गोष्ट सांगतो ऐका…: प्रसिद्ध चित्रपट लेखक अरविंद जगताप यांची ‘चाळीस रुपयांची गोष्ट’ जरूर वाचा!

0
16
गोष्ट सांगतो ऐका…: प्रसिद्ध चित्रपट लेखक अरविंद जगताप यांची ‘चाळीस रुपयांची गोष्ट’ जरूर वाचा!


अरविंद जगताप10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अमरदीपला हळूहळू जखमांची जाणीव झाली. मुका मार जास्त होता. रात्री वेदना असह्य होत होत्या. तो बेडवरून हलू शकत नव्हता. जवळचे लोक भेटायला येत होते. हळहळत होते. जवळपास सगळ्यांनी, ‘नाकेवाले माजलेत..’ हीच गोष्ट रिपीट केली. पण, ‘आपण कशाला त्यांच्या नादी लागायचं?’ असा सल्ला द्यायला विसरले नाहीत. मात्र, गोष्ट एवढ्यावर संपली नव्हती…

अमरदीपचं शेत हायवेला आहे. चार वर्षापूर्वी अचानक हायवेच्या लोकांना लॉटरी लागली. हायवे चार पदरी होणार म्हणून रोड टच जमिनीला चांगला भाव आला. सरकारने पण जमीन चांगल्या भावात घेतली लोकांची. म्हणून कुणी फार विरोध केला नाही. ज्यांची सगळीच जमीन गेली त्यांनी आढेवेढे घेतले. पण, अशा थोड्याफार गोष्टी सोडल्या, तर फार गोंधळ झाला नाही. विरोध फक्त अमरदीपचा होता. कारण त्याची जमीन टोलनाक्यात जाणार होती. हायवेपेक्षा जास्त जमीन लागते टोलला. खूप विरोध करूनही काही फायदा झाला नाही. अमरदीपला निमूटपणे जमीन द्यावी लागली. रस्ते सुधारले, तर गाव सुधारेल, राज्य सुधारेल, देश सुधारेल, असा उपदेशही केला लोकांनी. अमरदीपने ऐकून घेतलं. टोलच्या बाजूला उरलेली जमीन कसू लागला. हळूहळू हायवेचं काम पूर्ण झालं. टोल सुरू झाला. वेगात जाणाऱ्या गाड्या ही गावासाठी कौतुकाची गोष्ट होती. आधी त्या रस्त्याला सावकाश जाणाऱ्या गाड्यांची सवय होती.

अचानक गाड्या शंभरच्या वेगानं धावू लागल्या. आता लोकांना आपल्याच गावात रस्ता क्रॉस करायची भीती वाटू लागली. रस्ता बदलला की गोष्टी किती बदलतात, याचा अनुभव त्यांना येऊ लागला. पूर्वी गावाच्या हॉटेलवर गाड्या थांबायच्या. चहा-पाणी, नाश्ता व्हायचा. गावात रस्त्यावर आठ – दहा हॉटेल झाली होती. पण, आता गाड्या थांबत नाहीत. का थांबतील? वेगामुळं खूप गोष्टी बदलतात. विकासाचा वेग खूप लोकांचं नुकसान करणाराही असतो. पण, वेगाच्या भरात ते कुणाच्या लक्षात येत नाही. आणि प्रत्येकाला जगाच्या वेगासोबत बरोबरी करण्याशिवाय पर्याय नसतो. ज्या रस्त्यावर फुकट जाता येत होतं, तिथं आता चाळीस रुपये टोल होता. जवळ जाणारे लोक कशाला चहापाण्यात पैसे घालवतील? लांब जाणारे लोक पार्किंगला छान सावली, एसी हॉटेल आणि पेट्रोल असणाऱ्या ठिकाणी थांबणार. गणित सोपं होतं. कुणाची काही तक्रार नव्हती. फक्त अमरदीप त्या दिवशी तालुक्याला जायचं म्हणून गाडी घेऊन निघाला आणि गणित बिघडलं. टोलनाक्यावर त्याला टोल मागितला. अमरदीप हैराण झाला. टोल त्याच्या जमिनीत होता. पण, नाकेवाला ऐकत नव्हता. त्याला वरून तसा काही आदेश नव्हता. सगळ्या गाड्यांना टोल होता.

