वेब वॉच: कसदार कथांमुळे सरस ठरताहेत दाक्षिणात्य चित्रपट

0
21
वेब वॉच:  कसदार कथांमुळे सरस ठरताहेत दाक्षिणात्य चित्रपट


सुहास किर्लोस्कर11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘पार्किंग’सारखे चित्रपट सर्वसामान्यांना रोज भेडसावणाऱ्या समस्येला ‘स्पेस’ देत आहेत.

अलीकडच्या काळात तामिळ आणि मल्याळी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग वाढतो आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, या चित्रपटांचे कथाविषय सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्याला भिडलेले असतात. आता शहरांमधील पार्किंगचेच उदाहरण घेऊ. दिवसेंदिवस पार्किंगची समस्या तीव्र होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था राजकीय व्यवस्थेच्या हाती असल्याने तिचा दर्जा फारच सुमार आहे. त्यामुळे अनेक जण स्वत:चे वाहन खरेदी करतात. दुचाकी असल्यास पार्किंगचा प्रश्न तितकासा क्लिष्ट वाटत नाही. कार घेतल्यावर मात्र पहिल्यांदा ही अडचण सोडवावी लागते. मग अशा जनसामान्यांच्या प्रश्नावर चित्रपट निघू शकतो? हो. हिंदी अथवा मराठी चित्रपटात लोकांच्या रोजच्या आयुष्यातील प्रश्न मांडले जात नाहीत. पण, या विषयावर तामिळ भाषेमध्ये तयार झालेला एक उत्तम चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर उपलब्ध आहे. रामकुमार बालकृष्णन लिखित – दिग्दर्शित या चित्रपटाचे नावच ‘पार्किंग’ असे आहे.

घरासमोर रिकाम्या जागेत कुणी कार पार्क करायची, यावरून दोन भाडेकरू एकमेकांवर कुरघोड्या करता करता स्वतःचेच मानसिक स्वास्थ्य कसे हरवून बसतात, हे या चित्रपटातून दिसते. हरीश कल्याण आणि विशेषतः एम. एस. भास्कर यांच्या उत्तम अभिनयाने चित्रपटात रंगत आणली असली, तरी हा चित्रपट पटकथा लेखक आणि दिग्दर्शकाचा आहे. यामध्ये अभिनेत्री आहेत, पण लौकिकार्थाने कुणी नायिका नाही, नायक-नायिकेच्या प्रेमकथेचे प्रसंग नाहीत. चित्रपटाच्या मूळ विषयाशी प्रतारणा न करता चित्रपट बनवणे कसे शक्य आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणून हा चित्रपट बघावा.

चित्रपटातील अभिनेत्यांना एक वलय असते आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्याबद्दल एक अनामिक ओढ असते, औत्सुक्य असते, त्यांना भेटण्याची (अलीकडे सोबत सेल्फी वगैरे काढण्याची) हौस असते. या चाहत्यांमुळे, ग्लॅमरच्या वलयामुळे काही कलाकारांच्या डोक्यात हवा जाते आणि ते स्वतःला जगावेगळे समजतात. त्यातूनच मग सामान्य जनतेला लागू असलेले नियम न पाळण्याची त्यांना चटक लागू शकते आणि तिथेच फसगत होते. अशाच एका अभिनेत्याचे ड्रायव्हिंग लायसन्स गहाळ होते आणि त्याशिवाय कार चालवताना अडवणाऱ्या आरटीओ इन्स्पेक्टरबरोबर बोलताना त्याचा इगो आडवा येतो. या दोघांतला सामना ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ मल्याळी चित्रपटात सचे या पटकथाकाराने आणि जीन पॉल लाल या दिग्दर्शकाने रंजकपणे खुलवला आहे.

