रूमी जाफरी, चित्रपट लेखक-दिग्दर्शक3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
‘पायल’मधील ‘मेरी दुनिया में आना, ना जाना कभी फिर सनम..’ या गाण्यातील एक दृश्य.
माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा किस्सा सांगणार आहे. काल, २३ मार्चला माझा वाढदिवस होता. वाढदिवस प्रत्येकासाठी खूप खास असतो. वाढदिवशी आपल्याला अनेक भेटवस्तू मिळतात, प्रेम-आशीर्वाद आणि बरंच काही मिळतं. परंतु, मला माझ्या वाढदिवशी अशी गोष्ट मिळाली, जी माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान भेट होती. तिचा माझ्या चित्रपट कारकिर्दीत सर्वात मोठा वाटा होता.
मुंबईत आलो तेव्हा मी १९ वर्षांचा होतो. मी लेखक आहे, असे सांगायचो तेव्हा लोक चेष्टा करायचे आणि म्हणायचे, “बाळा, इथं शाळेसाठी नाटक लिहायचं नाहीय, चित्रपट लिहिणं म्हणजे आयुष्य लिहिण्यासारखं आहे. जा, आधी मोठा हो. आयुष्य बघ, जग बघ. अनुभव घे, रस्त्यांवर भटक, उपाशी राहा. कुणावर तरी प्रेम कर, त्याचं मन दुखव, स्वत:चं मन दुखव आणि नात्यातील वेदनांचा अनुभव घे. तेव्हाच तुझ्या लिखाणात वजन येईल.’
माझी खूप चिडचिड व्हायची की, तुम्ही माझा चेहरा का बघता? वय का बघता? माझे विचार बघा आणि माझ्या कथा ऐका. पण, कोणीही ऐकायला तयार नसायचं. त्यामुळं मग मीदेखील आपण एक लेखक आहोत, हे सांगायचं सोडून दिलं. विचार केला की, मी भोपाळमध्ये असताना नाटकात कामं करायचो. त्यामुळं मग इथंही नाटकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली.
नंतर माझे खूप मित्र झाले. सर्वात जवळचे मित्र होते अन्नूभाई म्हणजेच अन्नू कपूर, साजिद नाडियादवाला, तलत जानी. तलत यांना मी माझ्या कथा ऐकवायचो आणि त्यांना त्या खूप आवडायच्या. काही दिवसांनी साजिदने ‘जुल्म की हुकूमत’ हा सिनेमा सुरू केला. त्याच्या तयारीच्या बहुतेक बैठका माझ्याच घरी व्हायच्या. त्यामुळे संकल्पनेच्या चर्चेत आणि कथेच्या लिखाणात माझा बराच सहभाग असायचा. “जुल्म की हुकूमत’मध्ये मी अभिनयदेखील केला होता.
२२ मार्च १९९१ ची ही गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी २३ मार्चला माझा वाढदिवस होता. इतरांप्रमाणे मलाही लहानपणापासून वाढदिवस साजरा करण्याची आवड होती. भोपाळमध्ये कुटुंब आणि मित्रांसोबत तो साजरा करायचो, पण, मुंबईत मी एकटा होतो. माझी खूप इच्छा होती की, मित्रांना बोलवावे, खाऊ घालावं, वाढदिवसाची पार्टी करावी. परंतु, माझ्या खिशात पैसेच नव्हते. मी उदयला (उदय बावकर) म्हणालो, ‘मला खूप वाईट वाटतंय.’ उदयने विचारलं, “काय झालं?’ मी म्हणालो, ‘उद्या माझा वाढदिवस आहे आणि तो साजरा करायला माझ्याकडं पैसे नाहीत.’ त्यावर उदय म्हणाला, “गुरू, मित्रांना पार्टी द्यायची इच्छा आहे ना, तर बघ पैशांची व्यवस्थाही होईलच.’
सकाळी मी झोपेत असतानाच दारावरची बेल वाजली. उदयने दरवाजा उघडला आणि मला येऊन म्हणाला, “रूमी, बघ कोण आलंय.’ मी बघितलं तर अन्नूभाई (अन्नू कपूर) आले आणि मला शुभेच्छा देत म्हणाले, ‘रात्री माझं शूटिंग असल्यामुळं तू घरी ये, आपण सोबतच लंच करू.’ मी अन्नूभाईकडे लंचला गेलो. जेवण उरकल्यावर मी तिथून निघत होतो तेव्हा त्यांच्या शेजारी राहणारे निर्माते महेंद्र शाह कॉर्डलेस फोन घेऊन बाहेर फिरत होते आणि कुणावर तरी ओरडत होते. अन्नूभाईने त्यांना विचारले, “महेंद्रभाई, कुणावर आेरडताय?’ महेंद्रभाईंनी फोन कट केला आणि म्हणाले, “अरे यार, ‘मैने प्यार किया’ची नायिका भाग्यश्री जी कुणाला भेटतही नाही, तिला मी एका सिनेमासाठी साइन केलंय. तीन लेखकांना मी हॉटेलमध्ये बसवून ठेवलंय, पण एवढ्या दिवसांत त्यांनी एक ओळही लिहिली नाही. एकही स्टोरी आयडिया तयार नाही. आता मी भाग्यश्रीला काय ऐकवू? तिला कथानक ऐकायचंय.’
अन्नूभाई त्यांना म्हणाले, ‘महेंद्रभाई, तुम्हाला माहीत आहे का, रूमीकडे एकापेक्षा एक चांगल्या कथा आहेत. याच्याकडूनच ऐका..’ महेंद्रभाईंनी माझ्याकडं आणि मी त्यांच्याकडं पाहिलं. त्यांच्या नजरेतही मी एक लहान मुलगाच होतो. महेंद्रभाई आश्चर्याने उद्गारले, ‘याच्याकडं कथा आहेत?’ अन्नूभाई म्हणाले, “हो, खूप अप्रतिम! ऐका तर.’ मग मला म्हणाले, ‘आत चल, त्यांना कथा ऐकव.’ मी आत जाऊन बसलो. महेंद्रभाईंनी मला, ‘भाग्यश्रीच्या योग्यतेची कथा असेल तर ऐकव,’ असं सांगितलं. मी जे कथासूत्र सांगितले, ते महेंद्रभाईंना खूप आवडले. त्यांनी खिशात हात घातला आणि पाच हजार रुपये काढून मला दिले. म्हणाले, “हे पैसे ठेव. आता हे कथानक माझे झाले.’ यापेक्षा जास्त आनंद मला कधीच मिळू शकला नसता. एक सिनेमा मिळाल्याची खुशी होती आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे मिळाल्याचा आनंदही होता. यावरुन मला साहिर लुधियानवींंचा एक शेर आठवतोय…
हज़ार बर्क़ (बिजली) गिरे
लाख आंधियां उट्ठे,
वो फूल खिल के रहेंगे
जो खिलने वाले हैं।
त्या वाढदिवशी अन्नूभाईंनी मला एक घड्याळ भेट म्हणून दिलं अन् थोड्याच वेळात माझी वेळही बदलली. मी या जगात २३ मार्चला आलो आणि चित्रपटसृष्टीतही माझा जन्म २३ मार्चलाच झाला. कारण याच दिवशी मला माझ्या करिअरमधला पहिला सिनेमा मिळाला. त्याचं नाव होतं “पायल’. आज ‘पायल’च्या आठवणीत त्यामधील एक गाणं ऐका…
मेरी दुनिया में आना,
ना जाना कभी फिर सनम
मुझे अपना बनाना,
ना जाना कभी फिर सनम।।
स्वत:ची काळजी घ्या आणि आनंदी राहा.



