राजेंद्र भामरे4 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
अलीकडेच झालेल्या काही कारवायांमुळे ‘एमडी’ आणि एकूणच अमली पदार्थांचा विळखा किती घट्ट आवळला गेला आहे, हे स्पष्ट होते. शेकडो कोटींची उलाढाल असलेले आणि तरुणाईला उद्ध्वस्त करणारे असे ड्रगचे रॅकेट राजकीय, प्रशासकीय पाठबळाशिवाय सक्रिय असणे शक्य नसते. त्यामुळे पैशाच्या मोहाने महाराष्ट्राच्या भवितव्याला अंधकारात ढकलणाऱ्या या प्रकाराची पाळेमुळे खोदून काढलीच पाहिजेत.
ड्रग माफिया ललित पाटील याला झालेली अटक आणि त्यापाठोपाठ मुंबई, पुणे, नाशिक, छ. संभाजीनगरमध्ये झालेल्या ड्रगविरोधी कारवायांनी सामाजिक, राजकीय वातवरण ढवळून निघाले आहे. अनेक ठिकाणी पोलिस आणि प्रशासनाच्या नाकाखाली मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ बनण्याचे उद्योग बिनबोभाट सुरू होते, हे तेथे झालेल्या शेकडो कोटी रुपयांच्या ड्रगच्या जप्तीतून स्पष्ट झाले आहे. आर्थिक लाभासाठी तरुणाईला ड्रगच्या विळख्यात ढकलणाऱ्यांना आणि त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. कारण, हा प्रकार म्हणजे राज्याच्या, देशाच्या भवितव्याशी केलेला खेळ आहे. या संवेदनशील प्रकरणाच्या निमित्ताने, ड्रगची निर्मिती- व्यापार आणि त्यांचा वाढता प्रभाव तसेच आपले बदलते सामाजिक वास्तव यांचा वेध घेणेही तितकेच महत्त्वाचे बनले आहे.
जगातील सर्वव्यापी, सुसंघटित आणि सतत पैसा मिळवून देणारा कोणता व्यवसाय असेल, तर तो अमली पदार्थांचा व्यापार होय. भारताचे जगाच्या नकाशावरचे भौगोलिक स्थान बघितले, तर आपण ड्रग व्यापारातील म्यानमार – थायलंड – लाऊस या ‘गोल्डन ट्रँगल’च्या आणि पाकिस्तान – अफगाणिस्तान – इराण या ‘गोल्डन क्रिसेंट’च्या कात्रीमध्ये असल्याचे लक्षात येते. या सहा राष्ट्रांचा जागतिक अमली पदार्थांच्या उत्पादन आणि व्यापारात प्रचंड वाटा आहे. आपल्या देशाची सीमा खूप मोठी आहे आणि आपली लोकसंख्याही प्रचंड आहे. त्यामुळे या देशांतून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीला आणि देशांतर्गत ड्रग व्यवसायाला आळा घालणे तितके सोपे नाही, हे वास्तव आहे. जगभरात मारीजुना, हेरॉइन, कोकेन, मार्फिन इत्यादी अनेक प्रकारचे मादक पदार्थ विकले जातात. हेरॉइन, कोकेन यांची भारतात मोठ्या प्रमाणात आयात होत असते आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय बाजारातील दर फार मोठा असतो. यातील बरेचसे ड्रग हे औषधांमध्ये वापरले जातात, विशेषत: पेनकिलर औषधात यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. परिणामी औषध स्वरूपात ते भारतात सहज उपलब्ध असतात. या औषधी द्रव्यांचा वापर करून भारतात मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ तयार केला जातो. हेरॉइनची किंमत शंभर रुपये असेल, तर या ड्रगची किंमत दहा रुपये असते. त्यामुळे भारतात नशा करण्यासाठी ‘एमडी’ची वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे सिंथेटिक प्रकारचे ड्रग आहे. अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहतीमधील बंद पडलेल्या औषधांच्या कारखान्यातून याची निर्मिती होत असल्याचे उघड होत आहे. ‘एमडी’च्या उत्पादन खर्च आणि विक्रीचा दर यात मोठे अंतर असल्याने यातून प्रचंड प्रमाणात काळी कमाई होते.
