
प्रवीण दशरथ बांदेकर7 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक
- लोक-संचित
आजकालच्या दिवसांत संवेदनशील असणं, विवेकनिष्ठ विचार करणं, सामान्यांच्या बाजूनं विचार करणं हे एकूण त्रासदायकच ठरू लागलंय. अशा वेळी आपले जवळचे मित्र, नातेवाईक, अगदी घरातली माणसंदेखील आपल्याकडं संशयानं बघू लागतात. एखाद्या अन्यायग्रस्ताच्या बाजूनं बोलणं म्हणजे व्यवस्थेच्या, शासनाच्या विरोधात बोलणं, असा त्यांचा समज होतो. आपण असं करून त्यांच्या सुखासमाधानानं, आनंदानं, शांतपणे जगण्यामध्ये अडथळे निर्माण करतोय, असं त्यांना वाटतं. अलीकडे काय बिघडलंय कळत नाही, पण सतत चिडचिड होत असते. कारण काही कळत नाही. खरं तर, कारण असं काही नसतंच. कुणी आलं, गेलं, फोन वाजला, लाइट गेला, फुलझाडाची पानं किडीनं कुरतडली, पाऊस लांबला; काहीही झालं तरी जिवाचा नुसता संताप संताप होत राहतो. हे असं वैतागत राहणं, त्रागा करणं निरर्थक आहे, काहीही फरक नाही पडायचा आपल्या आदळाआपट करण्याने, हेही कळत असतं. असं करून आपण आपलंच आयुष्य कमी करून घेतोय, असंही मनात येत राहतं. मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या एका मित्राला म्हटलं, ‘काय करायचं सांग, सगळ्याच गोष्टींचा त्रास होऊ लागलाय!’
तो म्हणाला, ‘उदाहरणार्थ, नेमका कशाकशाचा त्रास होतोय ते तरी सांग. म्हणजे मलाही विचार करता येईल, जमलंच तर तुला काही सल्ले देता येतील.’ मी म्हटलं, ‘असं एक असेल तर सांगता आलं असतं. पण जवळपास प्रत्येक गोष्टीचाच त्रास होतो. चिडचिड होते. आदळआपट करावीशी वाटते. आता हेच बघ ना, ते एक म्हातारं जोडपं माझ्या आधीपासून येऊन बसलंय. ती प्रौढाही कधीपासून तिष्ठत असावी. पण, मी तुझा मित्र म्हणून तू लगेच मला आत बोलावलंस. मीही सुखावून, बाकी काही विचार न करता आत आलो. पण, त्यामुळेही कुठे तरी आतल्या आत धुसफूस सुरू झालीय. तलवारी खणखणू लागल्यात. माझंच मन विचित्र झालंय बहुतेक. एकीकडे, मित्राने बाकीच्या अपॉइंटमेंट बाजूला ठेवून लगेचच वेळ दिला, यामुळे मला बरंही वाटतंय. आपण कुणी तरी विशेष आहोत, आपला वेळ महत्त्वाचा आहे, हे आपला मित्र जाणतोय, याचं समाधान वाटतंय. तर दुसरीकडे वाटतंय, माझ्या आधीच्यांना डावलून मला बोलवायला मी एवढा कोण मोठा लागून गेलोय? साधा लेखकच तर आहे. डॉक्टरचा मित्र असलो म्हणून काय झालं? इतरांचाही वेळ तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांचेही प्रॉब्लेम गंभीर असू शकतात. मी थोडा वेळ थांबतो, तू आधी बाकी पेशंटना बघ, असंही म्हणता आलं असतं. पण, हे का नाही सुचलं मला? प्रत्येक वेळी आपल्यातला स्वार्थी, अप्पलपोटी घटक का डॉमिनंट होतो बाकीच्या चांगुलपणाच्या घटकांवर? म्हणजे मला वाटतं, मला हे हवंय आणि नकोयसुद्धा. आपल्या प्रत्येक कृतीला नैतिक-अनैतिक, पाप-पुण्याच्या तराजूत घालून नको तितका कीस पाडत बसायची सवय लागलीय. एक असं काहीच ठामपणे ठरवता येत नाही. मग ते बरं असेल किंवा वाईट, समाज-परंपरेला मान्य असेल वा नसेल; पण त्याबद्दल मला काय वाटतंय, ते नक्की करायला हवं ना? हेही हवं, तेही हवं, असं करता करता जगण्यातील कुठल्याच गोष्टीचा निखळ, स्वच्छ आनंद घेता येत नाहीय.’
