दिव्य मराठी ब्लॉग: फक्त या 4 समस्या सोडवा, छत्रपती संभाजीनगरवासियांची मुख्यमंत्र्यांना विनंती

0
13
दिव्य मराठी ब्लॉग: फक्त या 4 समस्या सोडवा, छत्रपती संभाजीनगरवासियांची मुख्यमंत्र्यांना विनंती


  • Marathi News
  • Opinion
  • Chhatrapati Sambhaji Nagar Residents Request Eknath Shinde; Solve Four Problems | Vishwas Kolte

विश्वास कोलते2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असणारे औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर हे शहर आजघडीला असुविधांचे केंद्र झाले आहे. नागरी सुविधा आणि नियोजनाचा अभाव असल्याने शहर व्यवस्थेचा पूर्ण फज्जा उडालेला असून राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरसारख्या महानगरांपेक्षा छत्रपती संभाजीनगरमधील वास्तव्य आजघडीला महाग झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथली सोशिक जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. मात्र हा टाहो कारभाऱ्यांच्या कानात काही पोचत नाही. जनता सोशिक असल्याने त्यांना याचे काही सोयरसुतक नाही. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या पोकळ आश्वासनांवर जनतेची बोळवण होत आहे.

जनतेच्या तोंडचे पाणी पळवून त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात कारभाऱ्यांनी काहीच कसर सोडलेली नाही. आज शहरात मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने किमान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तरी आमचा हा टाहो ऐकतील अन् शहरवासियांना पाणी देण्यासाठी ठोस पावले उचलतील ही अपेक्षा आहे. या बैठकीच्या अनुषंगानेच शहरातील अनेक समस्यांपैकी केवळ 4 प्रमुख नागरी समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यासाठी हा लेखप्रपंच करत आहे. नगरविकास आणि नियोजन खात्याचा दीर्घ अनुभव असलेले राज्याचे मुख्यमंत्री याची दखल घेत छत्रपती संभाजीनगरकांचा वनवास संपवतील एवढीच माफक अपेक्षा यामागे आहे.

1. पाणी

छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीप्रश्न हा इथल्या नागरिकांसह राज्यासाठीही नवा नाही. राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी भरूनही पाच-सहा दिवसाआड पाणी पुरवठ्याचा त्रास इथली जनता सहन करते. शहराच्या जवळच राज्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण आहे. अवघ्या 17 लाख लोकसंख्येच्या शहराला पुरूनही खूप उरेल एवढी धरणाची क्षमता आहे. तरीही दररोज पाणीपुरवठा हे शहरवासियांसाठी आजही एक स्वप्नच ठरले आहे. लोकसंख्येच्या बाबतीत छत्रपती संभाजीनगरपेक्षा कैकपट जास्त असलेल्या पुणे व मुंबईसारख्या शहरांमध्ये उत्तम नियोजनाद्वारे सुरळीत पाणीपुरवठा केला जातो. तुलनेने जास्त लोकसंख्या असूनही या शहरांत जर हे शक्य होत असेल तर मग छत्रपती संभाजीनगरात का शक्य नाही एवढा साधा प्रश्न यानिमित्ताने मनात येतो. यात त्या शहरांतील कारभाऱ्यांचे नियोजन, दूरदृष्टी आणि इच्छाशक्ती या गोष्टी अतिशय महत्वाच्या ठरल्या आहेत. तुलनेने छत्रपती संभाजीनगरला असे दूरदृष्टी ठेवून नियोजन करणारे व प्रबळ इच्छाशक्ती असलेले कारभारी नसल्याचेच यावरून म्हणावे लागत आहे. पुण्यासारख्या शहरात येत्या 20-30 वर्षांत होऊ घातलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासूनच नियोजनासाठी पुढाकार घेत असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कामाचा धडाका आणि काम तडीस नेण्याची हातोटी राज्याला परिचयाची आहे. अशा नेत्यांमुळे शहरांच्या विकासाला गती मिळते. त्यामुळे आता दादांप्रमाणे आमच्या शहरासाठीही कारभाऱ्यांनी पुढाकार घेत पाण्याच्या समस्येपासून शहराला मुक्ती द्यावी एवढीच यानिमित्ताने अपेक्षा आहे.

