वेध मुत्सद्देगिरीचा…: शिवशंकर मेनन यांनी ‘पंचसूत्री’द्वारे दिला परराष्ट्र धोरणाला आकार

0
18
वेध मुत्सद्देगिरीचा…:  शिवशंकर मेनन यांनी ‘पंचसूत्री’द्वारे दिला परराष्ट्र धोरणाला आकार


  • Marathi News
  • Opinion
  • Shivshankar Menon Foreign Policy Panchasutri Rasik Article By Dr. Rohan Choudhar

डॉ. रोहन चौधरी3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

वैभवशाली वारसा, अनुभवाची संपन्न शिदोरी आणि परराष्ट्र धोरणाचा गाढा अभ्यास या बळावर शीतयुद्धोत्तर भारतीय परराष्ट्र धोरणाला रचनात्मक आकार देणारा मुत्सद्दी म्हणून शिवशंकर मेनन यांच्याकडे पाहिले जाते. मुत्सद्देगिरीचे उपजत कौशल्य आणि बहुभाषी व्यक्तिमत्वाच्या साथीने त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक आव्हानात्मक जबाबदाऱ्या लीलया पार पाडल्या.

मेनन १९७२ मध्ये परराष्ट्र सेवेत दाखल झाले. १९७४ ते १९७९ या दरम्यान त्यांना चीनमध्ये सचिव (द्वितीय) तसेच अवर सचिव म्हणून जबाबदारी मिळाली. पुढे १९८६ ते १९८९ या कालावधीत ते पुन्हा चीनमध्ये कौन्सिलर म्हणून कार्यरत होते. वास्तविक चीनच्या दृष्टीने हा काळ अत्यंत संक्रमणाचा होता. माओच्या राजवटीतून बाहेर येऊन डेंग यांच्या नेतृत्वाखाली हा देश कूस बदलत होता. एकीकडे १९७९ मध्ये स्वीकारलेले उदारीकरणाचे धोरण पुढे जात होते आणि दुसरीकडे याच काळात म्हणजे १९८९ मध्ये घडलेल्या, या देशाच्या इतिहासातील ‘जालियनवाला हत्याकांड’ मानल्या जाणाऱ्या ‘तियानमेन स्क्वेअर’च्या घटनेने चीन पुरता ढवळून निघाला होता. अशा मोठ्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार होण्याची वेळ कोणत्याही मुत्सद्द्याच्या वाट्याला येणे तसे दुर्मिळच. मेनन या दोन्ही घटनांचे साक्षीदार ठरले.

चीनच्या या संक्रमणकाळाचा जवळून अनुभव घेणाऱ्या मेनन यांना १९८९ ते १९९२ दरम्यान जपानमधील आपल्या सेवेच्या काळात शीतयुद्ध समाप्तीचे आशियावर होत असलेले परिणाम अभ्यासण्याची संधी मिळाली. जपानमध्ये हे दशक ‘लॉस्ट डीकेड’ म्हणून ओळखले जाते. त्या काळात हा देश अतिशय बिकट अशा आर्थिक परिस्थितीला सामोरा जात होता. जपानमधील या स्थितीचा परिणाम संपूर्ण आशियावर होणार, याचा अंदाज मेनन यांना आलाच होता. आशियातील या दोन प्रमुख देशांतील अशा ऐतिहासिक बदलांचा जवळून घेतेलेला अनुभव मेनन यांच्या विचाराला कलाटणी देणारा ठरला. त्यातून जागतिक राजकारणाकडे बघण्याची त्यांची दृष्टी आमूलाग्र बदलली आणि जगातील या नव्या परिस्थितीला अनुरूप असा दृष्टिकोन भारतीय परराष्ट्र धोरणात बिंबवण्यास त्यांनी सुरूवात केली.

मेनन हे १९९५ ते ९७ दरम्यान इस्रायलमधील उच्चायुक्त बनले. या काळात त्यांनी भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंधाविषयीचा गैरसमज दूर करण्यास प्राधान्य दिले. राजकीय विचारांचा बळी ठरलेल्या भारत – इस्रायल संबंधांना आर्थिक आयाम देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न त्यांनी केला. आज भारत-इस्रायल संबंध ज्या उंचीवर पोहोचले आहेत, त्याचे थोडेफार श्रेय मेनन यांनाही जाते. पुढे त्यांनी श्रीलंकेमधील उच्चायुक्त (१९९७-२०००), चीनमध्ये राजदूत (२०००-०३) आणि पाकिस्तानमधील उच्चायुक्त (२००३-०६) म्हणून जबाबदारी सांभाळली. हा काळ चीनचा दक्षिण आशियातील वाढता हस्तक्षेप, चीन – पाकिस्तान यांची वाढती मैत्री, पाकिस्तानकडून भारताच्या विरोधात दहशतवादाचा वापर तसेच दक्षिण आशियाई देशांमध्ये चीनचे वाढत्या आकर्षणाचा होता. त्यामुळे एका अर्थाने दक्षिण आशियातील भारताचे वर्चस्व धोक्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मेनन यांच्या चीनमधील कारकिर्दीत तिथे भेट देऊन त्या देशाचा दक्षिण आशियातील हस्तक्षेप क्षीण करण्याचा प्रयत्न केला. वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात त्यांनी पाकिस्तानसोबत ‘संयोग संवाद प्रक्रिया’ सुरू करण्यास प्राधान्य दिले.

भारताच्या दृष्टीने कायमच संवेदनशील असणाऱ्या दक्षिण आशियात अत्यंत मोक्याच्या वेळी महत्त्वाच्या देशांमध्ये सेवा बजावण्याची दुर्मिळ संधी प्राप्त झालेल्या मेनन यांनी शांतता, समन्वय, सहकार्य, संयम आणि समतोल या पंचसूत्रीला नेहमीच प्राधान्य दिले. या पंचसूत्रीच्या आधारे, कोणताही गाजावाजा न करता त्यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाला आव्हानात्मक परिस्थितीतून अत्यंत अलगद बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत डॉ. मनमोहन सिंग यांनी २००६-०९ या काळात परराष्ट्र सचिवपदी त्यांची नियुक्ती केली. भारत – अमेरिकेतील ऐतिहासिक अणुकरार पूर्णत्वास जाणे आणि २००८ या एकाच वर्षात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, चीन आणि रशिया या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांच्या प्रमुखांनी भारताला भेट देणे अशा दुर्मिळ घटना या काळात मेनन यांच्या नेतृत्वाखाली घडल्या. त्यांच्या या योगदानाची दखल घेत डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाच्या आपल्या दुसऱ्या कारकिर्दीत त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (२०१०-१४) म्हणून नियुक्ती केली.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षेतील त्रुटी शोधून ती ही व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्याचे काम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून मेनन यांनी केले. आपल्या पंचसूत्रीद्वारे देशाचे परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला दिशादर्शन करण्याचे काम निवृत्तीनंतरही ते अविरतपणे करत आहेत.

(संपर्कः rohanvyankatesh@gmail.com)



Source link