
Snake In Courtroom : मुंबईतील एका कोर्टरूममध्ये मंगळवारी अचानक फाइल्सच्या ढिगाऱ्यावर साप दिसला. यामुळे वकिलांसह सर्वांचीच पळापळ झाली. या घटनेमुळे सुमारे तासभर कोर्टाचे कामकाज विस्कळीत झाले. मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयातील कक्ष क्रमांक २७ दुपारपर्यंत सुरळीत सुरू असताना फायलींचे ढीग खोदताना एका पोलिस कर्मचाऱ्याला दोन फूट लांबीचा साप दिसला. कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या वकिलांनी सांगितले की, या घटनेमुळे तेथे उपस्थित लोकांमध्ये घबराट पसरली आणि न्यायाधीशांना सुनावणी काही काळासाठी पुढे ढकलावी लागली.