पृथ्वीराज सुकुमारन यानेही उत्तम अभिनय केला आहे. पण, बाजी मारली आहे ती सूरज वेंजारामुडू याच्या भावस्पर्शी अभिनयाने. प्राइमवर उपलब्ध असलेला ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ वेगळ्या विषयासाठी, आवर्जून बघावा असा नर्मविनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘सेल्फी’ डिस्ने हॉटस्टारवर उपलब्ध आहे. परंतु, त्या वाटेला न जाता मूळ चित्रपट बघणे केव्हाही श्रेयस्कर.

तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेऊन मुलाशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करणारे वडील (होम), नाईलाजास्तव सरकारी व्हेटर्नरी इन्स्पेक्टरची नोकरी करणाऱ्या युवकाचे एका गावातील अनुभव (पालतू जानवर), लग्नानंतर उच्च शिक्षणाऐवजी स्पर्धा परीक्षा देणारी युवती (जय जय जय जय हे), आफ्रिकन फुटबॉल खेळाडू केरळमधल्या एका गावातल्या फुटबॉल टीमकडून खेळताना त्याला गावकऱ्यांबरोबर आलेले अनुभव (सुदानी फ्रॉम नायजेरिया), एका निर्जन, पण निसर्गरम्य उंच टेकाडावर असलेल्या वायरलेस पोलिस चौकीत दोन पोलिसांना थरारक प्रसंगाला सामोरे जावे लागते त्याची कहाणी (इला विजा पोचीरा) अशा सर्वसामान्यांच्या आयुष्यातील कथा मल्याळम चित्रपटातून सांगण्यात आल्या आहेत. रोजच्या आयुष्यात कोणालाही सामोरे जावे लागणाऱ्या प्रसंगांमुळे चित्रपटाच्या कथेला महत्त्व आले आणि स्टारपेक्षा अभिनेते उजवे ठरले. त्यामुळे दाक्षिणात्य, विशेषतः मल्याळम चित्रपटांचा दर्जा उंचावत गेला आहे.

तीन ते चार कोटी बजेट असलेल्या अशा अनेक दाक्षिणात्य चित्रपटांनी २०-२२ कोटी कमावले. असे दर्जेदार चित्रपट तिकीटबारीवरही यशस्वी ठरतात, हे यातून सिद्ध होते. रोजच्या आयुष्यातील घटना हा चित्रपटांचा विषय होऊ शकतो, हे दाक्षिणात्य चित्रपटांनी अनेक वेळा दाखवून दिले आहे. त्यामुळे प्रादेशिक चित्रपटांशी तुलना केल्यास, मराठी चित्रपटांवर त्यांनी केव्हाच मात केली आहे. मराठी चित्रपटांमध्ये विषयांचे वैविध्य नसल्याचे नेहेमीच जाणवते. ‘बाईपण दे गा देवा’, ‘नाच ग घुमा’ यांसारखे चित्रपट कल्पनादारिद्र्याचे दर्शन घडवतात. ‘नाच ग घुमा’ किंवा ‘आलीबाबा आणि चाळिशीतले चोर’ सारख्या चित्रपटांच्या विनोदावर हसू न येता ते चित्रपट हास्यास्पद झाल्याचे दिसते. ठराविक देखणे स्टार असतील, तरच चित्रपट चालतात, उत्तम कथांचे चित्रपट तिकीटबारीवर चालत नाहीत, अशी मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांची ठाम धारणा आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षक ओटीटीवर मल्याळम आणि तमिळ चित्रपट बघणे पसंत करतात. ओटीटी चॅनलही मराठी चित्रपटांचा दर्जा ओळखून असल्यामुळे ते मल्याळी, तामिळ चित्रपट विकत घ्यायला प्राधान्य देतात. खरे तर, मल्याळी चित्रपट गेल्या दहा वर्षांत कसा बहरला आहे, ‘स्टार’पेक्षा कथेला प्राधान्य दिल्यामुळे त्यांचे चित्रपट कसे दर्जेदार होत गेले आहेत, याचा मराठी निर्माते, दिग्दर्शकांनी अभ्यास करायला हवा.

(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)



Source link