गोष्ट सांगतो ऐका: राहून गेलं…!

0
18
गोष्ट सांगतो ऐका:  राहून गेलं…!


अरविंद जगताप3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपली स्वप्नं कधीच पूर्ण होणार नाहीत, याची वृंदाला खात्री आहे. कधी कधी तिला वाटतं, स्वप्न पडली नसती तर खूप बरं झालं असतं. पण, ते आपल्या हातात नसतं. सकाळपासून वृंदा अगदी प्रसन्न मूडमध्ये होती. उठून आधी नवऱ्याच्या हातात चहा नेऊन दिला. रोजच्या प्रमाणे आवरावर करून नाश्ता बनवला. रोजच्या पेक्षा आज जरा जास्तच नटली होती वृंदा. पण, नेहमीसारखंच राकेशच्या ही गोष्ट लक्षात आली नाही. तो पेपर वाचण्यात मग्न होता. वृंदाही घाईत होती. ती बाहेर पडली. ऊन नव्हतं, त्यामुळं चालायला बरं वाटत होतं. काही वेळाने ती थांबली. अजून तिची मैत्रीण आली नव्हती.

साडी नीटनेटकी करत वृंदा उभी राहिली. राकेश आणि ती कर्नाटकात गेले होते, तेव्हा ही साडी विकत घेतली होती. वृंदाला फिरायची खूप हौस, पण राकेश घरकोंबडा. वृंदाला खूप राग यायचा या गोष्टीचा. ती विचार करत होती. अशा कितीतरी गोष्टी होत्या राग येण्यासारख्या. राकेशने कधी नव्वदच्या वर स्पीडने बाइक चालवली नाही. वृंदाला खूपदा वाटायचं की, उतरून पायी पायी जावं. पण, राकेशला वेगात जाणं मान्य नव्हतं. वृंदाला वाटायचं, त्याने एकशेवीसच्या स्पीडने गाडी चालवावी. राकेश रोज शेव्हिंग करतो. ही गोष्टही तिला आवडत नाही. त्याने दाढी वाढवावी, अशी तिची इच्छा. पण, राकेशला ते अजागळ वाटायचं. त्याची कॉलेजपासून सवय होती.. क्लीन शेव्ह. राकेश जेवताना आवाज करतो. घास चावताना मोठ्याने होणारा चक.. चक असा आवाज वृंदाच्या डोक्यात जातो. खासकरून घरी कुणी पाहुणे असतील किंवा दोघं कुणाकडं जेवायला गेले असतील, तर वृंदाला तो आवाज सहनच होत नाही. ती सारखी राकेशकडं बघत असते. पण, ही गोष्ट खूपदा राकेशच्या लक्षात येत नाही. आपण घटस्फोट घेतला तर पहिलं कारण हेच लिहायचं, असं वृंदाने ठरवून टाकलं होतं.. नवरा जेवताना आवाज करतो.

घटस्फोट घ्यायचा पाच वर्षात पाचशे वेळा तरी विचार आला असेल तिच्या डोक्यात. रागारागात ती पन्नास वेळा बोललीही असेल राकेशला. पण, खूप गोष्टी राहून जातात. कार घ्यायची राहून गेलीय. रो हाउस घ्यायचं राहून गेलंय. सध्या फ्लॅट आहे. पण, त्याला बाल्कनी नाही. वृंदाला झाडांची खूप आवड आहे आणि खिडकीत कुंडी ठेवता येत नाही. त्यात पाणी पडलं, तर खालच्या मजल्यावरचे लोक बोंब मारतात. तुळस लावायची पण चोरी. म्हणून वृंदाला रो हाऊस हवंय. खूप झाडं लावता येतील. अंगण असेल. बाल्कनी असेल. बाल्कनीतल्या झाडांमध्ये ती आणि राकेश चहा घेत बसतील.. अशी काय काय स्वप्न तिनी पाहिलेली आहेत. पण, त्या स्वप्नांच्या दिशेने जायला जो वेग लागतो, तो राकेशकडे नाही. हिमालय चढणाऱ्या गोगलगायीसारखा वाटतो तिला राकेश. आपली स्वप्नं कधीच पूर्ण होणार नाहीत, याची तिला खात्री आहे. पण, स्वप्नं पडतात. डोळे मिटून घेतले तरी. किंबहुना डोळे मिटल्यावरच स्वप्नं पडतात. कधी कधी तिला वाटतं, स्वप्न पडली नसती तर खूप बरं झालं असतं. पण, ते आपल्या हातात नसतं.

