फलटण मध्ये शिवसेना व राजेगटाची शक्ती प्रदर्शनाची तयारी ; डॉ ज्योती वाघमारे यांची जाहीर सभा

0
94
फलटण मध्ये शिवसेना व राजेगटाची शक्ती प्रदर्शनाची तयारी ; डॉ ज्योती वाघमारे यांची जाहीर सभा

साहस Times फलटण : फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आपल्या प्रचाराला वेग देत असून 7 डिसेंबर 2025 रोजी बारामती चौक, फलटण येथे पक्षाच्या स्टार प्रचारक डॉ. ज्योती वाघमारे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार आणि प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

झोपडपट्टीतून राज्याच्या राजकारणात भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या डॉ. वाघमारे यांचा संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. मागासवर्गीय कुटुंबात जन्म, तेलुगू भाषिक संस्कार आणि आर्थिक प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी शिक्षण, सामाजिक भान आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर स्वतःची ठसठशीत ओळख घडवली.

सोलापूरच्या झोपडपट्टीतून सामाजिक चळवळीची सुरुवात करत त्यांनी महिलांवर, दलितांवर आणि वंचित घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका घेत राज्यभरात चळवळ उभी केली. आंबेडकरी आंदोलनातील ‘धगधगता अंगार’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. विद्रोही साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करून विद्रोही विचार जनमानसात पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले.

यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. त्यांच्या कार्यतत्परता, निष्ठा आणि थेट आक्रमक कार्यशैलीमुळे त्यांना अल्पावधीतच प्रदेश प्रवक्ता म्हणून जबाबदारी देण्यात आली. पक्षातील ‘मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी’ म्हणून त्यांची ओळख चर्चेत आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांत त्या पक्षाच्या ‘स्टार प्रचारक’ म्हणून राज्यभर सक्रिय आहेत. सभा निवडणूक प्रचाराला निर्णायक गती देईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.