वेब वॉच: पोचर : हस्तिदंत तस्करीच्या तपासाचा चित्तवेधक थरार

0
23
वेब वॉच:  पोचर : हस्तिदंत तस्करीच्या तपासाचा चित्तवेधक थरार


सुहास किर्लोस्कर3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

निसर्ग ओरबाडण्याचे कार्य माणूस निरंतर करत आला आहे. त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. वन्यजीवांची हत्या करून त्यांची कातडी / शिंगे / दातांची तस्करी करण्याचे प्रकार तर पूर्वीपासून चालत आले आहेत. बंगले अन् हवेल्यांमध्ये पेंढा भरलेले वन्यजीव अभिमानाने लावले जात होते. शिकारीच्या अशा प्रकारांमध्ये तेव्हापासून आजपर्यंत वर्षानुवर्षे वाढच होत आली आहे. १९९१ मध्ये भारत सरकारने कोणत्याही वन्यजीवाची शिकार करण्याला कायद्याने बंदी घातली. २०१५ मध्ये पर्यावरण संरक्षकांनी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केरळमध्ये हस्तिदंत हस्तगत करण्यासाठी केल्या जाणाऱ्या हत्तींच्या हत्या करणाऱ्यांची टोळी पकडली, त्यातून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांचे रॅकेट उजेडात आणले. या सत्य प्रकरणावर आधारित ‘पोचर’ ही वेबसिरीज प्राइमवर नुकतीच रिलीज झाली आहे. जंगलाच्या पार्श्वभूमीवरील ही सस्पेन्स – थ्रिलर कथा एकेका भागातून उलगडत जाते. त्यामुळे आठ भागांचा पहिला सीझन सलगपणे बघितला जातोच, पण त्या पलीकडेही या वेबसिरीजमध्ये बघण्यासारखे बरेच काही आहे.

केरळच्या वन विभागाने २०१५ मध्ये ४१ जणांवर हस्तिदंताची तस्करी करण्यासाठी हत्तींची शिकार केल्याचे आरोपपत्र ठेवले. कोलकात्याच्या महसूल विभागाच्या शोध पथकाने एका बापलेकीकडून ३.१४४ किलो वजनाचे ३० लाख रुपये किमतीचे हस्तिदंत हस्तगत केले. तपासामध्ये त्यांना ७२ लाख रुपयांचे हस्तिदंताचे दागिने आणि मूर्ती सापडल्या. हत्तीची हत्या करून, त्यांचे दात चोरून त्यापासून तयार केलेल्या गणेशमूर्ती लाखो रुपयांना विकल्या जातात हा भारतातला विरोधाभास आहे. या तस्करीसाठी केरळमधील मलयत्तूर आणि वज्चाल येथे १४ हत्तींची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वन विभागाच्या टीमला नऊ महिने जे अथक परिश्रम करावे लागले त्यावर रिची मेहता यांनी ही आठ भागांची वेबसिरीज लिहिली आणि दिग्दर्शित केली आहे.

ही घटना केरळमध्येज्या ठिकाणी घडली त्या जंगलामध्येच या सिरीजचे चित्रीकरण केले आहे. निसर्गाचे मनोवेधक चित्रण करताना अंधार-उजेडाचा उत्तम वापर हे तिचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या सिरीजमध्ये लख्ख प्रकाशात घडलेला प्रसंग विरळाच. सिरीजच्या सुरुवातीला माला या नायिकेला एका रस्त्याच्या बाजूला असलेल्या टपरीवजा हॉटेलमध्ये एक खबर मिळते. त्या प्रसंगामध्ये दोघांच्या अर्ध्या चेहऱ्यावर उजेड आहे. हॉटेलमधल्या रेडिओवर बारीक आवाजात एक गाणे ऐकू येते. त्या वेळी आजूबाजूला हिरवा निसर्ग दिसतो, पण त्यामध्ये आवश्यक तेवढाच उजेड आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी तिघांची बैठक भरते. तिथे या तपासकामासाठी नीलची निवड होते त्या वेळी तिथे एका ट्यूबलाइटचा निळसर उजेड पडला आहे. नील हा बंगाली अधिकारी मालाला योग्य त्या सूचना देतो, तो प्रसंग अंधूक तांबूस प्रकाशात विलक्षण प्रभावीपणे घेतला आहे. एकूणच पूर्ण सिरीजमध्ये आवश्यक तेवढाच प्रकाश दाखवण्याचे सातत्य कायम राखले आहे. त्यातून प्रत्येक प्रसंगाचा असा प्रभाव पडतो की, जणू आपण केरळमध्ये त्या तपासकामाचे साक्षीदारच आहोत असे वाटते. मंदार नागावकर यांचे प्रॉडक्शन डिझाइन, ‘दिल्ली क्राइम’फेम जोहान ऐट यांची सिनेमॅटोग्राफी यामुळे केरळच्या जंगलाचे अंतरंग जवळून बघता येते. प्राणी दाखवताना केलेला व्हीएफएक्सचा वापर बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाला आहे.

