खलनिग्रहणाय: सिंघम नव्हे, सहृदयी पोलिस हवा

0
25
खलनिग्रहणाय:  सिंघम नव्हे, सहृदयी पोलिस हवा


डॉ. भूषणकुमार उपाध्याय13 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सामान्य लोकांच्या मनात पोलिसांविषयी आदरयुक्त दरारा जरूर असावा. चूक केली, कायदा किंवा नियम मोडला तर पोलिस सोडणार नाहीत, याची जाणीव जशी त्यांना असली पाहिजे, तसे संकटाच्या वेळी पोलिस आपल्यासाठी धावून येतील, हा विश्वासही त्यांच्या मनात रुजला पाहिजे. पोलिसांची भीती फक्त गुन्हेगारांना वाटली पाहिजे, सामान्य लोकांना नव्हे.

अलीकडच्या काळात सामान्यपणे ‘सिंघम’ ही उपाधी गुंडांना ठोकून काढणाऱ्या, आपला रुबाब दाखवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांसाठी वापरली जाते. जाड मिशी, डोळ्यावर गॉगल, जिममध्ये व्यायाम करून बनवलेले शरीर, छाती काढून चालण्याची पद्धत अन् एकूणच ताठर व्यक्तिमत्त्व ही या ‘सिंघम’ची लक्षणे असतात. अजय देवगणच्या ‘सिंघम’ चित्रपटापासून हा शब्द रूढ झाल्याचे दिसते. अशा चित्रपटांमधला हीरो रस्त्याच्या बाजूचा विजेचा मोठा खांबही सहज उचलून फेकून देतो. गुंडांची धुलाई करणे हा तर त्याच्या डाव्या हाताचा मळ! आपला रुबाब दाखवण्यासाठी तो सारखा मिशीवर ताव देत असतो. अनेक वरिष्ठ, कनिष्ठ पोलिस अधिकारी आणि अंमलदारांवर अशा ‘सिंघम’चा प्रभाव पडत असल्याचे या खात्यात काम करताना मी पाहिले आहे. सामान्य लोकांना अशा सिंघमशी काही देणेघेणे नसते. त्यांना आपल्या तक्रारीची दखल घेऊन, न्याय मिळवून देणाऱ्या एका सहृदयी पोलिसाची गरज असते. पोलिस स्टेशनला आलेल्या सामान्य माणसाला व्यवस्थित बसवून एक ग्लास पाणी दिले तरी त्याला खूप बरे वाटते.

या संदर्भात घडलेला एक किस्सा सांगतो. एका जिल्ह्यात मी पोलिस अधीक्षक म्हणून काम करीत असताना, पोलिस स्टेशनला आल्यावर लोकांना कशी वागणूक द्यावी, याविषयीचे एक परिपत्रक जारी केले होते. कुणी पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आला तर आधी त्याला बसायला खुर्ची द्यावी, त्यानंतर एक ग्लास पाणी द्यावे आणि मग त्याचे म्हणणे नीट ऐकून घ्यावे, अशी सूचना त्यात केली होती. एकदा असं घडलं की, एका पोलिस ठाण्यात एक अतिशय गरीब माणूस तक्रार द्यायला आला. हे परिपत्रक ठाणे अंमलदाराच्या टेबलावर काचेखाली लावलं होतं. ते बघून ठाण्यातील पाळीवर असलेल्या शिपायाने त्या माणसाला खुर्चीवर बसायला सांगितलं. पण, दोन-तीनदा सांगूनही तो काही खुर्चीवर बसेना. मग त्या शिपायाने रागावून, त्याच्या खांद्याला जोरात पकडत खुर्चीवर बसवलं अन् सांगितलं, ‘तक्रार द्यायला येणाऱ्याला खुर्चीवर बसवण्याचा माननीय पोलिस अधीक्षक साहेबांचा आदेश आहे. त्याचं पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे.’ तो माणूस अगदी धास्तावूनच खुर्चीवर बसला होता.

तेवढ्यात या शिपायाने पाण्यानं भरलेला ग्लास टेबलावर ठेवला अन् म्हणाला, ‘हे पाणी प्या!’ त्या माणसाने घाबरत सांगितलं, ‘साहेब, मला तहान नाही लागली, म्हणून मला पाणी नको.’ त्यावर पुन्हा रागावत हा शिपाई म्हणाला, ‘पोलिस अधीक्षक साहेबांच्या आदेशाप्रमाणं तुम्हाला पाणी प्यावं लागेल, तुम्हाला मी पाणी पाजणारच!’ हा सगळा प्रकार तिथं बसलेले एक ज्येष्ठ पत्रकार बघत होते. त्यांनी मला फोन करून सांगितले की साहेब, तुमचं हे परिपत्रक मागे घ्या. हा प्रकार सांगण्याचा मथितार्थ असा की, पोलिस स्टेशनला आलेल्या लोकांना सर्वप्रथम सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे. त्यासाठी त्यांचा कनिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संवाद आवश्यक आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांवर ओरडणे, त्यांना तुच्छतेने वागवणे बंद केले पाहिजे. वरिष्ठांनी कनिष्ठांना सन्मानाने वागवले पाहिजे.