टोलवर नेहमी मागच्या गाड्यांच्या हॉर्नचा कलकलाट होतो, तसा तो सुरू झाला. अमरदीप ऐकायला तयार नव्हता. नाकेवाला त्याला टोल भरल्याशिवाय सोडायला तयार नव्हता. त्याच्या नोकरीचा प्रश्न होता. अचानक नाक्यावर गोंधळाची परिस्थिती झाली. हॉर्नचे आवाज वाढू लागले. नाक्यावरचे दोन – तीन लोक आले. पण, अमरदीप आता जास्तच रागावला होता. नाक्यावर अचानक असं तणावपूर्ण वातावरण तयार झालं होतं. अशावेळी ज्याच्या गाडीमुळं हे सगळं सुरू असतं, त्याचं ब्लडप्रेशर आपोआप वाढलेलं असतं. सगळं जग त्याच्या विरोधात गेलंय, असा त्याला भास होऊ लागतो. त्यात हॉर्नचे आवाज एखाद्या युद्धाचा भास निर्माण करतात. आणि ज्याची गाडी असते, तो एकटा विरुद्ध सगळं जग असं वातावरण झालेलं असतं. आताही तेच झालं होतं. चाळीस रुपयांचा प्रश्न होता. पण, अमरदीप आता ते भरणार नव्हता. माझ्याच गावात मला टोल भरायला लागतो, म्हणजे काय? ते सुद्धा नाका माझ्या शेतात उभा असताना. नाकेवाला म्हणत होता, ‘तुम्हाला जमिनीचे पैसे मिळालेत..’ अमरदीप म्हणत होता, ‘मी काय आमंत्रण दिलं होतं का? तुम्ही बळजबरी जमीन घेतली..’ शब्दाने शब्द वाढत गेला. अमरदीप म्हणत होता, ‘कसा टोल घेता, तेच बघतो!’ आता नाकेवाले दिवस -रात्र रस्त्यावर असतात. ते काही तयारीशिवाय बसलेले नसतात. नाक्याचा अधिकारी आला.

अमरदीप आणि त्याची बाचाबाची झाली. प्रकरण शिवीगाळीवर गेलं. हॉर्नचे आवाज त्यात भर घालत होते. ताण टोकाला गेला. हात उचलला गेला. बघता बघता चार – पाच लोकांनी अमरदीपला मारायला सुरूवात केली. एवढा मारला त्याला की त्याचे कपडे फाटले. चेहरा ओळखू येईनासा झाला. भलत्याच माणसाने गाडी बाहेर काढली. हॉर्न वाजवणारे निघून गेले. पुन्हा शांतता झाली. अमरदीप विव्हळत होता. गावातल्या काही लोकांनी त्याला दवाखान्यात नेऊन भरती केलं.

