रूमी जाफरी I बॉलीवूड चित्रपटांंचे लेखक, दिग्दर्शक7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज मी जगदीपजींबद्दल सांगणार आहे, ज्यांना मी प्रेमाने ‘भाईजान’ म्हणायचो. जगदीप भाईजान यांना मी पहिल्यांदा “सूरमा भोपाली’ चित्रपटाच्या सेटवर भेटलो होतो. “सूरमा भोपाली’चे कथानक लिहिण्यासाठी त्यांनी लेखक अथर अली यांना भोपाळहून बोलावले होते. त्यावेळी मी मुंबईत शिफ्ट झालो नव्हतो. काही कारणाने मुंबईला आलो असताना अथर भाई मला म्हणाले की, मी मुंबईतच आहे आणि जगदीप भाईजान यांच्याकडे थांबलो आहे. तुझी इच्छा असेल, तर तिथे भेटायला येऊ शकतोस.
बांद्रा वेस्टला २९ क्रमांकाच्या रोडवर गिलदाना नावाची बिल्डिंग होती. जगदीप भाईजान तिथेच राहात होते. मी अथर अलींना भेटायला गेलो आणि त्यांनी माझी ओळख जगदीप भाईजान यांच्यासाेबत करून दिली. तिथे तसा मी अगदीच उपरा होतो, पण जगदीप भाईजान आणि भाभीजींनी मला खूप आपुलकी, प्रेम आणि सन्मानाने वागवले.
असो. काही दिवसांनी मी मुंबईला शिफ्ट झालो. त्यानंतर जगदीप भाईजान आणि भाभीजींशी गाठीभेटी होत राहिल्या. दरम्यान बराच काळ गेला, एव्हाना मी लेखक झालो होतो, मग दिग्दर्शकही बनलो. जगदीप भाईजान यांनी ‘लाइफ पार्टनर’ आणि ‘गली गली चोर है’ या माझ्या दोन चित्रपटांत काम केले. निकहत काजमी या त्या वेळच्या मोठ्या चित्रपट समीक्षक होत्या. जेव्हा त्यांनी ‘लाइफ पार्टनर’च्या रिव्ह्यूमध्ये जगदीप साहेबांचा विशेष उल्लेख केला आणि त्यांचे कौतुक केले तेव्हा जगदीप साहेबांनी मला फोन केला. बोलताना ते खूप भावूक झाले. म्हणाले,‘तुला माहीत आहे रूमी, ही दुसरी वेळ आहे. मी इतक्या चित्रपटांमध्ये काम केलेय, पण ‘शोले’नंतर परीक्षणामध्ये माझे कधीच नाव आले नाही. ‘लाइफ पार्टनर” हा ‘शोले’नंतरचा दुसरा चित्रपट आहे, ज्यात माझे नाव आले आहे, माझे कौतुक झाले आहे.’ जगदीप साहेबांनी मला खूप आशीर्वाद दिले.
इतक्या वर्षांत जगदीप भाईजान यांच्यासोबत भेटीगाठीच्या, वेळ घालवण्याच्या, त्यांचे किस्से ऐकण्याच्या अनेक संधी मला मिळाल्या. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील आणि चित्रपट कारकिर्दीतील अनेक घटना, प्रसंग मला सांगितले. त्यातील एक-दोन किस्से आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांचे बालपण आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते कसे आले, याबद्दल तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल. पण, आज मी तुम्हाला असा किस्सा सांगणार आहे, जो कदाचित तुम्ही ऐकला नसेल.
“मदर इंडिया’मध्ये बिरजूची भूमिका सुनील दत्त यांनी केलीय, हे आपल्याला माहीत आहे. पण, ही भूमिका सुरुवातीला जगदीप भाईजान करणार होते. वास्तविक अभिनेत्री निम्मी यांनी “डंका’ नावाचा एक चित्रपट बनवला होता. त्यात काही आर्थिक अडचण आली म्हणून त्या मेहबूब साहेबांशी बोलल्या. मेहबूब साहेबांनी त्यांना मदत केली आणि स्वत:च्या देखरेखीखाली या चित्रपटाची निर्मिती करू लागले.
