माझ्या हिश्श्याचे किस्से: शक्ती कपूरना रस्त्यावर अॅटिट्यूड दाखवल्यामुळे मिळाला होता सिनेमा

0
1
माझ्या हिश्श्याचे किस्से:  शक्ती कपूरना रस्त्यावर अॅटिट्यूड दाखवल्यामुळे मिळाला होता सिनेमा


रूमी जाफरी | बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक14 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सिनेमांमध्ये शक्ती कपूर यांचा जो अॅटिट्यूड दिसला, त्याच अॅटिट्यूडने त्यांना व्यक्तिगत आयुष्यातही पहिला ‘ब्रेक’ मिळवून दिला होता.

आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये मी तुम्हाला काही छोटे पण रंजक किस्से सांगणार आहे. काही कलाकारांना सिनेमात ब्रेक कसा मिळाला, याचेच किस्से सांगतो. पहिला किस्सा हिंदी चित्रपटांतील सर्वात आयकॉनिक व्यक्तिरेखेचा. होय, “मदर इंडिया’मधील बिरजूच्या बालपणाचे पात्र साकारणाऱ्या मास्टर साजिदचा. झाले असे की, मेहबूब साहेबांनी आपल्या प्रॉडक्शन मॅनेजरला सांगितले की, बिरजूच्या भूमिकेसाठी मला एक मुलगा पाहिजे. जा, मुलांची निवड करून घेऊन ये. मग प्रॉडक्शन मुंबईतील भेंडी बाजारमध्ये गेले. त्यांनी तिथल्या परिचितांना सांगितले की, मेहबूब खानना त्यांच्या सिनेमातील मुलाच्या भूमिकेसाठी एक मुलगा हवा आहे. त्यांनी पात्र डोळ्यासमोर ठेऊन मुलांची निवड करायला सुरूवात केली. तेवढ्यात एक छोटा मुलगा आला आणि म्हणाला, ‘मला अॅक्टिंग करायचीय, मी पण येणार.’ त्यांनी त्याला ‘तू खूप छोटा आहेस,’ असे सांगितले. पण, मुलाने हट्टच धरला. मी अॅक्टिंग करणारच, मला घेऊन चला, म्हणत मागे लागला. प्रॉडक्शन मॅनेजरने त्याला रागावून परत पाठवले. मग निवडलेल्या मुलांना व्हॅनमध्ये बसवून मेहबूब स्टुडिओत नेले. पण, तो मुलगा सीटखाली लपून बसला होता. मेहबूब स्टुडिओमध्ये व्हॅन थांबली तसा तो मुलगाही बाहेर आला. प्रॉडक्शनवाला बघूून उद्विग्न झाला, तो रागावत होते आणि हा मुलगाही त्यांच्याशी वाद घालत होता. दूर उभे असलेल्या मेहबूब साहेबांनी हे पाहिले. त्यांनी प्रॉडक्शन मॅनेजरला बोलावून, ‘या मुलाशी का भांडताय?’ असे विचारले. त्यावर तो म्हणाला, “साहेब, मी याला निवडलं नव्हतं. तरीही हा जबरदस्तीने व्हॅनमध्ये लपून आलाय आणि आता इथं माझ्याशी भांडतोय की मला अॅक्टिंग करायचीय म्हणून..’ मेहबूब साहेबांनी मुलाला पाहिले आणि बोलावले. त्यांनी त्याला काय झाले? असे विचारले. तो मुलगा म्हणाला, ‘हे मला आणत नव्हते. मी सांगितलं की मला अॅक्टिंग करायचीय.’ मेहबूब साहेबांनी प्रॉडक्शनच्या लोकांना सांगितले, ‘बाकीच्या मुलांना सोडून द्या. हाच माझा बिरजू आहे.’ आणि अशा प्रकारे साजिद खानला “मदर इंडिया’तील भूमिका मिळाली.

दुसरा किस्सा माझे जीवलग मित्र सतीश कौशिक यांचा आहे. सतीश ‘एनएसडी’मधून पासआउट झाल्यावर मुंबईत येऊन संधी मिळण्यासाठी संघर्ष करत होते. त्यांनी एकदा श्याम बेनेगल यांच्याकडे वेळ मागितली. बेनेगलांंनी त्यांना वेळ दिला. पण, त्यापूर्वीच सतीशना सर्दी झाली, छातीत इन्फेक्शन झाले, म्हणून एक्स-रे काढला.

