डायरीची पाने: अशी साजरी व्हावी जयंती

0
20
डायरीची पाने:  अशी साजरी व्हावी जयंती


इंद्रजित भालेराव7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अलीकडं मी जयंतीमयंतीच्या कार्यक्रमाला शक्यतो जात नाही. कारण या कार्यक्रमांचे स्वरूप पार बदलून गेलं आहे. तिथला डीजेचा धिंगाणा, कार्यक्रमातला विस्कळीतपणा, विचारांपासून कोसो दूर गेलेले आयोजन यामुळे अशा कार्यक्रमांना जाणं म्हणजे जाणत्यानं आपला वेळ वाया घालवणं असतं. त्यामुळे मी असे कार्यक्रम टाळतो.

पूर्वी म्हणजे तीस-पस्तीस वर्षांपूर्वी मी आवर्जून अशा कार्यक्रमांना जायचो. तेव्हा बहुजन महापुरुषांचे जयंती सोहळे नुकतेच सुरू झाले होते. त्यांचं स्वरूप आजच्यासारखं भव्य-दिव्य नसायचं. छोट्या स्वरूपात हे कार्यक्रम व्हायचे. माझं वय तरुण होतं. भाषण करण्याचा उत्साह होता. माझ्या महाविद्यालयातले अनेक विद्यार्थी मागासवर्गीयांच्या वस्त्यांमधून असे कार्यक्रम करायचे आणि मी त्या कार्यक्रमाला यावं, असा आग्रह करायचे. मीही जायचो. खूप आनंद वाटायचा. गैरसोयी असायच्या, पण जायचोच आम्ही. आमच्याच वाहनावरून दोन-तीन प्राध्यापक मिळून जायचो.

जयंती करायची म्हणजे नेमकं काय करायचं, तेही त्या लोकांना फारसं माहीत नसायचं. तेव्हा सगळं आपणच करून घ्यावं लागायचं. खुर्च्या, टेबल, ध्वनिक्षेपक, सतरंज्या नसायच्या. मग कुणाच्या तरी अंगणात अवतीभोवतीच्या घरातली माणसं जमवून, असलीच तर त्या वस्तीतून, नसलीच तर कुठून तरी एखादी खुर्ची मागवायची, त्यावर डॉ. बाबासाहेबांची किंवा अण्णा भाऊंची किंवा गाडगेबाबांची, ज्यांची जयंती असेल त्यांची प्रतिमा ठेवायची. हार असेल तर प्रतिमेला हार घालायचा, नाहीतर फुलं वाहायची, उदबत्त्या लावायच्या आणि भाषणं करायची. जेवणाची सोय असेल, तर सगळ्यांसोबत तिथंच बसून जेवायचं आणि नसेल तर परत येऊन आपल्या घरी जेवायचं. अशा स्वरूपाचे ते कार्यक्रम होते. पण, समाजात होणाऱ्या बदलाचे आपण साक्षीदार आहोत, याचे समाधान असायचे. आम्ही जयंतीला गेलो की, वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप आनंद व्हायचा. त्यामुळं विद्यार्थी आणि आमच्यात एक वेगळं नातं निर्माण व्हायचं. हे सगळेच महापुरुष आस्थेचे विषय होते. त्यामुळं त्यांचं आणि त्यांच्याविषयीचं बहुतेक सगळं लेखन वाचलेलं असायचं. त्यांचं कार्य समोरच्या लोकांना समजेल अशा भाषेत सांगण्याचं कसबही आमच्याकडं होतं. त्यामुळं हे लोकही खुश व्हायचे. आपल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांशीही आपलं नातं निर्माण होतं, याचा आनंद वाटायचा. हे विद्यार्थीही त्या महापुरुषांच्या विचारानं झपाटून जायचे.

