बामणोली/मेढा; पुढारी वृत्तसेवा : कास पठाराजवळील एकीव धबधब्याजवळ रविवारी सायंकाळी दरीत पडून दोघांचा मृत्यू झालेल्या घटनेचे गूढ उकलले आहे. अज्ञात संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दरीत ढकलल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी दोघा अज्ञात व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अक्षय शामराव अंबवले (वय 28, रा. बसप्पाचीवाडी, ता. सातारा) व गणेश अंकुश फडतरे (वय 35, रा. करंजे, सातारा) अशी दरीत ढकलून दिल्यामुळे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवार दि. 16 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास एकीव धबधब्यापासून 150 ते 200 मीटर अंतरावर अक्षय अंबवले व गणेश फडतरे हे इतर दोन मित्र पंकज जयवंत शिंदे व समाधान सुदाम मोरे (रा. बसप्पाची वाडी, सातारा) यांच्याबरोबर एकीव धबधब्यावर फिरण्यासाठी गेले होते. एकीव धबधबा परिसरात अक्षय अंबवले व गणेश फडतरे यांची तेथील अनोळखी युवकांशी काही कारणावरुन वादावादी झाली. या वादावादीचे पर्यावसन मारामारीत झाले. त्या अज्ञात युवकांनी अक्षय अंबवले व गणेश फडतरे या दोघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जवळच असलेल्या एकीव धबधब्याच्या दरीत ढकलून दिले. सुमारे 400 ते 500 फूट खोल दरीत ते कोसळले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला पाचारण केले होते. शोधमोहीम सुरु झाल्यानंतर सोमवारी पहाटेपर्यंत दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले. रात्रीचा अंधार, जोरदार पाऊस व घनदाट जंगलामुळे दुसर्या युवकास शोधणे अवघड बनले होते. मात्र अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले.
ही रेस्क्यू मोहीम मेढा पोलिस, महाबळेश्वर ट्रेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम यांनी यशस्वी केली. यासाठी स्थानिक लोकांचीही मदत झाली. शोधकार्यानंतर दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. मयत युवकांचा मित्र पंकज शिंदे याने याबाबतची फिर्याद मेढा पोलीस स्टेशनला दिली असून याप्रकरणी अज्ञात दोन व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि संतोष तासगावकर करत आहेत.







