद्ध केलं आहे. समीर हे ‘आयआयटी’सारख्या तांत्रिक विद्यापीठातले विद्वान. पण, त्यांनी भारतीय परिप्रेक्षात तुकोबांना पाहण्याचा, तपासण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न या अभ्यासातून केला आहे. तो अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. अगदी सुरुवातीच्या काळात नेमाडे, चित्रे, मोरे यांनी ज्या पद्धतीनं तुकारामांकडे वेगळ्या अंगानं पाहिलं आणि सादर केलं, तसाच हा प्रकार आहे. म्हणजे एका अर्थाने अजूनही तुकोबांच्या वाङ्मयीन आणि सामाजिक अभ्यासाचे, आकलनाचे दिवस संपलेले नाहीत.

आता अनेक हौशी अभ्यासकही पुढं सरसावल्याने तुकोबांवरील शेकडो पुस्तकं बाजारात येऊ लागली आहेत. त्यातही अधूनमधून ‘अखईं तें जालें’सारखे अतिशय गंभीर स्वरूपाचे अभ्यास प्रकल्पही सादर होत आहेत. असे लोक आपलं आयुष्यच पणाला लावून हे अभ्यास लोकांसमोर सादर करत असतात. त्यांना कुठलंही वाङ्मयबाह्य कारण त्यासाठी लागत नसतं. उत्कट आत्मिक ओढीनं ते या अभ्यासाकडे वळलेले असतात. अशा लोकांना वाचकांनी आवर्जून उत्स्फूर्त दाद दिली पाहिजे. ते चांगल्या वाचकांचं कर्तव्यच असतं.

(संपर्कः inbhalerao@gmail.com)



Source link