2. सार्वजनिक वाहतूक, शहर बस

छत्रपती संभाजीनगरमधील दुसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव. शहराचा विस्तार, लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना आजही शहरात भक्कम अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. ही आजची स्थिती नसून गेल्या अनेक वर्षांपासून हा त्रासही जनता सहन करते आहे. सध्या शहरात स्मार्ट सिटी बस सुरू आहे, मात्र त्यांची संख्या, वारंवारता अतिशय तोकडी आहे. तसेच शहरातून जास्त प्रवास कराव्या लागणाऱ्या आतील मार्गांवरून या बसेसची सेवा उपलब्ध नाही. दुसरे म्हणजे या बसेसचे तिकिट दरही जवळपास रिक्षा भाड्याइतके आहे. मासिक पासची सुविधाही तितकी स्वस्त नाही. त्यामुळे सिटी बसमध्ये बसणे काय आणि रिक्षाने जाणे काय दोन्ही नागरिकांना सारखेच खर्चिक पडते. त्यामुळे शहरात सिटी बसची संख्या किमान तिपटीने वाढवून मुख्य तसेच आतील मार्गावरून किमान पाच ते सात मिनिटांनी बसेस उपलब्ध व्हाव्या अशा रितीने बसेसचे नियोजन करण्याची अपेक्षा आहे. तिकिट दरही कमी व्हावेत. राजधानी मुंबईत बेस्टचे किमान तिकिट पाच रुपये आहे. त्यामुळे बेस्टच्या धर्तीवर शहर बसचे नियोजन केले जावे एवढी माफक अपेक्षा आहे. दुसरे म्हणजे मीटर रिक्षा. शहरात मीटरनुसार धावणाऱ्या रिक्षा जवळपास नाहीच्या बरोबर आहेत. त्यामुळे यादृष्टीनेही कारभाऱ्यांनी पावले उचलण्याची अपेक्षा आहे.

3. वाहतूक नियोजन, पार्किंग

जुने शहर असल्याने आणि नंतरच्या विकासात नियोजनाच्या अभावामुळे आज शहरात अरुंद रस्ते व पार्किंगच्या जागांचा अभाव आहे. त्यामुळे या दृष्टीनेही नियोजनाची गरज आहे.

4. शहरालगत नव्याने विकसित होणाऱ्या वसाहतींचे नियोजन

शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असताना शहराला लागून असलेल्या भागात झपाट्याने नागरी वसाहती वसत आहेत. मात्र या वसाहतींच्या नियोजनाकडे कुणाचे लक्ष नसल्याचे चित्र आहे. शहरात बीड बायपास, हर्सूल-सावंगी, जटवाडा रोड, विद्यापीठ परिसर, पैठण रोड अशा परिसरात झपाट्याने नागरी वसाहती वाढल्या आहेत. मात्र या वसाहतींमध्ये नागरी सुविधा, रस्ते, ड्रेनेज, उद्याने, मोकळ्या जागा यांचा अभाव दिसत आहे. भविष्यात यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शहरालगतच्या विस्तारीकरणाचे योग्य नियोजन केले जावे अशी अपेक्षा आहे. याशिवायही इतर अनेक गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत. मात्र किमान या प्रमुख 4 गोष्टींचे नियोजन कारभाऱ्यांनी केले, तरी स्वराज्याचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिलेले आमचे शहर स्वराज्यातील आदर्श रयत वसाहत होईल याची आम्हा शहरवासियांना खात्री वाटते.

या तक्रारींकडे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शहराचे कारभारी सकारात्मकतेने बघून यावर उपायांसाठी ठोस नियोजन करतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.

आपलाच,

विश्वास कोलते.



Source link