अमरदीपला हळूहळू जखमांची जाणीव झाली. मुका मार जास्त होता. रात्री वेदना असह्य होत होत्या. तो बेडवरून हलू शकत नव्हता. जवळचे लोक भेटायला येत होते. हळहळत होते. जवळपास सगळ्यांनी, ‘नाकेवाले माजलेत..’ हीच गोष्ट रिपीट केली. पण, ‘आपण कशाला त्यांच्या नादी लागायचं?’ असा सल्ला द्यायला विसरले नाहीत. मात्र, गोष्ट एवढ्यावर संपली नव्हती. रातोरात अमरदीपच्या शेतात दोन जेसीबी शिरल्या होत्या. नाक्याच्या शेजारची शेती. सगळं पीक उद्ध्वस्त करून टाकलं जेसीबीनं. सगळी जमीन सपाट. लोक मध्यरात्री अमरदीपला सांगायला आले. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. पण, तो काही बोलू शकला नाही. हालचाल करायची तर त्याची अवस्थाच नव्हती. तो तसाच तळमळत पडून राहिला. रात्री जेसीबीच्या लाइटमध्ये पीक उद्ध्वस्त होताना बघायला खूप लोक जमले. नाक्यावरचे लोक पण बघत होते. त्यातले एक – दोन जण अभिमानाने म्हणाले, ‘आपल्या साहेबाला नडला होता, आता बरबाद झाला. साहेबाचा नाद करायचा नाय..’

अमरदीपचं ब्लड प्रेशर रात्रीत जास्तच वाढलं होतं. डॉक्टरला झोपेतून उठवावं लागलं. सकाळी अमरदीप गाढ झोपला होता. बायकोसारखी त्याला उठवायचा प्रयत्न करत होती, पण अमरदीप काही भानावर येत नव्हता. म्हणता म्हणता बरेच लोक जमले. सगळे चिंतेत होते. पण डॉक्टरचं म्हणणं होतं, चिंता करायची गरज नाही, ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. औषधामुळं गाढ झोप लागलीय. सगळे अमरदीप शुद्धीवर येण्याची वाट बघत होते. बायको रडत होती. प्रकरणाने भलतंच वळण घेतलं होतं सकाळपासून. दवाखान्याबाहेर जमलेले लोक हैराण होते. कुजबूज चालू होती. बाहेर पोलिसांची गर्दी वाढत होती. पत्रकार जमले होते. टीव्हीवाले पण आले होते. एवढं काय झालं होतं? नाक्याचा साहेब अमरदीपला भरती केलं होतं, त्या खोलीबाहेर बसून होता. अगदी अपराधी चेहऱ्यानं. अचानक हा बदल कसा काय झाला होता? एका सामान्य शेतकऱ्यासाठी एवढे लोक कसे काय जमले? चाळीस रुपयांच्या प्रश्नासाठी आता दवाखान्यापाशी चार-पाचशे आणि नाक्यापाशी चार – पाच हजार लोक जमा झाले होते. कारण रातोरात अमरदीपच्या शेतातलं पीक भुईसपाट झालं होतं, ते दुसरं कुणी नाही तर अमरदीपनेच करायला लावलं होतं. जेसीबीवाल्यांनी दोन एकर शेत सपाट करून सकाळी टोलनाक्याच्या बाजूने रस्ता सुरू केला होता. सगळ्या वाहनांना मोफत प्रवेश. टोल न भरता थेट अमरदीपच्या शेतातून जायचं. लोकांना वेड लागायचं बाकी होतं. लांबून येणाऱ्या गाड्यांना दोनशे रुपये टोल होता. कशाला भरायचा? गाड्या थेट शेतातून जाऊ लागल्या. टोलनाकावाले हैराण झाले. साहेबांनी डोक्यावर हात मारून घेतला. हे बेकायदेशीर आहे, म्हणू लागले.

शेतातला रस्ता बंद करायला पोलिसांवर दबाव आणू लागले. पण, अमरदीप शुद्धीवर येत नाही तोपर्यंत काही करणं शक्य नव्हतं. लोकांनी राडा केला असता. फक्त डॉक्टरांना माहीत होतं की, अमरदीप मुद्दाम झोपेचं सोंग घेऊन पडलाय. त्यांनाही समजत होतं, झोपेचं सोंग घेणाऱ्या व्यवस्थेशी कधी कधी असंच वागावं लागतं. दिवसभर लोक बघत राहिले.. बेडवर निपचित पडलेला अमरदीप अन् सुनसान टोलनाका…

(संपर्कः jarvindas30@gmail.com)



Source link