गोष्ट सांगतो ऐका…: इंग्लिश बाबा!

0
20
गोष्ट सांगतो ऐका…:  इंग्लिश बाबा!


अरविंद जगताप9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सुयश इंग्लिश बाबाविषयी खूप ऐकून होता. हरवलेले खूप लोक या बाबामुळं सापडल्याचं लोकांनी सांगितलं होतं. शेवटी मनाचा निर्धार करून तो बाबाकडं गेला…

शहरात सगळे त्याला इंग्लिश बाबा म्हणायचे. कारण बाबा एकदा थेट देवाशी बोलायला लागला की इंग्रजीत बोलायचा. समोर बसलेले भक्त अवाक् होऊन जायचे. कारण बाबा साधारण सातवी शिकलेला आहे, हे त्याला ओळखणारे सगळे सांगायचे. एरवी अतिशय सुमार हिंदी बोलणारा बाबा देवाशी संवाद सुरू झाला की थेट इंग्रजीत बोलू लागतो. खूप वेळा देवावर रागावतो. कधी कधी देवाला मोठ्यानं बोलायला सांगतो. ऐकणारे भक्त चकित होतात. पण, बरेच लोक सांगतात, एकदा का इंग्रजीत संवाद झाला की बाबा सांगतो, ते खरं होतं. त्यामुळं बाबाकडं होणारी गर्दी वाढतच चाललीय.

बाबा भविष्य सांगतो. म्हणजे साधारण काय होतं? तर बाबाकडं अडचण घेऊन आलेला माणूस रांगेत बसलेला असतो. एकदाचा त्याचा नंबर येतो. माणूस बसून राहतो. बाबा कधी डोळे मिटून बसतो. कधी त्या माणसाकडं एकटक बघत बसतो. कधी चक्क झोपी जातो. मध्येच कधी तरी तो जागा होतो. मग थेट इंग्रजीत बोलू लागतो. अशावेळी भक्त समजून जातात की, बाबाचा देवाला कॉल लागला. बाबा इंग्रजीत काय बोलतो, हे भक्ताला कळत नाही. भक्ताला कशाला, इंग्रजीच्या जाणकार माणसालाही कळत नाही. पण, बाबाचा एक शिष्य आहे. त्याला मात्र बाबाची भाषा कळते. तो डॉक्टरांसारखा एका छोट्या चिठ्ठीवर प्रीस्क्रिप्शन लिहिल्याप्रमाणं लिहितो. ती चिठ्ठी बाहेरच्या खोलीत कॅश काउंटरला पाठवली जाते. आता अडचण असलेल्या माणसाने बाहेर जायचं. तिथं पैसे जमा करायचे. चिठ्ठी घ्यायची. चिठ्ठीत उपाय लिहिलेला असतो. तो उपाय करायचा.

एका माणसाची बायको खूप उपचार करूनही बरी होत नव्हती. तिला अर्धांगवायू झाला होता. बाबाने एक महिना कावळ्यांना गुलाबजाम खाऊ घालायला सांगितलं. आणि त्या माणसाची बायको बरी झाली म्हणे.. एका बाईचा नवरा गायब झाला होता. वर्ष झालं ती शोधत होती. शेवटी कुणीतरी बाबाचं नाव सांगितलं. ती बाबाकडं आली. बाबाने तिला सरड्याला शिरा खाऊ घालायला सांगितला. बाई चिंतेत पडली. पण, एका पडक्या घरापाशी सरडा दिसला. ती महिनाभर रोज शिरा बनवून त्या घराच्या पडक्या भिंतीवर ठेवत होती. एक दिवस नवरा स्वत: परत आला म्हणे.. म्हणजे सरड्याने शिरा खाल्ला बहुतेक..

..तर अशा गोष्टी सोशल मीडियावर फिरत असतात. सुयश त्या वाचत असतो. पण, आज त्याला त्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत होत्या. कारण दोन दिवस झाले त्याच्या बायकोचा पत्ता नव्हता. एक दिवसभर वाट पाहून त्याने स्वत:च्या घरी फोन केला. त्याची आई रडायला लागली. तिची मुख्य चिंता ही होती की लोकांना काय तोंड दाखवणार? मित्राला फोन केला तर तो म्हणाला, ‘मी तुला आधीच सांगितलं होतं की तिच्याशी लग्न करू नको. मला आधीपासूनच तिचं लक्षण ठीक नव्हतं वाटत..’ कंटाळून तिच्या घरच्यांना फोन केला, तर ते म्हणाले, ‘तूच काहीतरी बोलला असशील. आधीच आमची लेक एवढी हळवी, त्यात तुझ्यासारखा राक्षस नशिबी आला..’

