देश – परदेश: विश्व स्वधर्मसूर्ये पाहो…

0
16
देश – परदेश:  विश्व स्वधर्मसूर्ये पाहो…


डॉ. ज्ञानेश्वर मुळे13 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

कांद्याचा भाव असो वा रामलल्लाची प्रतिष्ठापना, घटनेचे ३७० वे कलम रद्द होणे असो वा सॅन फ्रान्सिस्कोच्या भारतीय कौन्सुलेटवरचा खलिस्तानी शक्तींचा हल्ला असो; या सर्वांचाच प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष आपल्याशी संबंध असतो. आणि त्यांचा आपल्यावर प्रभावही पडतो. अशा विविध स्थानिक ते वैश्विक घटनांचे पदर उलगडून दाखवणारे, भारताचे माजी राजदूत, परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे विद्यमान सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांचे हे नवे पाक्षिक सदर.

महाराष्ट्र – राष्ट्र – परराष्ट्र या तीनही शब्दांत ‘राष्ट्र’ हा समान शब्द आहे. तीनही शब्द वेगवेगळ्या ‘भौगोलिक / प्रादेशिक’ संकल्पना किंवा भूभागाचे प्रतिनिधित्व करतात. पण तरीही, २१ व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात या तिघांचे अनन्यसाधारण संबंध आहेत. खरं तर, विविध अर्थांनी तीनही संकल्पनांमध्ये एकात्मता पाहता येते. व्यक्तिगत, सामूहिक, सामाजिक आर्थिक किंवा सांस्कृतिक; अशा कोणत्याही स्तरावरील कोणत्याही विषयावर आपले राज्य, राष्ट्र आणि राष्ट्राबाहेरील जग यांमध्ये आज अभिन्न असा संबंध आहे. बऱ्याचदा तो जाणवत नाही. पण, तो दूरगामी; खरं तर ‘सर्व-गामी’ आहे. तो अवकाशासारखा समस्त मानवतेला किंवा समस्त विश्वाला व्यापून आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात नुसतं खट्ट झालं, तरी त्याचा प्रतिध्वनी ताबडतोब जगभर उमटतो. रशिया आणि युक्रेनचे युद्ध असो, अॅमेझॉनमधली जंगलतोड असो, अमेरिकेतील निवडणुका असोत, चीनची आर्थिक प्रगती असो, सुदान किंवा येमेनमधले यादवी युद्ध असो की जपानमधला भूकंप असो; अशी घटना किंवा प्रसंग घडतो त्या क्षणी किंवा प्रत्यक्ष घडताना आपण वाचतो, पाहतो किंवा माहिती घेतो. उत्क्रांतीच्या दीर्घ इतिहासात प्रथमच पृथ्वीवरच्या चराचरात अशा प्रकारचा संबंध प्रस्थापित झाला आहे.

औद्योगिक क्रांती (१९- २० वे शतक) नंतर माहिती क्रांती, संपर्क क्रांती, पर्यटन क्रांती, इंटरनेट क्रांती आणि आताच्या ‘इन्स्टंट’ क्रांतीने एकीकडे मानवी संस्कृतीला नव्या उंचीवर नेतानाच दुसरीकडे, एका अत्यंत गुंतागुंतीच्या, गोंधळात टाकणाऱ्या (काही प्रमाणात दिशाहीन वाटणाऱ्या) जगात आणून सोडले आहे. वैश्विक पातळीवर आणि स्थानिक पातळीवर अनेक विरोधाभासांना व्यक्ती, समाज आणि देश तोंड देत आहेत. काही ठिकाणी या गोंधळाच्या स्थितीवर काम होत आहे, तर अनेक ठिकाणी देश आणि समाज या गोंधळात हरवून जात आहेत. अशा या आव्हानात्मक काळात आपण ज्या राज्यात राहतो, त्या महाराष्ट्रातील घटनांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आयामांशी नेमका काय परस्परसंबंध आहे, याचा शोध घेण्याचा प्रपंच या स्तंभातून करण्याचा विचार आहे. याउलट आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घटनांचा, प्रसंगांचा महाराष्ट्रावर काय प्रभाव पडतो आहे, याचाही मागोवा घेणे गरजेचे आहे.