पुढे शहरांमधून या जयंत्यांचं स्वरूप बदलत गेलं. पिढ्या शिकू लागल्या. काही जण नोकरीला लागले. जयंतीसाठी लागणारी वर्गणी जमा होऊ लागली. सतरंज्या आल्या, टेबल-खुर्च्या आल्या, ध्वनिक्षेपक आले. हळूहळू हे सोहळे राजकारण्यांच्या ताब्यात गेले. नगरसेवक अशा जयंतीसाठी पैसा पुरवू लागले. मग डीजे आला, मोटारसायकल रॅली आणि सगळाच झगमगाट आला. नगरसेवक आल्याशिवाय जयंतीचा कार्यक्रम सुरू होईनासा झाला. आम्हाला वाट बघत बसावं लागायचं. भाषणं अभिनिवेशी आणि प्रचारकी व्हायची. पैसा पुढे येत गेला. विचार मागे पडत गेला. आम्हीही हळूहळू या गोष्टीतून अंग काढून घेत बाजूला झालो. या काळात शिवजयंती सुरू झाली होती, पण तिला आजच्यासारखं स्वरूप आलेलं नव्हतं. त्यामुळं तेव्हाही शिवजयंतीच्या फारशा कार्यक्रमांना मी गेलो नव्हतो. अलीकडच्या काळात मी कार्यक्रमांसाठी फिरतोय, व्याख्यानं करतोय, हे समजल्यावर काही लोक मला कार्यक्रमासाठी विचारू लागले. पण, मी सांगू लागलो की, शिवजयंती सोहळ्यात अपेक्षित असलेलं अभिनिवेशपूर्ण भाषण मला करता येत नाही. उगाच तुमचा अपेक्षाभंग व्हायचा. म्हणून शक्यतो मला बोलावू नका. एकूणच मी अलीकडच्या काळात सर्वच प्रकारच्या जयंत्यामयंत्यांना जाणं बंद करून टाकलेलं होतं.

या वर्षी मात्र शिवजयंतीनिमित्त दोन ठिकाणी गेलो आणि वेगळा अनुभव आला. अर्थातच कार्यक्रमाचे स्वरूप विचारूनच मी या कार्यक्रमांना होकार दिला होता. त्यातला एक कार्यक्रम होता पंढरपूरजवळच्या पेहे नावाच्या छोट्या गावातील जयंतीचा. या सोहळ्याचं आयोजन तिथली समस्त ग्रामस्थ मंडळी, छत्रपती युवक मंडळ व महाराष्ट्र शाळा कृती समिती यांचं असतं. तिथं गायकवाड गुरुजी म्हणून एक शिक्षक आहेत. त्यांचं एक शैक्षणिक संकुल या परिसरात आहे. तेच या कार्यक्रमाचे मार्गदर्शक असतात. माझ्याशी त्यांनीच संपर्क केला होता. सलग सात दिवस ही व्याख्यानमाला घेतली जाते. महाराष्ट्रातले शिवचरित्राचे बहुतेक सगळे अभ्यासक त्यांच्याकडं येऊन गेले आहेत. हा कार्यक्रम चार-पाच गावांच्या सीमेवरच्या एका शाळेच्या पटांगणात होतो. आजूबाजूच्या गावांचे लोक त्यासाठी येतात. अतिशय शांतपणे वक्त्याचे व्याख्यान ऐकून घेतात. तीन-चार हजार श्रोते असतात. महिलांची उपस्थितीही लक्षणीय असते. महिलांनी या कार्यक्रमाला यावं, असं गायकवाड गुरुजींना वाटायचं. पण, घरातल्या कामाच्या रगड्यात त्यांना येणं व्हायचं नाही. त्यात संध्याकाळची वेळ स्वयंपाकपाण्याची. म्हणून गुरुजींनी आजूबाजूच्या गावचे प्रायोजक गाठले आणि दररोज संध्याकाळी व्याख्यान संपलं की, उपस्थित सर्वांना तिथंच जेवण द्यायला सुरुवात केली. त्यामुळं महिला निर्धास्तपणे येऊ लागल्या. कार्यक्रमाला बसू लागल्या. ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटली. डीजे नाही, थरारक भाषणं नाहीत, कंठाळी गाणी नाहीत. फक्त आणि फक्त प्रबोधन डोळ्यासमोर ठेवून होत असलेल्या भाषणांना मिळणारा हा प्रतिसाद उत्साहवर्धक होता. आजूबाजूच्या गावातून अंधारात मार्ग कापत येणारे बायका-पुरुषांचे जथ्थे पाहिले आणि मी भारावून गेलो. कीर्तनाला असे लोक जाताना मी पाहिले होते, पण व्याख्यानासाठीही लोक असे जातात, हे इथं प्रथमच पाहत होतो. गावोगावच्या लोकांनी अशी शिवजयंती केली, तर ती नक्कीच समाजपरिवर्तनाचं माध्यम ठरेल.

