गोष्ट सांगतो ऐका…: पाकीट

0
5
गोष्ट सांगतो ऐका…:  पाकीट


अरविंद जगताप8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

कुत्रे भुंकू लागल्याने सदा पुढं पळून गेला होता. पोलिसाला ते बिलकुल आवडलं नाही. आपल्या बिझनेस पार्टनरने संकटात टाकून पळून जाणं कुणाला आवडेल?

गावाचं बस स्थानक. दिवसभरात तीन – चारच बस, त्यामुळं प्रत्येक गाडीला गर्दी. त्यात ही रात्री शेवटची बस. बस आली आणि पंधरा – वीस लोक दाराच्या दिशेनं निघाले. प्रत्येक जण दुसऱ्याला लोटून पुढं जाण्याच्या प्रयत्नात. जागा मिळवण्यासाठी धडपड. त्याच गर्दीत मनोज होता. तो तसा शहरात राहणारा. पण, व्यवसायामुळं फिरस्तीवर असणारा. त्याचा विम्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. व्यवसायामुळं राहतो एकदम टापटीप. तो सदाच्या नजरेत भरला. पाकीटमार सदा आपलं सावज हेरण्यात पटाईत.

मनोज गर्दीत जरा मागे पडला. शेवटी बसमध्ये शिरू लागला. तेवढ्यात सदाने डाव साधला.पाकीट मारून माघारी फिरला. पण, शेजारी असलेल्या एकाने बघितलंच. तो ओरडू लागला.. पाकीट मारलं.. पाकीट मारलं.. सगळे बघू लागले. पण, ते ऐकून सदाने धूम ठोकली. मनोजला लक्षात आलं, आपलंच पाकीट मारलं गेलंय. तो पण पळू लागला. पण, तेवढ्यात एक पोलिस आला. तो मनोजला म्हणाला, ‘मी पकडतो चोराला..’ पोलिस सदाच्या मागं पळू लागला. तसाही सदा दिसेनासा झाला होता. शेवटची बस सोडून चालणार नव्हतं.

मनोज निराश होऊन गाडीत बसला. आसपास बसलेल्या सगळ्यांना त्याची दया आली. एक – दोघांनी त्याचं तिकीट काढायची तयारी दाखवली. पण, मनोजच्या खिशात तेवढे पैसे होते. हळूहळू लोक पाकीट चोरल्याचे जुने किस्से सांगू लागले. त्यातून मनोजला लक्षात आलं की, या बसस्थानकात चोरीला गेलेलं पाकीट कधीच परत मिळालं नाही. बिचारा तोंड लटकवून बसला.

पोलिस सदाच्या मागे धावत होता, ओरडत होता. पण, सदा वेगात पळत होता. मागं वळून बघतही नव्हता. रात्रीची वेळ. त्यात निर्जन पायवाट. अचानक कुत्रे भुंकू लागले. पोलिस घाबरून थांबला. कुत्रे पण एवढे दीड शहाणे.. चोर सोडून पोलिसाला भुंकत होते. पोलिस खूप वेळ शांत उभा राहिला. कुत्रे शांत झाले. तसा पोलिस पुन्हा वेगात निघाला.

हळूहळू वेग वाढवत तो एका ठिकाणी पोचला. छोटी चहाची टपरी होती. अर्थात बंदच होती. पण, ठरल्याप्रमाणं सदा तिथं लपून बसला होता. पोलिसाची आणि त्याची मिलीभगत होती. चुकून पाकीट मारताना सदा सापडला, तर पोलिस त्याचा पाठलाग करायचा. मध्ये पडायचा. त्यामुळं गेल्या दोन वर्षांत सदाला जेलची हवा खायची वेळ आली नव्हती. त्या बदल्यात सदाने पोलिसाला अर्धी कमाई द्यायची ठरलेलं होतं.

आता पोलिस पोचला. पण, संतापला होता. कारण आवाज देऊनही सदा थांबला नव्हता. फार धोका नसेल, तर पोलिस आवाज देणार आणि सदाने थांबायचं, हे ठरलेलं होतं. कारण उगाच एवढी धावपळ पोलिसाला मानवत नव्हती. बरं बाइक असून ती वापरता यायची नाही. कारण अशावेळी ज्याचं पाकीट चोरीला जायचं, तो बाइकवर बसून सोबत यायचा हट्टच धरायचा. म्हणून मोठ्या नाईलाजाने पोलिस धावतच सदाचा पाठलाग करायचा. त्यात आज ज्याचं पाकीट मारलंय, तो शेवटची बस असल्यानं निघून गेला होता. तरीही सदा उगाच पळत राहिला, याचा पोलिसाला राग आला होता. दमला होता बिचारा.