दुसऱ्या दिवशी बेनेगलांना भेटायला जायचे होते. सतीश एक्स रे घेऊनच त्यांना भेटायला गेले. श्यामजींशी बोलणे झाले. सतीश यांनी आपली सगळी पार्श्वभूमी सांगितली. बेनेगलांनी विचारले, ‘फोटो आणलेत का? दाखवा.’ सतीश त्यांच्याकडे पाहून म्हणाले, “साहेब, चेहरा तर तुम्ही पाहिलाच आहे..’ आणि मग एक्स-रे बाहेर काढून दाखवत म्हणाले, ‘आतून असा दिसतो मी..’ बेनेगल खळखळून हसले. त्यांना सतीश यांची ही शैली आवडली. त्यांनी आपल्या ‘मंडी’ सिनेमासाठी त्यांची निवड केली.

तिसरा किस्सा आहे माझ्या आणखी एका मित्राचा, सर्वात खट्याळ दोस्त शक्ती कपूर यांचा. शक्ती कपूर ‘एफटीआयआय’मधून आले होते. काम मिळवण्यासाठी कारमधून जायचं, त्यामुळं लोकांवर इम्प्रेशन पडेल, असा विचार करुन त्यांनी दिखाव्यासाठी एक जुनी फियाट खरेदी केली होती.

एके दिवशी ते कुठेतरी निघाले असताना एका मर्सिडीसने त्यांच्या गाडीला धडक दिली. शक्ती कपूर तावतावात खाली उतरले आणि जोरजोरात शिवीगाळ करत ओरडू लागले की, कोण आहे तो ज्यानं माझ्या गाडीला धडक दिली? एवढ्यात त्या गाडीतून फिरोज खान साहेब उतरले. फिरोज खानना पाहताच शक्ती कपूर यांंचा राग गायब झाला. ते फिरोज खान यांच्यापुढे गयावया करु लागले. म्हणाले, “सर.. सॉरी सॉरी.. मला माफ करा, मला माहीत नव्हतं की तुम्ही आहात. मी एक अॅक्टर आहे, ‘एफटीआयआय’मधून आलोय. सिनेमात काम मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही मला संधी दिलीत तर खूप बरं होईल सर..’ तेवढ्यात तिथे गर्दी जमू लागली. फिरोज खान गाडीत बसून निघून गेले. आणि तो किस्सा तिथेच संपला.

डेझी इराणी यांचे पती के. के. शुक्ला मोठे लेखक होते.त्यांच्याकडे शक्ती कपूर यांचे जाणे-येणे होते. त्या घटनेनंतर काही दिवसांनी एकदा शक्ती त्यांच्याकडे गेले होते. त्यांनी शुक्लाजींना, ‘सध्या कोणाचा चित्रपट लिहीत आहात?’ असे विचारले. त्यावर त्यांनी, ‘फिरोज खानचा..’ असे सांगितले. हे ऐकून शक्ती कपूर म्हणाले की, तुम्ही फिरोज खान यांच्याशी माझी भेट घालून दिली तरी ते मला घेणार नाहीत. शुक्लाजींनी ‘का?’ म्हणून विचारल्यावर शक्ती यांनी त्यांना तो गाडीच्या धडकेचा सगळा प्रसंग कथन केला.

शुक्लाजी हे ऐकून चकित झाले. त्यांनी विचारलेे, ‘अच्छा, तर तो तू आहेस होय..?’ शक्ती कपूर ‘हो’ म्हणाले. त्यावर के. के. शुक्ला म्हणाले, ‘अरे यार, फिरोज खान तुलाच शोधत आहेत. त्यांनी मला सांगितलं होतं की, एक मुलगा होता, काय अटिट्यूड होता त्याचा.. ज्या प्रकारे तो गाडीतून उतरला होता, जी त्याची बॉडी लँग्वेज होती.. मला तोच मुलगा हवा आहे.’ मग के. के. शुक्लांनी फिरोज खान यांना कॉल केला आणि सांगितले, ज्या मुलाला तुम्ही शोधत आहात, तो माझ्यासमोर बसला आहे.’ आणि अशा प्रकारे शक्ती कपूर यांना ‘कुर्बानी’ सिनेमा मिळाला. याच गोष्टीवरून मला एक शेर आठवतोय..

क़िस्मत का लिखा तो मुझे खुद ही मिलेगा आका, वो दीजिए मुझको जो मेरी क़िस्मत में न हो। आज मी तुम्हाला कोणतेही गाणे सुचवणार नाही. साजिद, सतीश आणि शक्ती यांच्यापैकी जो तुमचा सर्वांत जास्त आवडता अभिनेता आहे, त्याचे गाणे तुम्ही त्यांना आठवून ऐका. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.



Source link