आज ‘ग्लोबल’ आणि ‘लोकल’ यांतील सीमारेषा अंधुक झाल्या आहेत. एक वेळ होती जेव्हा ‘Think Global and Act Local’ असे सांगितले जायचे. आज मात्र हा विचारही शत-प्रतिशत प्रमाण मानून चालणार नाही. म्हणजे विचारात ‘वैश्विक’ आणि त्या विचाराच्या अमलात मात्र ‘स्थानिक’ असावे, या सूत्रालाही जसेच्या तसे स्वीकारता येत नाही. उलट ‘Think Local and Act National or Global’ असेही चित्र पाहता येते.

एक काळ असा होता की, ‘वसुधैव कुटुंबकम्’ किंवा ‘विश्वचि माझे घर’ हा विचार पंचमहाभूतांनाच लागू होता. समग्र जगाला जोडणाऱ्या सूत्रांमध्ये पृथ्वी, आप (पाणी), तेज, वायू आणि एक अवकाश यांचाच समावेश होता. वायू म्हणू शके की, मला सर्व पृथ्वी समान आहे, मी कुठेही जाऊ शकतो. तीच गोष्ट पावसाची. तो कुठेही पडू शकायचा (आजही पडतोच), पृथ्वी आणि समुद्र सर्वांना भूभागाने किंवा पाण्याने जोडतात. मानवी समाज मात्र आपापल्या प्रादेशिक सीमांमध्ये आपापले नियम करून राहत होते. उदा. हडप्पा आणि मोहेंजोदडोमधील रहिवाशांचा दक्षिण अमेरिकेतील इन्का संस्कृतीतील लोकांशी संबंध असलेला दिसत नाही.

तेव्हा आणि त्याआधी मनुष्यही प्राण्यांप्रमाणे जंगलात राहत होता. शेती संस्कृतीपासून आजच्या या ‘उत्तर आधुनिक’ काळापर्यंत माणसाच्या विस्मयकारक प्रवासात जलवाहतूक, प्राण्यांच्या वापरातून खुष्कीचा प्रवास आणि आता प्रसार व संपर्क माध्यमांबरोबरच सोपा विमानप्रवास ही केवळ क्रांतीच म्हणावी लागेल. रेल्वे आणि रस्ते विकसित करत गेल्या दोनेक शतकांत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आदानप्रदानात प्रचंड वाढ झाली आहे. २० व्या शतकाच्या शेवटच्या दशकातील इंटरनेट क्रांतीनंतर सोशल मीडियाच्या असीम व अनाकलनीय विस्ताराने जगाचे संपर्क जाळे घरोघरी आणि स्मार्टफोनमार्फत ‘हातोहाती’ पसरले आहे. आता तर कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाची झेप माणसाला दुय्यम बनवण्याच्या तयारीला लागलेली दिसते. रोबो, बिटकॉइन, बिग डेटा, व्हाॅट्सअॅप, क्यूआर आणि बारकोड, स्कॅनर्स, जीनोम तंत्रज्ञान अशा प्रकारच्या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाने आणि साधनांनी संपूर्ण समाज व जग जोडले गेले आहे.

या अशा झपाट्याने बदलणाऱ्या जागतिक घडामोडींमधील सूत्र शोधून ते साध्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न या स्तंभातून करण्याचा मनोदय आहे. कांद्याचा भाव असो वा रामलल्लाची प्रतिष्ठापना, घटनेचे ३७० वे कलम रद्द होणे असो वा अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्कोच्या भारतीय कौन्सुलेटवरचा खलिस्तानी शक्तींचा हल्ला असो; या सर्वांचाच प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष आपल्याशी संबंध असतो. आणि त्यांचा आपल्यावर प्रभावही पडतो. हा स्तंभ म्हणजे अशा घटनांचे पदर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न असेल.

(संपर्कः dmulay58@gmail.com)



Source link