अशाच आणखी एका सोहळ्याला गेलो, तो म्हणजे लातूरमधील महावितरण कंपनीचा शिवजयंती कार्यक्रम. तो कसा असेल, असा प्रश्न मला आधी पडला होता. पण, अभिमन्यू जगदाळे नावाच्या तरुणानं मला आवर्जून येण्याची विनंती केली. त्यांचे अभियंता राहुल गाडे यांनीही संपर्क साधला. अर्थात, या कार्यक्रमाचंही स्वरूप मी आधी समजून घेतलं. माझ्या भाषणाचं स्वरूप त्यांना समजावून सांगितलं आणि पटत असेल तरच बोलवा, असंही म्हणालो. त्यावर ते म्हणाले, ‘सर, आम्हाला बदलच अपेक्षित आहे. शहरातला, जिल्ह्याच्या ठिकाणचा हा जयंती सोहळा असला तरी कुठल्याही प्रकारचा अविचार तुम्हाला या आयोजनात दिसणार नाही.’ आणि खरेच तसे झाले. वातावरण उत्साही होते. सर्वांनी फेटे बांधले होते. ढोल, तुताऱ्या वाजत होत्या. अर्थातच डीजे नव्हता. शिवशाहीला शोभेल असाच सगळा जामानिमा होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या व्याख्यानाला लोकांची उपस्थिती खूप होती. संयोजक सांगत होते की, २६० खुर्च्या टाकल्या आहेत. दरवर्षी त्या कधीच भरत नाहीत. कारण आम्ही काही लोकांना पाहिजे तशी शिवजयंती साजरी करत नाही. पण, या वर्षी त्या खुर्च्या पुरल्या नाहीत. तुम्हीच पाहिलं पुष्कळ लोक पाठीमागं उभे होते. आणि तुमचं सव्वा तासाचं भाषण संपेपर्यंत कुणी जागचा हललाही नाही.. आणि हे खरं होतं. इतकंच नाही तर या लोकांनी वर्गणी जमा करुन एका अनाथाश्रमाला ५१ हजारांची देणगीही दिली होती. कार्यक्रमाचं नियोजन अतिशय नेटकं होतं. या कंपनीत कार्यरत असलेले नाट्य कलावंत प्रशांत जानराव यांचं खर्जातल्या आवाजातलं सूत्रसंचालन हा कार्यक्रमाचा एक विशेष होता. त्यांचे वरिष्ठ अधिकारी सुंदर लटपटे यांची प्रेरणा या सगळ्यामागे होती. मला या गोष्टी फार महत्त्वाच्या वाटल्या.

महापुरुषांच्या जयंती सोहळ्यांमधून प्रबोधन आणि सामाजिक उपक्रम या गोष्टी होणार असतील, तरच त्या महापुरुषाचे नाव घेण्याला काहीतरी अर्थ आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची मूळ प्रेरणा अशीच होती. नाही तर नुसता धांगडधिंगा करण्याला काहीही अर्थ नसतो. असे सोहळे राजकारण्यांच्या तावडीतून सुटून विचार करणाऱ्यांच्या ताब्यात येतील तेवढे ते चांगले होतील, असे मला वाटते.

(संपर्कः inbhalerao@gmail.com)



Source link