
नुकताच एका 30 वर्षीय महिलेच्या गर्भवती होण्याचे एक दुर्मिळ प्रकरण समोर आलं आहे. ती महिला गर्भवती आहे हे तिला कळण्यासही वेळ लागला. कारण महिलेला गर्भाशयाऐवजी यकृताच्या उजव्या भागात 12 आठवड्यांची गर्भधारणा झाली. एवढंच नाही तर या गर्भाला हृदयाचे ठोके देखील होते. महिलेची तपासणी करणारे रेडिओलॉजिस्ट डॉ. के. के. गुप्ता यांनी जेव्हा तपासणी केली त्यांनाही धक्का बसला. (Pregnancy not in the uterus but in another organ Woman and doctor shocked health news in marathi)
डॉ. के.के. गुप्ता म्हणाले की, ही महिला बुलंदशहर जिल्ह्यातील रहिवासी असून महिलेला आधीच दोन मुलं आहेत. ही महिला गृहिणी असून तिचा पती एका खाजगी कंपनीत काम करतो. गेल्या दोन महिन्यांपासून ही महिला सतत पोटदुखी आणि उलट्या होत असल्याची तक्रार करत होती. तिने अनेक ठिकाणी उपचार घेतले, पण तिला आराम मिळाला नाही. यानंतर, तिला संपूर्ण पोटाची एमआरआय तपासणीसाठी एका खाजगी इमेजिंग आणि डायग्नोस्टिक सेंटरमध्ये पाठवण्यात आलं.
डॉ. के. के. गुप्ता यांनी तिची तपासणी केली तेव्हा असे आढळून आले की, गर्भधारणा गर्भाशयाऐवजी यकृताच्या उजव्या भागात होती. वैद्यकीय भाषेत या स्थितीला इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात, जी स्वतःच अत्यंत दुर्मिळ आहे. या प्रकारची एक्टोपिक प्रेग्नन्सी सर्व एक्टोपिक केसेसपैकी फक्त 0.03% मध्येच आढळते. त्यांनी ताबडतोब महिलेच्या स्थितीची माहिती तिच्या डॉक्टरांना दिली आणि प्रकरणाची गंभीरता समोर आली. अशा परिस्थितीत, गर्भाशयाबाहेर गर्भाचा विकास अत्यंत धोकादायक मानला जातो. गर्भपात आणि शस्त्रक्रिया हे यासाठी एकमेव उपचार असतात. ज्यामुळे महिलेचा जीव वाचविला जाऊ शकतो. शस्त्रक्रियेदरम्यान थोडेसे यकृत देखील कापावे लागण्याची शक्यता असते.
देशातील कदाचित अशा प्रकारची पहिलीच केस आहे. डॉ. गुप्ता यांनी दावा केला आहे की त्यांनी खूप तपासणी केल्या आहेत, पण देशात अशा प्रकारची कोणतीही माहिती त्यांना यापूर्वी कधीही मिळाली नाही. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच केस असावी. असा प्रकार यापूर्वी कधीही घडला नाही. आयएमएचे माजी सचिव आणि वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनीष त्यागी म्हणतात की, असा कोणताही प्रकार त्यांच्या निदर्शनास यापूर्वी कधीही आला नाही. आयएमएच्या कोणत्याही डॉक्टरांनीही अशा प्रकारची घटना घडल्याची पुष्टी केलेली नाही. महिलेला शस्त्रक्रियेसाठी एम्समध्ये पाठवण्यात आले आहे.