माझ्या हिश्श्याचे किस्से: राजेश खन्ना : आर्थिक अडचणीतही सलमानला आपला बंगला विकण्यास दिला होता नकार

0
17
माझ्या हिश्श्याचे किस्से: राजेश खन्ना : आर्थिक अडचणीतही सलमानला आपला बंगला विकण्यास दिला होता नकार


  • Marathi News
  • Opinion
  •  Divya Marathi Rasik Article Column Written By Roomi Jafari Tales Of My Share Rajesh Khanna

रूमी जाफरी5 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘आपकी कसम’मधील ‘ज़िंदगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मुक़ाम’ या सुपरहिट गाण्यातील एका दृश्यात राजेश खन्ना. 

मी काकाजींना सलमानची ऑफर सांगितली. पण, त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटेल, याचा मला अंदाज नव्हता. पुढे काही दिवस ते रोज रात्री मला फोन करायचे आणि म्हणायचे.. ‘तुला माहीत आहे, की कोणत्याही धनाढ्य माणसाकडे इतकी संपत्ती नाही, जो राजेश खन्नाच्या ‘आशीर्वाद’चं मोल करू शकेल..’ परवा, २९ डिसेंबरला काकाजी म्हणजे राजेश खन्ना यांची जयंती होती. म्हणून मी असा विचार केला की, वर्षाच्या शेवटी म्हणजे ३१ डिसेंबरला त्यांचे स्मरण करून या वर्षाचा निरोप घ्यायला हवा. त्यामुळे माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज राजेश खन्ना आणि त्यांच्या ‘आशीर्वाद’ बंगल्याविषयी… मुळात हा बंगला आधी भारत भूषण यांनी घेतला होता आणि तेथे वास्तव्याला असतानाच ते मोठे स्टार बनले. पुढे त्यांनी हा बंगला राजेंद्रकुमार यांना विकला. राजेंद्रकुमार या बंगल्यात राहिले आणि तेसुद्धा चित्रपटसृष्टीतील ज्युबिली स्टार बनले. रमेश बहल हे त्यांचे नातेवाईक होते आणि ते राजेश खन्नांसोबत ‘द ट्रेन’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती करत होते. एक दिवस राजेश खन्ना कार्टर रोडवरून जात होते. त्यांना या बंगल्यासमोर बरीच गर्दी जमल्याचे दिसले. त्यांनी विचारले, ‘इथं एवढी गर्दी का आहे?’ यावर ड्रायव्हरने त्यांना हा बंगला राजेंद्रकुमार यांचा असल्याचे सांगितले. झाले.

त्या दिवसापासून या बंगल्याने काकाजींच्या डोक्यात घर केले. ते रमेश बहल यांना म्हणाले, ‘काहीही करून मला हा बंगला मिळवून द्या.’ मग रमेश बहल यांनी राजेंद्रकुमारांना सांगितले की, इथं गाड्यांचा फार आवाज येतो, लाेकांची वर्दळही खूप आहे, कसलीच प्रायव्हसी नाही, प्रदूषणही जास्त आहे. या बंगल्यामागे आणखी एक बंगला आहे. तो खूप मोठा आहे आणि त्यात तुलनेने खूप शांतता आहे.

बहल यांनी असं कन्व्हिन्स केल्यावर राजेंद्रकुमारांनी तो बंगला विकला. राजेश खन्ना यांनी तो घेतला. काकाजींनी या बंगल्याचे नाव ठेवले ‘आशीर्वाद’. हा बंगला विकल्यानंतर राजेंद्रकुमारांना ‘स्टार’ म्हणून असलेले वलय कमी होऊ लागले आणि राजेश खन्ना यांचे वाढू लागले. त्यामुळे बंगल्यासोबत आपले नशीबही राजेश खन्ना यांच्याकडे गेले, असे राजेंद्रकुमारजींना वाटू लागले. असो. १९९९, २००० आणि २००१ च्या दरम्यानची गोष्ट आहे.. काकाजी आर्थिकदृष्ट्या थोडे अडचणीत आले होते. त्यांना इन्कम टॅक्सची काहीतरी कोटी – सव्वाकोटी रुपयांच्या थकबाकीची नोटीस आली होती. यादरम्यान एक दिवस मला सलमान खान यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘रूमीभाई, काकजींकडे माझे एक महत्त्वाचे काम आहे. तुम्ही त्यांच्या खूप जवळचे आहात, त्यामुळे तुम्हीच हे काम करून घेऊ शकता.’ मी म्हणालो, ‘सांगा..’

