खलनिग्रहणाय: किल्लारी भूकंपानंतरचे धक्के आठवताना…

0
14
खलनिग्रहणाय:  किल्लारी भूकंपानंतरचे धक्के आठवताना…




लातूर-उस्मानाबादमधील विनाशकारी भूकंपाला नुकतीच ३१ वर्षे झाली. या भूकंपग्रस्त भागात काम करताना मिळालेले अनुभव आयुष्यभर विसरता येणार नाहीत. तेव्हा माणसाच्या जगण्याचा क्षणभंगूरपणा जाणवलाच; पण दु:ख, विरह, असहायता, प्रेम, औदार्य, लोभ, मोह.. अशा कितीतरी भावभावनांचे दर्शन एकाच वेळी घडत होते… तो दिवस होता ३० सप्टेंबर १९९३. त्या वेळी मी पंढरपूर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत होतो. पंढरपूर शहरातील गणपती विसर्जन मिलवणुकीचा बंदोबस्त संपवून नुकताच घरी आलो होतो. पहाटेचे साडेतीन-पावणेचार वाजले असावेत. काही क्षणांत म्हणजे, ३ वाजून ५६ मिनिटांनी जमीन हादरू लागली. दोन-चार सेकंद नेमके काय होतेय, ते कळले नाही. पण, लगेच लक्षात आले की, हा भूकंपाचा मोठा धक्का आहे. तेवढ्यात पंढरपूर शहर पोलिस निरीक्षकांचा फोन आला की, भूकंपाने शहरात अनेक जुन्या घरांची मोठी पडझड झाली आहे, त्याखाली अनेक लोक दबले आहेत. माझी चार वर्षांची मुलगी या धक्क्याने घाबरली होती, ती मला घट्ट पकडून रडत होती. तिची समजूत घालून पत्नीला सांगून घराबाहेर पडलो. शहरात सगळीकडे लोक रस्त्यावर उभे होते. सर्वांच्या चेहऱ्यावर भीती दाटली होती. शहरातील जुन्या, मध्यवर्ती भागात फिरलो, तर अनेक घरे पडली होती. काही लोकांचा मृत्यू झाला होता, अनेक लोक जखमी झाले होते. शहरात सगळीकडे पाहणी करून सकाळी सहाच्या सुमारास मी पोलिस स्टेशनमध्ये येऊन बसलो. त्यानंतर कळले की, लातूर आणि उस्मानाबादमध्ये (तत्कालीन नाव) भूकंपामुळे हाहाकार झाला आहे, तिथे हजारो लोक मरण पावले आहेत. दुसऱ्याच दिवशी, १ ऑक्टोबरला माझी पदोन्नती झाली आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून माझी उस्मानाबादला नेमणूक करण्यात आली. पंढरपूरचा चार्ज ताबडतोब सोडून उस्मानाबादला रुजू होण्याचा आदेशही सोलापूर पोलिस कंट्रोल रूममधून आला. मी पत्नी आणि मुलीला बिहारमधील मूळगावी पाठवून उस्मानाबादला रवाना झालो. तत्कालीन पोलिस अधीक्षक विष्णुदेव मिश्रा साहेबांशी संपर्क केला आणि मला आदेश मिळाला की मी उमरग्याला पोहोचावे. २ ऑक्टोबरला मी उमरग्याला पोहोचलो. तिथे मिश्रा साहेब आणि औरंगाबादचे डीआयजी चक्रवर्ती साहेब तिथे तळ ठोकून होते. उस्मानाबादच्या सास्तूर गावात सर्वाधिक हानी झाली होती. त्या गावात आणि परिसरातील गावांमध्ये जवळपास ४ हजार लोक मृत्युमुखी पडले होते. लातूरमधील किल्लारी हे गाव भूकंपाचे केंद्रबिंदू होते. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे ९ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. अतिशय भयानक आणि बिकट अशी ही परिस्थिती होती. सुरूवातीला पोलिस घटनास्थळांवर पोहोचले; पण त्यांनाही एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असल्याची जाणीव नव्हती. घरांमध्ये दबलेल्या लोकांना बाहेर काढणे अतिशय कठीण होते. जखमींना दवाखान्यात घेऊन जाणेही एवढे सोपे नव्हते. स्वयंसेवी संस्था आणि लोकांच्या मदतीने आम्ही जखमींना दवाखान्यात पोहोचवत होतो. तोपर्यंत मदतीसाठी अनेक संघटना पुढे आल्या होत्या. सगळी सरकारी यंत्रणा कामाला लागली होती. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार या भागात तळ ठोकून होते. प्रचंड प्रमाणात पोलिसांची कुमक भूकंपग्रस्त भागात पाठवण्यात आली होती. या सगळ्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय करणे हे एक आव्हान होते. पण, स्थानिक लोकांच्या मदतीमुळे ही व्यवस्था करता आली.
