सातारा; पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षनेते आ. अजित पवार हे फार मीडिया फ्रेंडली नाहीत. त्यांना प्रसिद्धीची फार चिंता नसते. त्यांचा आपले काम पूर्ण करण्यावर भर असतो. त्यांचा स्वभाव कडक आहे. मात्र, त्यांच्याबद्दल काही जणांकडून गैरसमज पसरवले जात असल्याचे मत खा. शरद पवार यांनी व्यक्त केले. राजीनामा नाट्यानंतर खा. शरद पवार हे सातारा जिल्हा दौर्यावर आहेत. शनिवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
खा. पवार म्हणाले, काही लोकांच्या कामांच्या पध्दती या वेगळ्या असतात. काही जणांना हे काम दाखवायचे असते तर काही जण आपले केवळ काम करत असतात. मी कोठेही गेलो तर तुम्ही भेटता. मला वेळ असला तर मी तुमच्याशी संवाद साधतो. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो. मात्र, अजित पवार यांच्याबाबत तसे नाही. अजितदादा फारसे मीडिया फ्रेंडली नाहीत. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की, काही लोक असे असतात ते नुसते काम करतात आणि काही लोक असे असतात प्रसार माध्यमांमध्ये नाव कसे येईल याची काळजी घेतात. अजित पवारांना प्रसिध्दीची चिंता नसते. त्यांना चिंता असते आपण हातात घेतेलेल काम पूर्णत्वास न्यायचे. त्यांचा स्वभाव कडक आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल गैरसमज होतात. माझी विनंती आहे तुम्हाला असे काहीही नाही. ते त्यांचं काम करतायत आणि ते काम राज्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, असेही खा. शरद पवार म्हणाले.