अगदी काल-परवापर्यंत मोठ्या शहरात ‘एमडी’चा वापर होत होता, परंतु आता याचे लोण ग्रामीण भागातही पोहोचले आहे. हा पदार्थ सिगारेटद्वारे, वाफ घेऊन, इंजेक्शनमधून, दारू किंवा गुटख्यातून सेवन केला जातो. अमली पदार्थ आपल्या आसपास पोहोचले आहेत, असं आपण म्हणत होतो. पण, आता त्यांनी थेट आपल्या घरात प्रवेश केला असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे अक्षम्य ठरेल. या अमली पदार्थांकडे तरुणाई का वळते, ते पाहू…
१) उत्सुकता – हा नक्की काय पदार्थ आहे, त्याचा फायदा काय होतो, या विचारातून होणारे सेवन.
२) मित्रांचा आग्रह : पार्टीमध्ये मित्रांकडून होणारा आग्रह.. ‘घे रे.. एकदा प्यायल्यानं काय होतंय, प्यायल्यानंतर येणारी मजा तर बघ..’ इत्यादी.
३) श्रेष्ठत्वाचा अहंगंड : मला काय होणार आहे? मी काय त्याच्या आहारी जाणार आहे? या अहंकारातून होणारे सेवन.
४) पालकांचा प्रभाव : ज्या घरात पालक मद्य किंवा अमली पदार्थ सेवन करतात, तेथील मुले याचे दुष्परिणाम बघून एक तर त्याकडे वळत नाहीत किंवा घरचे घेताहेत तर आपल्याला काय हरकत आहे, या विचारातून त्यांच्या आहारी जातात.
५) जैविक प्रभाव : शरीरातील काही जीन्सच्या प्रभावामुळे अनेकांमध्ये ड्रग घेण्याची ऊर्मी निर्माण होते.
६) करिअरमधील ताणतणाव : नोकरी, उद्योगातील ताणतणावांमुळे, विशेषत: आयटी आणि अन्य आव्हानात्मक क्षेत्रांतील तरुण स्ट्रेस रिलीफचा उपाय म्हणून त्याकडे वळतात. ७) सहज उपलब्धता : पूर्वी समाजावर अमली पदार्थांचा प्रभाव काही प्रमाणात होता, पण ते सहज उपलब्ध होत नसत. आता ते अगदी ग्रामीण भागात पोहोचले आहेत.
अमली पदार्थांमुळे होणारे काही दुष्परिणाम असे…
१) कौटुंबिक दुष्परिणाम : मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती खराब होते. त्यांचे संतुलन ढळते. ते स्वत: आणि त्यांचे कुटुंबही विस्कळीत होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावते.
२) सामाजिक दुष्परिणाम : अमली पदार्थांच्या किमती प्रचंड असल्याने त्यासाठी लागणाऱ्या पैशाकरिता ही मुले कोणत्याही थराला जाऊ शकतात. प्रसंगी चोऱ्या, मारामाऱ्या करतात. त्यामुळे सामाजिक शांततेचा भंग होतो, समाजात अस्वस्थता निर्माण होते.
३) आर्थिक दुष्परिणाम : जी तरुणाई स्वत:च्या प्रगतीकडे, विकासाकडे वळायला हवी, ती विनाशाकडे जाते. परिणामी श्रमातून वित्तनिर्मितीची प्रक्रिया बाधित होते. ड्रग व्यापारामुळे मनी लाँड्रिंगसारखे प्रकार वाढून अर्थकारण खिळखिळे होते.
४) स्थैर्यावरील दुष्परिणाम : अमली पदार्थांच्या व्यापारातून मिळणाऱ्या प्रचंड नफ्याकडे अनेक वेळा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी आकर्षित होतात. त्यामुळे भ्रष्टाचार वाढून सामाजिक दुष्प्रवृत्तींना खतपाणी घातले जाते. अशा स्थितीत सामाजिक स्थैर्य संकटात येऊ शकते.
रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या, पब्ज यांमध्ये भाग घेणाऱ्या मुलांमध्ये ड्रग सेवनाचे प्रमाण मोठे आहे. या पार्ट्या सात – आठ तास चालतात. एवढा वेळ सामान्य परिस्थितीत तरुण नाचू शकत नाही, तेव्हा तो असे ड्रग घेणाऱ्यांचे अनुकरण करतो. त्यामुळे त्याला सुपर ह्यूमन फीलिंग येते, स्टॅमिना वाढतो आणि तो नाचत राहतो. या ड्रगमुळे मेंदूतील डोपामाइन या हार्मोनमध्ये वाढ होते, आपण हवेत तरंगतो आहोत, असा भास होतो. परंतु, हे फसवे असते. अशा अमली पदार्थाची नशा उतरल्यावर प्रचंड पोकळी निर्माण होऊन उदासीनता, नैराश्य वाढते, मनात भीती निर्माण होते, झोप येत नाही, कुणीतरी मागे लागले आहे, आपला पाठलाग होतो आहे, अशा भावना तयार होतात. या भावनांमधून बाहेर येण्यासाठी तो परत ड्रग घ्यायला लागतो आणि हळूहळू या दुष्टचक्रात अडकतो.
खरे तर ज्या वेळी तरुण मुले-मुली रात्री उशिरापर्यंतच्या पार्टीला हजेरी लावतात, तेव्हा त्यांच्या वागणुकीत होणारे बदल, खर्चासाठी अधिक पैशाची होणारी मागणी या सर्व बाबींवरून ते अमली पदार्थांच्या आहारी चालले असावेत, हे ओळखता येऊ शकते. त्याबद्दल वेळीच माहिती घेऊन पालकांनी योग्य ती उपाययोजना केली पाहिजे.
व्यायाम, वाचन, संगीत, खेळ यांसारख्या सकारात्मक गोष्टींकडे त्यांना वळवण्याचा प्रयत्न व्हावा. त्याच वेळी, मुले ड्रगच्या आहारी जाऊ नयेत म्हणून त्याचे वास्तव काय आहे, त्याची भयानकता किती आहे आणि अंतिम परिणाम काय होऊ शकतो, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक बनले आहे.
सरकार आणि काही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून असे प्रयत्न होत असतात, परंतु ते पुरेसे नाहीत. या विळख्यातून बाहेर येण्यासाठी लागणारे औषधोपचार, समुपदेशन, नशामुक्ती केंद्रांची सुविधा यामध्ये वाढ होणे आवश्यक आहे. पण, मुळात हे अमली पदार्थ इथेच तयार होऊन या मुलांपर्यंत पोहोचतातच कसे, याचीही पोलखोल करावीच लागेल.
ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणामुळे आणि मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगरात झालेल्या कारवायांमुळे ‘एमडी’ आणि एकूणच अमली पदार्थांचा विळखा किती घट्ट आवळला गेला आहे, हे स्पष्ट होते. ललित पाटील येरवडा कारागृहातून ससून हॉस्पिटलला औषधोपचारासाठी येतो, तिथे अनेक महिने मुक्काम करतो, त्या ठिकाणाहून कोट्यवधी रुपयांची ड्रग तस्करी करतो, आपल्या मैत्रिणींना शेजारच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटतो, हे काय दर्शवते? या गोष्टी आपोआप किंवा एकाएकी नक्कीच घडलेल्या नाहीत. या आणि अशा शेकडो कोटींची उलाढाल असणाऱ्या, तरुणाईला उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रगचे रॅकेट राजकीय आणि प्रशासकीय पाठबळाशिवाय सक्रिय असणे शक्य नसते. त्यामुळे केवळ सात-आठ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करून या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाता येणार नाही. पैशाच्या मोहाने आपली पिढी बरबाद करायला निघालेल्यांवर कठोर कारवाई करावी लागेल. महाराष्ट्राच्या भवितव्याला अंधकारात ढकलणाऱ्या या प्रकाराचा खोलवर तपास करून त्याची पाळेमुळे खोदली पाहिजेत. त्यासाठी सरकारला कणखर इच्छाशक्ती दाखवावी लागेल.
(संपर्कः acprmbhamare @gmail.com)