ही आपत्ती प्रचंड विनाशकारी होती. त्यामुळे मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. लष्कर त्या भागात दाखल झाल्यावर या कामाला आणखी गती मिळाली. ताबडतोड तात्पुरते निवारा शेड उभे करण्यात आले. अनेक दवाखानेही उघडण्यात आले. हे काम सुरू असताना पाऊसही पडायचा, त्यामुळे कामात व्यत्यय यायचा. लष्कराशी समन्वय साधण्याचे काम माझ्याकडे देण्यात आले. उमरगा तालुक्यातील पोलिस दलाच्या संपूर्ण नियोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारीही मला देण्यात आली. या संकटातही हात धुवून घेण्यासाठी त्या भागात बाहेरून अनेक चोरटे शिरले होते. त्यांचा बंदोबस्त करतानाही अनेक सामाजिक संस्था आणि सामान्य जनता आमच्या मदतीला आले. भूकंपग्रस्त भागात काही दिवसांत प्रचंड गर्दी झाली आणि पूर्णपणे वाहतूक थांबली. त्यामुळे तो संपूर्ण भागच सील करुन अनधिकृत लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली. या काळात ‘व्हीआयपीं’ची वर्दळही खूप मोठ्या प्रमाणात सुरू होती. अनेक राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच पंतप्रधानही तिथे येऊन गेले. हे सर्व करताना पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण पडत होता. पण, रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून महाराष्ट्र पोलिसांनी चोख कामगिरी बजावली. अशी अनेक घरे होती, जिथले संपूर्ण कुटुंबच्या कुटुंबच मृत्युमुखी पडले होते. काही घरांतील एक वा दोन जण वाचले होते. कित्येक लहान मुलं अनाथ झाली होती, असंख्य स्त्रियांना वैधव्य आले होते, अनेक पुरुषांनी पत्नीला गमावले होते… सगळं दृश्य अत्यंत विदारक अन् हृदय हेलावून टाकणारं होतं.. आम्ही रात्री गस्त घालताना वयोवृद्ध महिला आमच्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडायच्या. अनेक जणींची मन:स्थिती इतकी बिघडली होती की त्या आम्हाला पकडून, ‘तू एवढे दिवस आईला सोडून कुठं गेला होता..?’ असं विचारुन रडू लागायच्या. पोस्ट ट्रॉमेटिक सिंड्रोम फार मोठ्या प्रमाणात दिसू लागला होता. त्यामुळे सरकारने अन्य जिल्ह्यांतून मानसोपचारतज्ज्ञ बोलावून घेतले. अनेक ठिकाणी रामायण आणि ज्ञानेश्वरीची पारायणे सुरू करण्यात आली. यात मन गुंतल्यामुळे पीडितांना बराच धीर मिळत होता. आम्ही अनेक ठिकाणी गावकऱ्यांना गोळा करुन तिथे भजन – कीर्तने सुरू केली. आमचे पोलिस या भजनी मंडळींसोबत रात्री गावांमध्ये जाऊन भजन-कीर्तनात सहभागी व्हायचे. मी स्वत:ही अनेक ठिकाणी प्रवचनाचे कार्यक्रम केले. लोकांच्या मनावर या सगळ्या गोष्टींच्या खूप चांगला परिणाम दिसून आला. भजन, कीर्तन आणि नामजपामुळे मानसिक तणाव दूर होतो व मनावर सकारात्मक परिणाम होतात, हे अनेक शास्त्रीय प्रयोगांमध्ये सिद्ध झाले आहे. लातूर-उस्मानाबादमधील या विनाशकारी भूकंपाला नुकतीच ३१ वर्षे झाली. त्यावेळी भूकंपग्रस्त भागात काम करताना जे अनुभव मिळाले, ते आयुष्यभर विसरता येणार नाहीत. माणसाच्या जगण्याचा क्षणभंगूरपणा तर जाणवलाच; पण दु:ख, विरह, वेदना, असहायता, प्रेम, कणव, औदार्य, लोभ, मोह… अशा कितीतरी मानवी भावभावनांचे दर्शन एकाच वेळी घडत होते. पुढे अनेक वेळा हैदराबादच्या राष्ट्रीय पोलिस अकादमीमधील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांसमोर या भूकंपाच्या काळात आलेल्या अनुभवांवर व्याख्यान देण्याची मला संधी मिळाली. अशा घटना माणसाच्या वाट्याला कधीही येऊ नयेत. पण, दुर्दैवाने अशी आपत्ती आलीच, तर या अनुभवांचे हे संचित नव्या अधिकाऱ्यांना निश्चितच कामी येईल. (संपर्कः bhushankumarupadhyay@gmail.com)



Source link