माझ्या हिश्श्याचे किस्से: नुसरत फ़तेह अली : गोडाबद्दल विचारलं तेव्हा रेस्टॉरंटमध्ये होतं ते सगळं मागवलं!

0
19
माझ्या हिश्श्याचे किस्से: नुसरत फ़तेह अली : गोडाबद्दल विचारलं तेव्हा रेस्टॉरंटमध्ये होतं ते सगळं मागवलं!


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Special Mazya Hishshyache Kisse | Written By Rumi Jaffery On Nusrat Fateh Ali

रूमी जाफरी10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

जेवणानंतर मी विचारले, ‘खाँ साहेब, काही गोड खाणार?’ त्यांनी वेटरला विचारले, ‘काय आहे गोड?’ तो म्हणाला, ‘गुलाब जामुन, शाही टुकडा, फिरनी.’ ते म्हणाले, ‘तिन्ही घेऊन ये, चव घेतो आणि सांगतो काय खायचंय..’ खाँ साहेबांनी तीनही पदार्थ खाल्ले. म्हणाले, ‘फिरनी मस्त आहे, ही आणखी एक मागवा!’

माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक नुसरत फ़तेह अली खान साहेबांबद्दल सांगणार आहे, ज्यांना सगळे जण प्रेमाने आणि सन्मानाने ‘खाँ साहेब’म्हणायचे. हा किस्सा तेव्हाचा आहे, जेव्हा मी निर्माता सोहेल मकलई यांना राहुल रवैल यांच्याकडे घेऊन गेलो होतो. राहुलजींनी मी म्हणालो, ‘यांना तुमच्यासोबत चित्रपटाची निर्मिती करायचीय.’ त्यावर राहुलजींनी होकार दिला. पण, या चित्रपटासाठी त्यावेळी बॉबी देओलला साइन करणे तर दूरच; त्याला भेटणे आणि फोटो काढणेही खूप कठीण होते. परंतु, बॉबी माझा आणि सोहेलचा चांगला मित्र होता. शिवाय, राहुलजींनी सनी देओल यांचा पहिला चित्रपट ‘बेताब’चे दिग्दर्शन केले होते. त्यामुळे त्यांचेही देओल कुटुंबीयांशी जवळचे संबंध होते. राहुलजींच्या चित्रपटाला बॉबी नकार देऊच शकत नव्हता. झालेही तसेच. त्याने होकार दिला.

आता चित्रपटासाठी नायिका म्हणून कोणाला घ्यायचे, हा प्रश्न पडला. त्यावेळी ऐश्वर्या राय ‘मिस वर्ल्ड’ झाली होती आणि तिच्या घरासमोर भारतातील सगळ्या मोठ्या चित्रपट निर्मात्यांच्या रांगा लागत होत्या. बॉबी, राहुलजी आणि आम्हा सगळ्यांचे नशीब इतके चांगले होते की, ऐश्वर्याने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला. ‘और प्यार हो गया’ असे चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटातील खूप साऱ्या गोष्टी मी माझ्या बायोग्राफीमध्ये लिहिणार आहे. ही जोडी त्या काळात खूप मोठी आणि गाजलेली जोडी बनली होती.

आता चित्रपटाच्या संगीताचा मुद्दा पुढे आला, कारण ही एक प्रेमकथा होती. त्यामुळे संगीत उत्कृष्ट असावे आणि नायिका ‘मिस वर्ल्ड’ आहे, तर संगीतही वर्ल्ड क्लासच हवे आणि ते देखील अशा व्यक्तीचे जो स्वत: जगप्रसिद्ध आहे. राहुलजींनी नुसरत फतेह अली खान यांचे नाव घेतले आणि ते ऐकून सगळे उल्हसित झाले. त्यावेळी नुसरत फतेह अली खान यांच्या नावाची जगभरात क्रेझ होती आणि ते हॉलीवूडच्या चित्रपटांना संगीत देत होते. त्यांच्याशी संपर्क साधला आणि खाँ साहेब तयार झाले. ते पहिल्यांदा मुंबईला आले, तेव्हा त्यांना घ्यायला मी, राहुलजी आणि सोहेल मकलई गेलो होतो. आम्ही लांबून पाहिले.. सलवार कुर्ता घातलेला, डोक्यावर टोपी असलेला एक अतिशय सुदृढ माणूस चालत येतो आहे. ते आले आणि सलाम दुवा झाल्यावर आम्ही ‘सन अँड सँड’मध्ये गेलो. त्यांचा साधेपणा पाहून मी अवाक् झालो, त्यांच्यासोबत त्यांचे सेक्रेटरी इक़बाल हेही होते.