सलमान म्हणाले, ‘मी बाहेर निघालोय, आऊट ऑफ इंडिया.. सोहेल तुम्हाला भेटून कामाबद्दल सांगेल..’ सोहेल मला भेटले आणि म्हणाले, ‘रूमीभाई, आम्ही असं ऐकलंय की काकाजी त्यांचा बंगला विकताहेत. तो आम्ही घेऊ इच्छितो. जी किंमत काकाजी सांगतील, ती सगळी आम्ही देऊ. आमच्याकडून काहीही घासाघीस होणार नाही आणि जो काही कोटी – सव्वा कोटीचा इन्कम टॅक्स आहे, तोसुद्धा आम्हीच भरू. तिसरं म्हणजे, त्यांच्या आशीर्वाद फिल्म्स या प्रॉडक्शन कंपनीसाठी सलमानभाई हीरो म्हणून एक चित्रपटही करतील. तर तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून घ्या.’ हे सगळे ऐकून मी अवाक झालो. यापेक्षा दुसरी मोठी डील असूच शकत नाही. इन्कम टॅक्सचं ओझं उतरवलं जाईल, बंगल्याला मार्केट प्राइजही मिळेल आणि सलमान खानच्या चित्रपटामुळं कंपनीचा बॅनरही पुन्हा नावारूपाला येईल. मी काकाजींना सलमान आणि सोहेल यांची ही ऑफर सांगितली. परंतु, त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटेल, याचा मला जराही अंदाज नव्हता.

तुमचा विश्वास बसणार नाही, पण त्या दिवसापासून पुढे काही दिवस ते रोज रात्री दहा – साडेदहाला मला फोन करायचे आणि म्हणायचे, ‘तू मला इतका आवडतो, तुला आपला जावई, आपला मुलगा मानून बोलावतो आणि तुलाच माझा बंगला विकावा वाटतोय? तुला माहीत आहे, की कोणत्याही धनाढ्य माणसाकडे इतकी संपत्ती नाही, जो राजेश खन्नाच्या ‘आशीर्वाद’चं मोल करू शकेल. हा खूप मौल्यवान बंगला आहे. आजदेखील एखादा गाइड टुरिस्ट बस घेऊन निघतो तेव्हा तो माझ्या बंगल्यासमोर बस थांबवतो आणि पर्यटकांना सांगतो की, तो पाहा.. राजेश खन्नांचा बंगला.. काकांचा बंगला.. आणि तू माझा हा बंगला विकू पाहतोय..’ मी म्हणालो, ‘काकाजी, मला माफ करा. एवढं मनावर घेऊ नका. यात मला काहीच स्वारस्य नाही. मी केवळ एक पोस्टमन आहे, ज्याला सलमान आणि सोहेल खान यांनी एक पत्र दिले होते आणि त मी तुमच्यापर्यंत पोहोचवले. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही.’ त्यांनी खूप कष्टाने ही गोष्ट विसरण्याचा प्रयत्न केला. काकाजींचे त्यांच्या या घरावर असलेले प्रेम पाहून मला अहमद मुश्ताक साहेबांचा एक शेर आठवला… पता अब तक नहीं बदला हमारा, वही घर है वही क़िस्सा हमारा या गोष्टीला काही वर्षे उलटून गेली. जवळपास ७ – ८ वर्षांनंतर एक दिवस सोहेल मला म्हणाले, ‘रूमीभाई, काल काय झाले, तुम्हाला माहीत आहे का?’ मी विचारले, ‘काय झाले?’ तर यावर सोहेलनी सांगितले.. ‘मी एका हॉटेलातून जेवण करून निघत होतो, तेव्हा मी काकाजींना त्यांच्या कारमध्ये बसत असल्याचे पाहिले. मी पटकन त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना सलाम करून म्हणालो, काकाजी, माझे नाव सोहेल खान. मी लेखक सलीम खान यांचा मुलगा आणि सलमान खानचा लहान भाऊ..

त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि अचानक त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. ते मला म्हणाले, तुम्हीच रूमी जाफरीला माझा बंगला खरेदी करण्यासाठी माझ्याकडे पाठवले होते ना?’ सोहेल म्हणाले, काकाजींनी ही गोष्ट इतकी मनाला लावून घेतली होती की इतकी वर्षे उलटूनही ते ती विसरले नव्हते. असो. आजही जेव्हा मी कार्टर रोडवरून जाताना या बंगल्याकडे बघतो, तेव्हा काकाजींची आठवण येते. ती जशी मला येते तशी तो बंगला पाहून साऱ्या जगालाही येत राहील. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्याच ‘आपकी कसम’ चित्रपटातील हे गाणे ऐका… ज़िंदगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मुक़ाम, वो फिर नहीं आते… स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा. (बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक)



Source link