लग्न झालं तेव्हा तर किती स्वप्नं होती वृंदाची. हनिमूनला परदेशात जायचं होतं तिला. दोन-तीन महिने तिने वेगवेगळ्या देशांच्या टूरचा हिशेब काढला. सुरूवात लंडनपासून. मग ग्रीस. मग जपान. मग भूतान. अखेर तिनं नेपाळचा पर्याय दिला राकेशला. पण, त्याला तेही अवास्तव वाटत होतं. शेवटी दोघं महाबळेश्वरला गेले. ते गेले त्या दिवशी महाबळेश्वरला एवढा पाऊस झाला की दोघं रूमबाहेर निघूच शकले नाहीत. तीन दिवस फक्त पाऊस. शेवटी परतीचा दिवस उजाडला आणि आणि पाऊस उघडला.

वृंदा म्हणाली, दोन दिवस थांबू. पण, राकेशला कंपनीतून सुटी मिळणार नव्हती. एवढा राग आला होता तिला.. तीन – चार दिवस बोललीच नव्हती ती राकेशशी. पण, पुढं रागवायचं राहून गेलं. ओव्हन घ्यायचं राहून गेलं. राकेश म्हणाला की घरात ओव्हन असलं की शिळं खायची सवय लागते. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी राहून गेल्या. तिला नवऱ्यासोबत रील्स बनवायच्या होत्या इन्स्टाग्रामवर. पण, राकेश तयार झाला नाही. त्याला तो प्रकार खूप बालिश वाटतो. वृंदाच्या मैत्रिणी नवऱ्यासोबत रील्स टाकतात दर दोन-चार दिवसाला. त्या बघून वृंदाचा तडफडाट होतो. रील्ससाठी एखादा नवरा करावा, असं मनात येतं. पण तेही राहून जातं.

खूप सिनेमे बघायचे राहून गेले. शाहरुखचा सिनेमा तर थिएटरमध्ये बघायलाच पाहिजे, असं तिला वाटतं. आणि नवऱ्याला शाहरुख अजिबात आवडत नाही. एकदा राकेश म्हणाला, शाहरुख आता म्हातारा झालाय, बघवत नाही. वृंदाला किती राग आला होता. घटस्फोट घेताना पहिलं कारण हेच लिहायचं, असं ठरवलं होतं तिनं. मागच्याच महिन्यात तिनं एक भारी कॅण्डल आणली. मस्त चायनीज बनवलं. राकेश घरी आला. आवरलं. वृंदाने लाइट घालवले. कॅण्डल लावली. ताट वाढलं. कॅण्डल लाइटचा बेत होता तिचा घरच्या घरी. पण, राकेशने एका मिनिटात कॅण्डल विझवून टाकली. उगाच धूर होतोय म्हणून. एवढा राग आला होता वृंदाला. त्या कॅण्डलचा एक तरी चटका द्यावा राकेशला, असं रात्रभर तिच्या डोक्यात येत राहिलं. पण, तेही राहून गेलं. त्यानं कॅण्डल मालवली म्हणून घटस्फोट घ्यावा, असं तिला वाटलं. अशी कारणं अनेक होती.

तिला एकदा गोव्याला जायचं होतं. समुद्र वगैरे कारणं होतीच. पण, तिला शॉर्टस घालून बीचवर फिरायचं होतं राकेशसोबत. पण, राकेशला शॉर्टस या प्रकाराचाच तिटकारा होता. तो म्हणाला, लोक कसे विचित्र बघतात शॉर्टस घातलेल्या बायकांकडे.. मग ते पण राहून गेलं. वृंदाची इच्छा होती की तिच्या सगळ्या बहिणी कशा त्यांच्या घरी गेट टुगेदर करतात. तसं आपल्या घरी एक गेट टुगेदर ठेवावं. पण, ते ऐकता क्षणी राकेश म्हणाला की, आपल्या घरात एवढी जागा आहे का? या तर तिनं राकेशला सांगितलेल्या गोष्टी. पण, अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या वृंदाच्या डोक्यात आल्या आणि त्या तशाच राहून गेल्या. डोक्यातच. कारण राकेश त्या ऐकून नाहीच म्हणणार आहे, याची तिला खात्री होती. जसं की तिला एक कुत्रा पाळायची इच्छा होती घरात. एकदा दोघांनी डान्स करावा, असं होतं तिच्या डोक्यात. एकदा फक्त आणि फक्त तिच्यासाठी राकेशने उगीच सुटी घ्यावी, असं होतं तिच्या डोक्यात. पण, हे तिनं कधी बोलूनही दाखवलं नाही.

आताही ती चालतंच होती. मैत्रिणीची वाट पाहण्यात हेही राहून जाऊ नये म्हणून. एवढ्या सगळ्या गोष्टी डोक्यात येत होत्या, पण तिचं मनातल्या मनात मोजणं चालू होतं. ही तिची सातवी फेरी होती वडाला. आज वटसावित्री पौर्णिमा. म्हणून तर एवढी नटूनथटून आली होती वृंदा. उगीच नवऱ्यावरच्या रागात हेही राहून गेलं, असं नको व्हायला.

(संपर्कः jarvindas30@gmail.com)



Source link