दुसऱ्या दिवशी जावेद अख्तर साहेब आले आणि नंतर संगीत बनवणे सुरू झाले. कधी हॉटेलमध्ये, कधी राहुलजींच्या ऑडिओ फाइल स्टुडिओमध्ये, तर कधी त्यांच्या घरी. खाँ साहेब खूप कमी बोलायचे. त्यांना चांगले खाद्यपदार्थ आवडायचे. खरं तर डॉक्टरांनी त्यांना मांसाहार आणि गोड पदार्थ न खाण्याची सक्त ताकीद दिली होती. पण, खाँ साहेब फक्त असे पदार्थच खायचे. मला चांगलंच आठवतं.. एकदा आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. जेवण झाल्यावर मी त्यांना विचारले, ‘खाँ साहेब, काही गोड खाणार का?’ त्यांनी वेटरला विचारले, ‘काय आहे गोड?’ वेटर म्हणाला, ‘गुलाब जामुन, शाही टुकडा आणि फिरनी.’ ते म्हणाले, ‘तिन्ही घेऊन ये, चव घेतो आणि सांगतो काय खायचंय..’ तीनही पदार्थ आले. खाँ साहेबांनी ते खाल्ले आणि म्हणाले, ‘फिरनी मस्त आहे, ही आणखी एक मागवा!’ खाँ साहेबांनी आणखी एक फिरनी घेतली, पण त्यांचे मन भरले नाही. पुन्हा एक मागवायला सांगितली आणि खाल्ली. त्यांनी आम्हाला लाहोरला येण्याचे आमंत्रण दिले. तिथे गेल्यावर आमचे खूप आदरातिथ्यही केले. एक दिवस जेवणानंतर त्यांनी मला विचारले, ‘रूमी साहेब, गोड काय खाणार?’ मी म्हणालो, ‘जे असेल ते सर्व मागवा. खाल्ल्यानंवर ठरवेन की काय चांगले आहे..’ त्यांना आपलाच किस्सा आठवला अन् ते खळखळून हसले. म्हणाले, ‘माझ्याकडे बघा आणि स्वत:कडे बघा.. कुणीही सांगेल की कुणी जास्त खाल्ले पाहिजे!’

असो. त्याच दरम्यान माझं लग्न ठरलं. २४ ऑक्टोबर १९९७ ही तारीख ठरली. मी खाँ साहेबांनाही लग्नाचे आमंत्रण दिले. त्यावेळी त्यांनी लग्नाला तर येईनच, पण गिफ्ट काय पाहिजे? असे मला विचारले. पुढे म्हणाले, ‘रूमी साहेब, यापूर्वी मी भारतात ऋषी कपूर यांच्या लग्नात गाणं गायला आलो होतो आणि आता मी तुमच्या लग्नात गाणं गाणार, हेच माझं गिफ्ट..’ मी त्यांना म्हणालो, ‘हे तर माझं सौभाग्य आहे. यापेक्षा आणखी मोठी गोष्ट काय असू शकते?’ परंतु, माझं दुर्दैव बघा. लग्नाच्या दोन महिन्यांपूर्वीच १६ ऑगस्ट १९९७ ला त्यांचे निधन झाले. मला नेहमी वाटतं की, त्यांनी स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष दिलं असतं, तर कदाचित ते इतक्या लवकर आपल्याला सोडून गेले नसते. त्यांच्याशी संबंधित अनेक घटना, किस्से आहेत. ते सदराच्या एका भागात लिहिणे जितके कठीण आहे, तितकेच खाँ साहेबांसारखा दुसरा कलाकार होणे अवघड आहे.

यावर अमीर मीनाई यांचा एक शेर आठवला…
हुए नामवर बे-निशाँ कैसे कैसे
ज़मी खा गयी आसमाँ कैसे कैसे…
मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की, मला खाँ साहेबांसोबत राहण्याची, फिरण्याची, त्यांना संगीत देताना पाहण्याची, त्यांना गाताना ऐकण्याची संधी मिळाली. ‘और प्यार हो गया’चा मुहूर्त हॉटेल लीला पेंटामध्ये झाला. या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्याकडे होती. तेव्हा खाँ साहेब आणि ऐश्वर्या रॉय यांची माध्यमांशी ओळख करून देताना मला खूप मान मिळाला. त्यावेळी ऐश्वर्याने नृत्य केले होते आणि खाँ साहेबांनी गाणे गायले होते. ती संध्याकाळ चित्रपट इतिहासातील संस्मरणीय संध्याकाळ होती. खाँ साहेबांच्या स्मरणार्थ ‘और प्यार हो गया’मधील हे गाणं ऐका…

मेरी साँसों में बसा है तेरा ही इक नाम, तेरी याद हमसफ़र सुबह-ओ -शाम। स्वत:ची काळजी घ्या आणि आनंदी राहा.

( बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक)



Source link