माझ्या हिश्श्याचे किस्से: एकाच लेखक-दिग्दर्शकाचे दोन सिनेमे, दोन आठवड्यांच्या अंतराने प्रदर्शित, दोन्ही सुपरहिट

0
20
माझ्या हिश्श्याचे किस्से:  एकाच लेखक-दिग्दर्शकाचे दोन सिनेमे, दोन आठवड्यांच्या अंतराने प्रदर्शित, दोन्ही सुपरहिट


रूमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अलीकडेच डेव्हिड धवन यांना ‘फिल्मफेअर’चा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. मी त्यांच्या २० चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबतचा माझा ३२ वर्षांचा प्रवास अतिशय मनोरंजक, संस्मरणीय आणि अनेक किश्श्यांनी भरलेला आहे. खरे तर तो सदराच्या एखाद्या भागात लिहिता येणार नाही, त्यासाठी एक पुस्तकच लिहावे लागेल. असो. फेब्रुवारी महिना सुरू असल्यामुळे डेव्हिड साहेबांसाठी मी लिहिलेले दोन चित्रपट मला आठवताहेत. १९९७ च्या फेब्रुवारीमध्ये मी लिहिलेले दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. ७ फेब्रुवारीला ‘जुडवा’ आणि २१ फेब्रुवारीला “हीरो नंबर वन’. दोन्ही सुपरहिट झाले. त्यामुळे आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये या दोन चित्रपटांबद्दल.

पहिला किस्सा ‘जुडवा’विषयीचा…मी डेव्हिड धवनजींसोबत लिहिलेला ‘साजन चले ससुराल’ आणि ‘कुली नंबर वन’ सुपरहिट झाले होते. ‘जुडवा’ची निर्मिती नंदू तोलानी करत होते. त्यांनी त्याचे हक्कही घेतले होते. परंतु, डेव्हिड साहेबांना दुसरे कथानक आवडले म्हणून त्यांनी त्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. ‘जुडवा’चे कथानक साजिद नाडियादवालांना आवडले होत. त्यामुळे त्यांनी नंदू तोलानींकडून त्याचे हक्क खरेदी केले. मी डेव्हिड साहेबांना म्हणालो, ‘डेव्हिड साहेब, एक सुपरहिट चित्रपट तुम्ही गमावला..’ बस्स! मग काय, डेव्हिड साहेब नंदू तोलानींवर नाराज झाले. त्यांना म्हणाले, ‘तू साजिदला हक्क का दिलेस? परत मागून घे.’

याचदरम्यान साजिद यांनी ‘जुडवा’साठी सलमान खानचा होकार घेतला होती. साजिद माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘नंदू माझ्याकडून हक्क परत मागतोय, मी त्याला नकार देऊ शकत नाही. तो माझा मित्र आहे. तू डेव्हिडला समजावून सांग की, विषय आवडलाच आहे तर माझ्यासाठीच दिग्दर्शन कर म्हणावं.’ मला रोलेक्सचं घड्याळ देत ते पुढं म्हणाले, ‘डेव्हिड नाही म्हणाला तर हे परत घेईन.’ मी डेव्हिडजींकडे गेलो आणि त्यांना सांगितले की, तुम्ही गोविंदासोबत नंदू तोलानीच्या चित्रपटाचा विषय फायनल केला आहे, मग साजिदसाठी ‘जुडवा’ करा. तो चांगला निर्माता आहे, माझा उत्तम मित्रही आहे. त्याने सलमानचा होकारही मिळवला आहे. मी समजावल्यावर डेव्हिड साहेब तयार झाले आणि अशाप्रकारे ‘जुडवा’ सुरू झाला.