कारण सर्वसाधारणपणे कनिष्ठ अधिकाऱ्याला वरिष्ठांकडून जशी वागणूक मिळते, तशीच वागणूक तो खालच्या लोकांना, सामान्य नागरिकांना देत असतो. पोलिस स्टेशनला येणारे लोक पीडित आणि अन्यायग्रस्त असतात. म्हणून आधी त्यांच्या दु:खावर फुंकर घातली पाहिजे. अशा लोकांशी विनम्रपणे बोलणे हे त्या दृष्टीने मोठे पाऊल ठरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांच्याविषयी सहानूभूती दाखवायला हवी. बऱ्याचदा अशी तक्रार करण्यात येते की, चोरीची तक्रार द्यायला गेलेल्या लोकांना आधी चोरी गेलेल्या सगळ्या वस्तूंची; विशेषत: दागिन्यांची पावती आणण्यास सांगितले जाते. शिवाय, तुम्ही एवढे दागिने घरी का ठेवले? बँकेच्या लॉकरमध्ये का नाही ठेवले? हेही विचारले जाते. अनेकदा चेन स्नॅचिंगच्या घटनेतील पीडितेला, ‘एवढे दागिने घालून फिरायची काय गरज होती?’ असे विचारण्यात येते. अशा प्रकारच्या वागणुकीमुळे फिर्यादी आणखी दु:खी होतात, खचून जातात. पोलिसांच्या प्रतिमेला तडा जातो, तो वेगळाच.

सामान्य लोक आणि पोलिस यांच्यातील संबंध दुराव्याचे किंवा अविश्वासाचे असणे योग्य नाही. त्यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लोकांसोबतच्या वागणुकीत सुधारणा होणे आवश्यक आहे. त्यासाठी वरिष्ठांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सतत संवाद ठेवायला हवा. मूलभूत आणि सेवांतर्गत प्रशिक्षणमध्येही वर्तणूक आणि सुसंवाद कौशल्याचा समावेश व्हायला हवा. काही वरिष्ठ अधिकारी लहानमोठ्या चुकांसाठी मेमो देणे, दंड करणे या गोष्टींमध्ये तत्पर असतात. अशा अधिकाऱ्यांना वाटते की आपण खूप कडक आहोत आणि आपल्या अशा वागणुकीमुळेच शिस्त येते. पण, अशा गोष्टींमुळे कधीही शिस्त येत नाही, उलट इतरांमध्ये भीती निर्माण होते आणि शेवटी त्यातून काहीही साध्य होत नाही.

सामान्य लोकांच्या मनात पोलिसांविषयी आदरयुक्त दरारा जरूर असावा. चूक केली, कायदा किंवा नियम मोडला तर पोलिस सोडणार नाहीत, याची जाणीव जशी त्यांना असली पाहिजे, तसे संकटाच्या वेळी पोलिस आपल्यासाठी धावून येतील, हा विश्वासही त्यांच्या मनात रुजला पाहिजे. पोलिसांची भीती फक्त गुन्हेगारांना वाटली पाहिजे, सामान्य लोकांना नव्हे. त्या दृष्टीने पोलिसदादा, पोलिसदीदी हे खूप चांगले उपक्रम आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिसांनी सुरू केलेला घरभेटीचा उपक्रमही उपयुक्त आहे. अशा पुढाकारांमुळेच समाजात पोलिसांची सकारात्मक प्रतिमा तयार होते. अनेक पोलिस अधिकारी रस्त्यावर भटकणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची स्वत:हून व्यवस्था करतानाही दिसतात. मी नागपूर ग्रामीणचा पोलिस अधीक्षक असताना कामठीमध्ये घेतलेली फुटबॉल स्पर्धा खूप लोकप्रिय झाली होती. ती आजही सुरू आहे. सोलापूरला पोलिस आयुक्त असताना आम्ही मोठ्या प्रमाणात क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या. जातीय सलोखा वाढवण्यामध्ये याचा खूप उपयोग झाला. अनाथालयाला भेट देऊन मदत करणारे अनेक पोलिस मी पाहिले आहेत. अशा उपक्रमांमुळे पोलिस खात्याची समाजासोबतची समरसता वाढते, पोलिसांबद्दल सामान्य जनतेला आपुलकी वाटू लागते.

(संपर्कः bhushankumarupadhyay@gmail.com)



Source link