मित्र शांतपणे ऐकत होता. मी बोलायचा थांबल्यावर माझ्याकडे पाहत स्मित करत म्हणाला, “आमच्या मानसशास्त्राच्या परिभाषेत याला हे हे असं असं म्हणतात. हे असं फक्त तुझ्याच बाबतीत होतंय असं नव्हे, तर जवळपास प्रत्येक संवेदनशील आणि अतिविचार करणाऱ्या माणसांना हे भोगावं लागतंय. वैयक्तिक पातळीवर आपण बरेचसे दुर्बल असतो. हतबल असतो. कराल दातांनी सर्वच बऱ्या-वाईट गोष्टींचा घास घ्यायला टपलेल्या विक्राळ व्यवस्थेच्या विरोधात आपण काही करू शकत नाही, ही गोष्ट आपल्याला अस्वस्थ करीत असते. आपलं सामान्य असणं, सत्ताहीन वा अधिकारहीन असणं, आपल्याला पावलोपावली जाणवत असतं. त्यामुळेच बहुधा, आपल्यावर अन्याय होतोय, आपल्याला चिरडायला सगळे जण टपलेत, अशी एक सूक्ष्म पातळीवरची भीती आपल्या अंतर्मनात नेहमीच असते. संधी मिळेल तेव्हा डॉमिनंट होऊन जगावर सूड उगवायची भावनाही यातूनच जन्मत असावी. पण, आपला मूळचा चांगुलपणा आपल्याला जाणीव करून देतो, हे असं करणंही ठीक नाहीय, यात आपण फक्त आपला विचार केला, पण आपल्यासारख्या इतर सामान्यजनांचं काय? त्यांना का वेठीस धरावं आपण? हा आपला सबकॉन्शसनेस अनेक पिढ्यांच्या संस्कारांची पुटं चढलेला आहे. ती पुटं खरडून काढून नितळ, स्वच्छ होणं परवडणारं आहे का आपल्याला? अर्थात, हे सगळं इतकं साधं-सरळंही आहे, असं नाही म्हणता येणार. आजच्या वर्तमानाइतकंच गुंतागुंतीचं आहे सगळं. असंख्य कंगोरे असतात आपल्या जगण्याला, एकमेकांत मिसळून गेलेले कैक घटक असतात. ते असे सुटे सुटे करू पाहणं आणि काही निष्कर्ष काढणं तसं अवघडच आहे. तू लेखक आहेस, त्यामुळे मला नेमकं काय म्हणायचंय, हे तुला चांगलं कळू शकेल.’
मित्राचं म्हणणं थोडं फार पटत होतं. आजकालच्या दिवसांत संवेदनशील असणं, विवेकनिष्ठ विचार करणं, सामान्यांच्या बाजूनं विचार करणं हे एकूण त्रासदायकच ठरू लागलं होतं. अशा वेळी आपले जवळचे मित्र, नातेवाईक, अगदी घरातली माणसंदेखील आपल्याकडं संशयानं बघू लागतात. एखाद्या अन्यायग्रस्ताच्या बाजूनं बोलणं म्हणजे व्यवस्थेच्या, शासनाच्या विरोधात बोलणं, असा त्यांचा समज होतो. आपण असं करून त्यांच्या सुखासमाधानानं, आनंदानं, शांतपणे जगण्यामध्ये अडथळे निर्माण करतोय, असं त्यांना वाटतं. सरकार कधी चुकत नाही, सरकारचे सगळे निर्णय लोकांच्या हिताचेच असतात, अशी त्यांची ठाम समजूत असते. तिकडे दिल्लीत शेतकऱ्यांनी सरकारच्या काही निर्णयांच्या विरोधात मोर्चा काढला आणि आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं किंवा आपल्या कोकणातल्या एका गावात गाववाल्यांच्या विरोधाला न जुमानता एखादा प्रकल्प लादला जातोय म्हणून आपण गाववाल्यांच्या बाजूने उभे राहिलो, काही महिला खेळाडूंनी आपलं लैंगिक शोषण होतंय म्हणून सरकारमधल्या एखाद्यावर आरोप केले आणि आपण त्या खेळाडूंची बाजू घेत सरकारच्या सोयिस्कर मौन पांघरण्याच्या वृत्तीचा निषेध केला किंवा आपल्याच राज्यातल्या एका दलित तरुणाची क्षुल्लक आणि खोट्या आरोपावरून हत्या झाली, त्याविषयी आपण बोलू लागलो, तर प्रत्येक वेळी आपल्या या जवळच्यांना आपल्या कृतींचा त्रास होऊ लागतो. ही आपली माणसं मनानं आपल्यापासून दूर जाऊ लागतात. हळूहळू नात्यांच्या घट्ट विणीतून उसवत, तुटत जातात. आपल्याला हे जाणवत असतं नि आपली प्रचंड चिडचिड होत असते. तुम्ही जाणूनबुजून स्वीकारलेलं हे आंधळेपण बाजूला सारून जरा स्वच्छ नजरेनं या घटनांकडे पाहा, कोण चूक कोण बरोबर हे सोडून द्या, पण किमान काही माणुसकी आणि संवेदनशीलता असेल, तर या सत्ता आणि संपत्तीच्या टाचांखाली चिरडल्या जाणाऱ्या लोकांचाही विचार करून पाहा, असं आपण कुणाला समजावू गेलो, तरी लोक विचित्रपणे आपल्याकडे पाहू लागतात. आपल्याला टाळू लागतात.
आणि आपल्याला तर त्यांच्यासारखं डोळे मिटून घेत, स्वतःपुरतं पाहत जगता येत नाहीय. त्रास होतोय तो याच गोष्टीचा. चिडचिड होतेय, ती याच अवतीभवतीच्या माणसांच्या बथ्थडपणामुळे. हे या डॉक्टर मित्राला तरी काय सांगणार? तो पुन्हा एखादं मानसशास्त्रीय किचकट नाव सांगून हे हे असं असं आहे म्हणणार. पण, माझी अस्वस्थता ही त्या पलीकडची आहे. तुकोबांसारखं ‘माझिये जातीचें मज भेटो कोणी..’ असं म्हणत अस्वस्थपणे तळमळणंच जर आपल्या अस्तित्वाची निजखूण असेल, तर त्या गोष्टीला निमूटपणे सामोरं गेल्यावाचून गत्यंतर नाही. तोवर आपण आपलं बिघडलेल्या गोष्टींविषयी उच्चरवात बोलत राहावं, हेच बरं.
प्रवीण दशरथ बांदेकर samwadpravin@gmail.com