
Truth Behind Sunscreen Causes Vitamin D deficiency: त्वचेची काळजी घेणे हे प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनले आहे. उन्हाळा असो किंवा हिवाळा कोणीही सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर जात नाही. उन्हाच्या प्रखर किरणांमुळे त्वचेला इजा पोहोचेल, त्वचा काळी पडेल, त्वचेवर डाग येतील ही भीती असते. विशेषतः स्त्रिया अधिक प्रमाणात सनस्क्रीनचा वापर करतात. पण त्वचेचे उन्हाच्या किरणांपासून रक्षण करण्यासाठी वापरली जाणारी सनस्क्रीनच तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे मोठे कारण आहे का? असा प्रश्न तुम्हालाही कधी न कधी पडला असेल. चला तर मग यामागचे सत्य जाणून घेऊया.
सूर्याच्या किरणांमध्ये त्वचेला पोषण देणारे आणि व्हिटॅमिन डी पुरवणारे यूवी-बी किरणे असतात. तज्ज्ञांच्या मते सनस्क्रीन वापरल्याने सूर्यप्रकाशामुळे त्वचेला मिळणाऱ्या व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी होऊ शकते, पण पूर्णपणे नाही. सन्सस्क्रीन मधील घटक यूवी-बी किरणांना फिल्टर करण्याचे काम करतात. पण त्यांना पूर्णपणे रोखत नाहीत. त्यामुळे सन्सस्क्रीन वापरल्याने त्वचेला व्हिटॅमिन डी मिळतच नाही हे खोटे आहे. पण हे देखील तुम्ही किती प्रमाणात आणि कोणत्या प्रकारची सन्सस्क्रीन वापरत आहात यावर अवलंबून आहे.
उच्च एसपीएफ (SPF) असलेली सन्सस्क्रीन वापरल्यास ती यूवी-बी किरणांना प्रभावीपणे रोखते. व्हिटॅमिन डीच्या निर्मितीसाठी त्वचेला यूवी-बी किरणांची आवश्यकता असते. उच्च एसपीएफ (SPF) असलेली सनस्क्रीन व्हिटॅमिन डीच्या निर्मितीमध्ये अडथळा आणू शकते. म्हणूनच कमी एसपीएफ (SPF) असलेली सन्सस्क्रीन वापरणे अधिक फायदेशीर ठरते. काही सन्सस्क्रीन असे असतात जे सूर्यप्रकाश पूर्णपणे रोखत नाहीत. यामुळे त्वचेला व्हिटॅमिन डीच्या निर्मितीमध्ये कोणताही अडथळा येत नाही.
काही व्यक्ती दररोज सन्सस्क्रीनचा वापर करतात तरीही त्यांच्या शरीरातील व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी किंवा जास्त नसून योग्य प्रमाणात असते. याचे कारण असे की ते, जास्त प्रमाणाच सन्सस्क्रिनचा वापर करत नाहीत. तुम्हीही हा उपाय करू शकता. शिवाय दिवसातून 15 ते 20 मिनिटे सन्सस्क्रीनचा वापर न करता उन्हात थांबा. यामुळे त्वचेला थेट सूर्यप्रकाश मिळेल आणि व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होईल.
याशिवाय आहारात बदल करूनही तुम्ही व्हिटॅमिन डी मिळवू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात सॅल्मन, मॅकरेल, हेरिंग आणि ट्यूना हे चरबीयुक्त मासे समाविष्ट करू शकता. तसेच दूध, अंडी, मशरूम, तृणधान्ये, संत्र्याचा रस, दही या सर्व पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)