सुयशला दोन दिवसांत काहीच माहिती मिळाली नाही. आणि मदतही. पश्चात्ताप मात्र खूप झाला. कारण लोक काहीबाही बोलू लागले होते. सगळे काही तोंडावर बोलत नव्हते. पण, माघारी काय चर्चा चालू असेल, याचा त्याला अंदाज येत होता. दोन दिवस खूप अस्वस्थेत गेले. पोलिस, मित्र-मैत्रिणी सगळ्यांना भेटून झालं. पण, काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. शेवटी कितीही समंजस माणूस अशावेळी वाटेल ते करायला तयार होतो. त्यात सुयश इंग्लिश बाबाविषयी खूप ऐकून होता. हरवलेले खूप लोक बाबामुळं सापडले, असं लोकांनी सांगितलं होतं. शेवटी मनाचा निर्धार करून तीन – चार दिवसांनी तो बाबाकडं गेला. गर्दी होतीच. लोक समस्या सांगत होते.

एका बाईने सांगितलं की, तिच्या नवऱ्याची दारू सुटत नाही. बाबाने उपाय सुचवला, पाच दिवस उंदराला टोपणभर दारू पाजा.. असे उपाय ऐकून सुयशला परत जायची इच्छा झाली. पण, लोकांची कामं होत असणार म्हणून तर एवढी गर्दी आहे, असं त्याने स्वत:ला समजावलं. थांबून राहिला. त्याला त्या गर्दीत काही श्रीमंत लोकही दिसले. मग त्याच्या मनाला अजून धीर आला. श्रीमंत माणसं जे करतात, ते मध्यमवर्गीय माणसाला नेहमी योग्य वाटतं. सुयश बसून राहिला.

काही वेळाने बाबा झोपेतून उठला. इंग्रजीत बोलू लागला. त्याच्या शिष्याने चिठ्ठी लिहिली. सुयश पैसे देऊन ती चिठ्ठी घेऊन बाहेर पडला. पूर्व दिशेला रोज पाच किलोमीटर चालत जायला सांगितलं होतं. म्हणजे बायको पूर्व दिशेला सापडेल, असं बाबाला सुचवायचं होतं. सुयश तीन-चार दिवस रोज पूर्वेला पाच किलोमीटर चालू लागला. पण, कुठे काही सुगावा लागत नव्हता. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे त्याचं लक्ष जायचं. पहिले दोन दिवस खूप आशा वाटत होती. पण, नंतर तो निराश झाला. मग आपल्याकडून सांगण्यात काही चूक झाली असेल, असं त्याला वाटू लागलं. त्याने पुन्हा एकदा बाबाकडं जावं, असा सल्ला बाबाच्या चाहत्यांनी त्याला दिला. सुयश गेला. यावेळी त्याला दक्षिणेकडे जायला सांगितलं.सुयशने तेही मनापासून केलं.

चार – पाच दिवस त्या दिशेला शोध घेत राहिला. पण, काही उपयोग झाला नाही. आता खूप पैसेही गेले होते. तरीही बाबाचे चाहते ‘एकदा प्रयत्न करून पाहा’ म्हणाले. पण, सुयश यावेळी बाबाकडं गेला नाही. भरदुपारीच तो बिअर बारमध्ये गेला. तीन – चार बिअर प्यायला. शांत बसून राहिला. त्याला स्वतःची लाज वाटत होती. आपण या बुवाबाजीला कसे बळी पडलो? सुयश त्या दुपारच्या उन्हात रस्त्याने चालू लागला. एकटाच. त्याला काहीच सुचत नव्हतं. नीट चालताही येत नव्हतं. तो एका जागी थांबला. खूप वेळ. एवढी कधीच प्यायला नव्हता बिचारा..

अचानक त्याला एक स्त्री दिसली. सुयश तिच्यामागं चालू लागला. त्या स्त्रीला काही वेळाने संशय आला. ती घाईत चालू लागली. पण, सुयशला कुठं भान होतं? तो पाठलाग करत राहिला. ती घाईघाईत एका गल्लीत शिरली. सुयशही मागोमाग गेला. त्यानंतर काय घडलं माहीत नाही…

रात्री इंग्लिश बाबाचा सुयशला फोन आला. ‘माझी बायको कुठं आहे?’ असं त्यानं विचारलं. सुयश ‘माहीत नाही’ म्हणाला. बाबा म्हणाला, ‘सीसीटीव्ही पहिलाय मी.. तू तिचा पाठलाग करत होतास. कुठं गेला सांग.. माझी बायको कुठं आहे सांग..’ अचानक सुयश बाबासारखा इंग्रजीत बोलू लागला. बाबा आणखी संतापला. सुयश म्हणाला, ‘आता तूच चिठ्ठी लिही आणि तूच शोध.. बघू तुला तुझी बायको सापडते का?’ बाबा माफी मागू लागला. गयावया करू लागला. सुयश पुन्हा इंग्रजी बोलू लागला. इंग्लिश बाबाने त्या दिवशीपासून इंग्रजीत बोलणं बंद केलं. खरं तर लोकांशीच बोलणं बंद केलं.

(संपर्कः jarvindas30@gmail.com)



Source link