कथेच्या गरजेनुसार कलाकारांची निवड ही मल्याळम चित्रपटांची / सिरीजची खासियत असते. निमिषा सजयन (द ग्रेट इंडियन किचन, नयट्टू फेम), रोशन मॅथ्यू (डार्लिंग, चोक्ड फेम), दिब्येंदू भट्टाचार्य (रॉकेट बॉइज, मिर्झापूर फेम) हे कलाकार आपापल्या नैसर्गिक संयत अभिनयाने प्रत्येक प्रसंग संस्मरणीय करतात. निमिषा सजयनने मल्याळम चित्रपटात मिळालेली प्रत्येक भूमिका त्या कथेच्या स्वभावानुसार आणि पात्र-लेखनानुसार साकारली आहे. ‘पोचर’च्या आठही भागातील तिचा वावर, निर्धार, तडफ आणि वन्यप्राण्यांच्या हत्येबद्दलची तिची चीड हे सगळेच कमालीचे प्रभावी आहे. प्रसंगाबरहुकूम तिने ज्या पद्धतीने वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या आहेत ते दाद देण्यासारखे आहे. या तपास प्रकरणातील बारकावे आपण तिच्या दृष्टिकोनातून बघतो. त्यामुळे तिच्याबरोबर असण्याचा अनुभव प्रेक्षकांना देण्यात लेखक-दिग्दर्शक रिची मेहता यशस्वी झाले आहेत. रिची मेहता यापूर्वी ‘दिल्ली क्राइम’मुळे नावाजलेले आहेत. मल्याळम चित्रपट / वेबसिरीजमधील पात्र निवड बघताना त्यातील वेगळेपण जाणवत राहते. आपल्याकडे नागराज मंजुळेंचा अपवाद वगळता मराठी चित्रपट ठरावीक चिकण्या चेहऱ्यांच्या पलीकडे जात नाही. त्यामुळे कथा गावाकडची असो वा शहरातली, सगळीकडे तेच ते शहरी चेहरे दिसतात.

अँड्र्यू लॉकिंग्टन यांनी पार्श्वसंगीतामध्ये स्थानिक पक्ष्यांचे आवाज कमालीच्या बारकाव्याने, अभ्यासपूर्वक ऐकवले आहेत. त्याचप्रमाणे वन विभागाच्या मोबाइलचे टोनसुद्धा प्राण्यांच्या आवाजाशी मिळतेजुळते असल्यामुळे प्रेक्षकांना मोबाइल वाजल्याचा धक्का बसत नाही. ‘पोचर’ची कथा मल्याळम, बंगाली, हिंदी या तीन भाषांमध्ये घडते. त्यामुळे ही सिरीज ऑडिओ सेटिंग बदलून हिंदी – इंग्रजी भाषांमध्ये बघण्याचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु, मूळ मल्याळममध्ये ऑडिओ सेट करून इंग्रजी सबटायटल्स बघितल्यास केरळमध्ये असल्याचा अनुभव घेता येईल. केरळच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा अंधार-उजेडातला थरार जितका खिळवून ठेवणारा आहे, तितकाच प्रेक्षणीयसुद्धा आहे.

(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)



Source link