जगदीप भाईजान यांनी सांगितले की, त्या चित्रपटासाठी मला रोज ५० रूपये मानधन ठरले होते. पण, पहिल्या दिवशीचे चित्रीकरण संपल्यावर अकाउंटंटने मला २५ रूपयेच दिले. मी म्हणालो, ५० रूपये ठरले होते. तर त्याने सांगितले, नाही, आता २५ रूपयेच मिळणार. मी म्हणालो, तुम्ही माझे ५० टक्के मानधन कमी करत आहात, हे चुकीचे आहे. आणि मग माझा त्याच्याशी वाद सुरू झाला. त्याचवेळी जवळून मेहबूब साहेब गेले. त्यांनी हा वाद ऐकला आणि विचारले, ‘काय झाले?’ मी त्यांंना झाला प्रकार सांगू लागताच, ‘ऑफिसमध्ये येऊन बोल,’ एवढं बोलून ते निघून गेले. मीही त्यांच्या मागे मागे ऑफिसमध्ये गेलो आणि सगळा प्रकार सांगितला. त्यांना म्हणालो, माझे ५० रूपये मानधनाचे ठरले होते आणि हे मला २५ रूपयेच देत आहेत. त्यावर मेहबूब साहेब मला म्हणाले की, तू जर असा वाद घालणार असशील, तर मी तुला या सिनेमातून काढून टाकेन आणि पुढेही माझ्या कोणत्याच सिनेमात काम देणार नाही. आणि मीच काय, इंडस्ट्रीत कुणीही तुला काम देणार नाही.
या प्रसंगाविषयी जगदीप भाईजान पुढे सांगत होते.. ‘मी म्हणालो, ठीक आहे. तुम्ही मला २५ रूपयेच द्या. पण, तुम्हाला आणखी एक काम करावे लागेल. तुमच्या चित्रपटाच्या सुरूवातीला घेतलेला.. ‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंज़ूर-ए-खुदा होता है,’ हा शेर काढून टाकावा लागेल, कारण तुमचा स्वत:चाच त्यावर विश्वास नाही. तुमची अशी धारणा आहे की, ईश्वराच्या इच्छेने नव्हे, तर मेहबूब खान यांची इच्छा असेल तरच काम मिळते.’ मी असे म्हणताच ते खूप घाबरले आणि मला म्हणाले, “अरे बाबा, तू असं काही बोलून मला का गुन्हेगार ठरवतोयस? माफ कर बाबा.. अरे भाई, कुणीतरी लगेच प्रॉडक्शनच्या किंवा अकाउंटच्या माणसाला बोलवा.’ अकाउंटंट येताच मेहबूब खान त्याला म्हणाले, ‘याला ५० रूपयेच द्यायचे, याचा एक रूपयाही कापायचा नाही.’ यावरून मला अमीन मीनाई यांचा एक शेर आठवतोय…
कश्तियां सबकी किनारे पर पहुंच जाती हैं
नाख़ुदा जिनका नहीं, उनका ख़ुदा होता है।
असो. या प्रसंगानंतर जगदीप भाईजान मेहबूब साहेबांचे लाडके बनले. ‘मदर इंडिया’मधील बिरजूच्या भूमिकेसाठी जगदीप भाईजानना बोलावण्यात आले. जगदीप भाईजान यांना घेऊन चित्रीकरणही केले. पण, ते पाहिल्यावर म्हणाले की, जी आक्रमकता ऑफिसमध्ये भांडण करताना तू दाखवली होती, मला वाटले तीच बिरजूमध्येही दिसेल. पण, स्क्रीनवर तर ती दिसलीच नाही. तुझा चेहरा निरागस आणि भोळाच दिसतो आह. जो राग दिसायला पाहिजे, तो दिसत नाहीय. मग त्यांनी बिरजूच्या भूमिकेसाठी जगदीप भाईजानऐवजी सुनील दत्त यांना घेतले.
भलेही बिरजूच्या भूमिकेची संधी जगदीप भाईजान यांना मिळाली नाही, पण नंतर त्यांनी खूप मानसन्मान मिळवला. ते ‘आयफा’तर्फे लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित होणारे पहिले कॉमेडियन ठरले. जगदीप भाईजान यांच्या आठवणीत त्यांच्या ‘भाभी’ चित्रपटातील एक सुपरहिट गाणे ऐका…
चली चली रे पतंग मेरी चली रे,
चली बादलों के पार होकर डोर पे सवार,
देख देख दुनिया जली रे,
चली चली रे पतंग मेरी चली रे।
स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.