सदाला हे माहीत होतं. त्यानं दोन मिनिट शिव्या खाऊन घेतल्या. पण, कुत्रे भुंकू लागल्याने तो पुढं पळून गेला होता. पोलिसाला ते काही पटलं नाही. आवडलं तर बिलकुल नाही. आपल्या बिझनेस पार्टनरने आपल्याला संकटात टाकून पळून जाणं कुणाला आवडेल? पण, रात्र खूप झाली होती. बाइक तिथंच टपरीपाशी होती. घरी जायची वेळ झाली होती. पोलिसाने आपला हिस्सा मागितला. सदाने पाकीट काढलं. त्या अंधारातही दोघांना दिसत होत की पाकिटात एकही रुपया नाही. दोघेही अवाक् झाले. पोलिस तर भडकला.

आता त्याच्या मनात वेगळीच शंका आली. सदा आपण आवाज देत असतानाही का थांबला नाही, हे त्याच्या लक्षात आलं. सदाने नक्कीच काही तरी घोळ घातलेला होता. खूप वेळ बाचाबाची झाली. पोलिस खूप शिव्या देतोय, हे बघून सदाने त्याला एक जोरदार शिवी हासडली. म्हणाला, ‘खरा पोलिस असल्यासारखा माज करू नको!’ अरे हो, हा पोलिस खराखुरा पोलिस नव्हता. खाकी कपडे घालून फिरणारा तोतया होता. सदा आणि पोलिस दोघांनी खूप डोकं लावून ही पद्धत वापरायला सुरूवात केली होती.

पोलिसाने आता नमते घेत पुन्हा शेवटची आशा म्हणून पाकीट चाचपून पाहिलं. पण, त्यात प्लॅस्टिकच्या छोट्या पाकिटात असलेली एक गणपतीची प्रतिमा होती. देवाचा फोटो बघून पोलिसाच्या डोक्यात वेगळाच विचार आला. कधी तरी पाकीट परत केलं, तर लोकांचा विश्वास बसेल.. खरं तर एखाद्या बस स्थानकात ते दोघे महिना – पंधरा दिवसापेक्षा जास्त थांबायचे नाहीत. तरी पोलिसाने बाइक काढली. बस जायची तो रस्ता गाठला. बस थांबवून पाकीट परत केलं. प्रवाशांना हा अनुभव नवीन होता. मनोजच्या डोळ्यात तर पाणी आलं. पोलिसाने पाकीट चेक करायला सांगितलं.

कंडक्टरने बसमधले दिवे लावले. मनोजने पाकीट बघितलं. गणपतीची प्रतिमा.. तिचं दर्शन घेतलं. म्हणाला, ‘पैसे नव्हतेच. ही मूर्ती महत्त्वाची.’ पोलिस म्हणाला, ‘एवढं मानता गणपतीला?’ मनोज म्हणाला, ‘सोन्याचा आहे हा साहेब, म्हणून जीव जळत होता..’ प्लास्टिकच्या पिशवीतून बाहेर डोकावणारी गणपतीची प्रतिमा खरोखर सोन्याची होती. लोक नेहमी पाकिटात ठेवतात तसा पाच – दहा रुपयाचा गणपती समजून पोलिस आणि सदाने मोठी चूक केली होती. पण, मनोज खुश होता. त्यानं पोलिसाला आग्रह करून सेल्फी काढली. एवढी प्रामाणिक माणसं कुठं भेटतात आजकाल?

खरी गडबड दुसऱ्या दिवशी झाली. तो फोटो मनोजने फेसबुकवर टाकला. प्रामाणिक पोलिस भेटला, अशी छान कौतुकाची पोस्ट लिहिली. पण, तिथंच घोळ झाला. हा पोलिस कोण? म्हणून खात्यात विचारणा सुरू झाली. आपल्या प्रामाणिक सहकारी पोलिसाबद्दल आपल्याला माहिती नाही, हे पोलिसांना खटकलं. त्यांनी त्याचा कसून शोध घेतला. आणि कौतुकानं फोटो काढायला तयार झालेला पोलिस जेलमध्ये गेला. सदा आता नव्या, डमी पोलिसाच्या शोधात आहे.. जो प्रामाणिक नसेल अशा…

(संपर्कः jarvindas30@gmail.com)



Source link