
Death By Period Medicine: सणवाराच्या दिवसांमध्ये महिलांना सर्वाधिक टेन्शन असतं ते म्हणजे मासिक पाळीचं! ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये मासिक पाळी येऊ नये असं प्रत्येकीला वाटतं. या वेळात मासिक पाळी आल्यास धार्मिक कार्यांपासून दूर रहावं लागतं. त्यामुळेच अनेकदा महिला मासिक पाळी लवकर यावी किंवा पुढे ढकलण्यासाठी हार्मोनल गोळ्यांचा वापर करतात. मात्र या गोळ्यांचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केलं पाहिजे. असं न केल्यास हा प्रकार अगदी जीवावरही बेतू शकतो. असाच काहीसा प्रकार एका 18 वर्षीय मुलीसोबत घडला ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला.
नेमकं घडलं काय?
घरात पूजा असल्याने मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी 18 वर्षीय तरुणीने हार्मोन्सच्या गोळ्या खाल्ल्या. या गोळ्यांमुळे तरुणीला प्रचंड वेदना होऊ लागल्या. डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र याला तिच्या वडिलांनी नकार दिला. या साऱ्या गोंधळात तरुणीचा मृत्यू झाला. या विचित्र प्रकरणाची माहिती रक्तवहिन्यासंबंधी प्रसिद्ध सर्जन (Vascular Surgeon) डॉ. विवेकानंद यांनी दिली आहे. ‘रीबूटींग द ब्रेन’ नावाच्या पॉडकास्टमध्ये डॉ. विवेकानंद यांनी नेमकं काय घडलं हे सांगितलं.
“एक 18 वर्षीय तरुणी तिच्या मैत्रिणींसहीत माझ्या क्लिनिकमध्ये आली होती. तिचे पाय आणि मांड्या प्रचंड दुखत होत्या. तिच्या पायांना सूज आलेली. तिला अस्वस्थ वाटत होतं. मी तिच्याकडे हे सारं कधीपासून होतंय वगैरे विचारलं,” असं डॉ. विवेकानंद यांनी सांगितलं. त्यावर या तरुणीने डॉक्टरांना घरी पूजा असल्याने तिने परिएड्स पुढे ढकलण्यासाठी काही हार्मोनल गोळ्या घेतल्याचं सांगितलं.
तरुणीला कसला त्रास होता?
“चाचण्यांदरम्यान तरुणील डीप व्हेन थोम्बोसिस त्रास असल्याचं निदान झालं. तिच्या नाभीजवळ गाठ आलेली. आम्ही तिच्या वडिलांना फोन करुन तुमच्या मुलीला रुग्णालयात दाखल करावं लागले असं सांगितलं. मात्र या तरुणीच्या वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला. तिची आई तिला उद्या घेऊन जाईल,” असं सांगितल्याचं डॉ. विवेकानंद म्हणाले. यानंतर डॉक्टर शिफ्ट संपवून घरी गेले.
मध्यरात्री 2 वाजता फोन आला अन्…
“मध्यरात्री 2 वाजता मला फोन आला की या मुलीला आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आल्याचं सांगितलं. तिला श्वास घेता येत नव्हता. तोपर्यंत फार उशीर झालेला. तिचा मृत्यू झाला. तिला डीप व्हेन थोम्बोसिसचा त्रास होता. यामध्ये शिरांमध्ये रक्तांच्या गुठळ्या तयार होतात,” असं डॉ. विवेकानंद म्हणाले. पिरिएड्ससंदर्भातील गोळ्या घेतल्याने रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढलं असा अंदाज बांधला जात आहे.
FAQ
मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या का घेतल्या जातात?
सणासुदीच्या किंवा धार्मिक कार्यांच्या वेळी मासिक पाळीमुळे अडचण येऊ नये म्हणून अनेक महिला हार्मोनल गोळ्यांचा वापर करतात, ज्यामुळे मासिक पाळी पुढे ढकलली जाते.
मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेणे सुरक्षित आहे का?
नाही, या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे धोकादायक ठरू शकते. यामुळे गंभीर दुष्परिणाम, जसे की रक्ताच्या गुठळ्या (डीप व्हेन थ्रोम्बोसिस) होऊ शकतात, ज्याचा परिणाम जीवावरही बेतू शकतो.
18 वर्षीय तरुणीच्या मृत्यूचे कारण काय होते?
घरात पूजेसाठी मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी तिने हार्मोनल गोळ्या घेतल्या होत्या. यामुळे तिला डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) झाला, ज्यामध्ये तिच्या शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या. तिच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाल्याने तिचा मृत्यू झाला.
डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) म्हणजे काय?
डीप व्हेन थ्रोम्बोसिस हा एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये शरीरातील खोल शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. यामुळे वेदना, सूज आणि गंभीर प्रकरणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, ज्याचा परिणाम मृत्यूदेखील होऊ शकतो.