
आसमंतात फडकणाऱ्या भगव्या झेंड्याच्या पार्श्वभूमीवर एकमेंकांसोबत दिसणारे ‘राव’ आणि ‘रंभा’, त्यासोबत बेभान होऊन दौडणारे घोडेस्वार दिसताहेत. या आकर्षक पोस्टरमध्ये ओम आणि मोनालिसा यांची छान जुळून आलेली केमिस्ट्री पहायला मिळतेय. एकमेकांसाठी काहीही करण्याची तडफ त्यात दिसतेय. इतिहासाच्या पानांमध्ये ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. ही प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा नाही तर तिला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याप्रती आणि स्वराज्याच्या प्रती असलेली निष्ठा, शौर्याची, त्यागाची आणि समर्पणाची किनार या कथेला असल्याचे दिग्दर्शक अनुप जगदाळे सांगतात. चित्रपटात छत्रपतींच्या भूमिकेत शंतनू मोघे तर प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ दिसणार आहेत.






