कोरेगाव, पुढारी वृत्तसेवा : काही लोकप्रतिनिधींना दुसर्यांना शिव्या देणं म्हणजेच सभा जिंकली असं वाटतं. रयत शिक्षण संस्थेविरोधात काहीजण जाणीवपूर्वक बोलत आहेत. पवार साहेब व माझ्याविरोधातही बोलत आहेत. यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे का? आम्हाला शिव्या देण्यापेक्षा काम करा, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते आ. अजित पवार यांनी कोरेगावचे आ. महेश शिंदे यांचा समाचार घेतला. दरम्यान, कोरेगावच्या या महाभागाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्हीच संधी दिली होती. मात्र, आमदार म्हणून काम करत असताना त्याने शिस्त बिघडवून टाकली आहे. आम्ही दिलेल्या संधीचे सोने करण्याऐवजी याने राख केली, अशी खरमरीत टिकाही आ. अजित पवार यांनी केली.
कोरेगाव येथे बाजार समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार व आ. रामराजे ना. निंबाळकर यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ. रामराजे ना. निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील, प्रभाकर देशमुख, सारंग पाटील, सत्यजित पाटणकर, प्रदीप विधाते, सुनील माने, किरण साबळे-पाटील, सतीश चव्हाण, तेजस शिंदे, बाळासाहेब सोळस्कर, शहाजी क्षीरसागर, कांतीलाल पाटील, संभाजी गायकवाड, किशोर बाचल, राजाभाऊ शेलार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. अजित पवार म्हणाले, सध्याच्या सरकारमध्ये अराजकता माजली आहे. आताच्या सरकारमध्ये कोण कोणाला विचारत नाही. कोणीही मंत्रालयात बसत नाहीत. सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून बदल्यांचे रेट ठरवले जात आहेत. अधिकारी बदल्यांसाठी पैसे देत असतील तर सर्वसामान्यांची कामे कशी होणार? सरकार काही ठराविक आमदारांनाच सांभाळत आहे. निधी देताना मुद्दाम आडकाठी आणत आहे. आम्ही सत्तेत असताना सत्तेचा कधीच माज केला नाही, म्हणूनच अधिकारी आजही आम्हाला रिस्पेक्ट देतात. महाराष्ट्रात महापुरूषांबद्दल बेताल वक्तव्य करण्याचे सुरू झालेले काम महाराष्ट्रात यापूर्वी कधी घडले नव्हते.
आ. अजितदादा पुढे म्हणाले, आम्ही राज्याच्या राजकारणामध्ये काम करतो. मात्र, सातारा जिल्ह्यातील अनेक मंडळी आमच्याकडे कामासाठी येतात त्यांची कामे पटकन करून देतो. पालकमंत्री असताना काम केलेला जिल्हा आणि आताची सद्यस्थिती यात खूप फरक आहे. सातार्याची अशी अवस्था यापूर्वी कधीची पाहिली नव्हती.
बाजार समितीच्या निवडणुकीत जिल्ह्यात काही ठिकाणी कमी पडलो. अपयशाने खचून जायचं नाही व यशाचा उन्माद करायचा नाही. या निवडणुकीत 147 पैकी 80 ठिकाणी महाविकास आघाडीच्या स्थानिक पॅनेलची सत्ता आली तर भाजप व सत्ताधार्यांना 47 व 38 ठिकाणी सर्वपक्षीय आघाड्या निवडून आल्या आहेत. या निकालातून राज्यकर्त्यांना जनतेने नाकारल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून धडा घेतला आहे. जनतेने उठाव केल्यानेच बाजार समितीचा निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. यावेळी खोक्याचा पैसा परत घालवायचा, हे माझ्या तालुक्यातील पदाधिकार्यांनी ठरवले आणि करून दाखवले. विधानसभेलाही हेच चित्र दिसेल.
2024 मध्ये या देशात व राज्यात या लोकांचा पराभव करून लोकशाही जिवंत ठेवूया. हे आव्हान मोठे आहे पण आपण एकत्र येवून ही लढाई लढूया. पैसा स्वाभिमानाला विकत घेवू शकत नाही. आमची लढाई गलिच्छ वातावरण करणार्या प्रवृत्तीविरोधात आहे, अशी टीकाही आ. शिंदे यांनी केली. भास्कर कदम यांनी प्रास्तविक केले. श्रीमंत झांजुर्णे यांनी आभार मानले.