आता दुसरा किस्सा ‘हीरो नंबर वन’चा. यातही डेव्हिड साहेबांनी दुसरा विषय फायनल करून टाकला होता. तो लिहूनही झाला होता. गोविंदा, करिष्मा कपूर, कादर खान यांच्या तारखा मिळाल्या होत्या. त्यांना साइनही केलं होतं आणि एका गाण्याचं शूटिंगही झालं होतं. मला चांगलं आठवतंय, मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यातील गोष्ट असेल. डेव्हिड साहेब चेन्नईत ‘लोफर’च्या मिक्सिंगचे काम करत हाेते. तेथून ते परत आले. वासूजींना आणि मला बोलावले. म्हणाले, ‘या विषयात मजा येत नाहीय. रूमी सांगतोय तो विषय चांगला वाटतोय.’ मी फक्त दोन ओळींची स्टोरी आयडिया सांगितली.. ‘एक करोडपती मुलगा आहे, ज्याने घरात कधी स्वत: उठून ग्लासभर पाणीही घेतले नाही. पण, तो त्याचे प्रेम मिळवण्यासाठी नायिकेच्या घरी नोकर म्हणून राहतोय.’ डेव्हिड साहेबांनी ती एेकली आणि ‘मी यावर सिनेमा बनवणार,’ असे सांगितले. पण, त्यामुळे वासूजी नाराज झाले. ते म्हणाले, ‘पाच दिवसांनी शूटिंग आहे. “फिल्मालय’मध्ये सेट तयार होतोय. तो तोडा, अॅक्टर्सच्या तारखा सोडा. आता रूमीभाई या नवीन कथानकावर पटकथा लिहिणार. त्यामुळं नवा ब्रेकडाऊन होणार. पुन्हा अॅक्टर्सच्या तारखा घ्याव्या लागतील. म्हणजे आता माझा सिनेमा वर्षभर पुढे गेला..’ मी वासूजी आणि डेव्हिड साहेबांना म्हणालो, ‘मला एक दिवसाचा वेळ द्या. सेट तोडायचाय तर परवा तोडा. डेट सोडायच्या आहेत तर परवा सोडा. ते म्हणाले, ‘एका दिवसात तू काय करशील?’ मी म्हणालो, ‘मला प्रयत्न तर करू द्या.’

मला आठवतंय.. मी साधारण अडीच-तीनला घरी आलो आणि लिहायला बसलो. दुसऱ्या दिवशी डेव्हिड साहेबांच्या सहायकाला बोलावून घेतले. मी लिहीत गेलाे आणि तो लिखाण पक्के करत गेला. संध्याकाळपर्यंत २४ तासांत मी संपूर्ण स्क्रिप्ट लिहिली. डेव्हिड साहेबांना ऐकवल्यावर ते एकदम खूश झाले. ‘फिल्मालय’मध्ये ऑफिसचा सेट लागला होता. त्याचे संवाद लिहिले. त्याचे शूटिंग पाच दिवसांनी, म्हणजे ज्या दिवशी होणार होते, त्याच दिवशी झाले. या दरम्यान मी गोविंदाचे घरातले डायलॉग लिहिले. आम्ही हैदराबादला गेलो. तिथे गोविंदाच्या घराचा सेट लागला होता. तिथले शूटिंग होईपर्यंत वासूजींनी मेहबूब स्टुडिओत करिष्मा कपूरचे घर तयार केले होते. मग मी करिष्माचे घरातले डायलॉग लिहिले आणि त्या घरातील शूटिंगही पूर्ण झाले. त्यानंतर मेमध्ये आम्ही युरोपला गेलो आणि १३ वा १४ जूनला सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले. यावरून मला अलिना इतरत यांचा एक शेर आठवतोय…

जिनके मज़बूत इरादे

बने पहचान उनकी,

मंज़िलें आप ही हो जाती है

आसान उनकी।

स्टोरी सुरू होण्यापूर्वी गोविंदा आणि करिष्मावर चित्रित झालेल्या गाण्याचे बोल होते.. ‘उने साइकिल से जा रहा था..’ हासुद्धा एक विक्रमच आहे. एकाच लेखक आणि दिग्दर्शकाने लिहिलेले दोन चित्रपट दोन आठवड्यांच्या अंतराने प्रदर्शित झाले आणि दोन्ही सुपरहिट झाले. असे फार क्वचितच घडले असेल. आज ‘जुडवा’ आणि ‘हीरो नंबर वन’च्या आठवणीत या दोन्ही चित्रपटांतील एक एक गाणं ऐका…

हीरो नंबर वन –

तू मेरा तू मेरा तू मेरा हीरो नंबर वन

जुड़वा –

ईस्ट ऑर वेस्ट इंडिया इज़ द बेस्ट

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link