संभ्रमाचे मिथक: जाणिवा जाग्या करण्याचा काळ

0
16
संभ्रमाचे मिथक: जाणिवा जाग्या करण्याचा काळ


दत्ता पाटील14 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपण निसर्गाचे एक भाग आहोत. निसर्गाची मानवी प्रेरणा आहोत. आपण तसं वागायला सुरूवात केली पाहिजे पुन्हा. आपल्या आजवरच्या उत्क्रांतीची परीक्षा पाहाणारा हा काळ आहे. आपण हा कोश ताकदीने फोडून बाहेर आलं पाहिजे.. आपण कदाचित खूप उत्क्रांत झालो असल्यानं, अनेक सत्ता धोक्यात येण्याच्या भीतीतूनच आपल्याला घेरून चातुर्यानं वर्तमानाशी डिस्कनेक्ट केलं जात नसेल कशावरून?

पाऊस पडतो. धबधबे कोसळतात. हिरवं दिसायला लागतं सारं रान. गुरं दिसतात चरताना. गुराखी दिसतो लाल मळका टी शर्ट घालून उगाचच रेंगाळलेला… आवाज येत राहतात नेहमीच्याच पाखरांचे. लपून आवाज काढत असल्यानं कावळे, चिमणी, कोकिळा, साळुंक्या हे मध्यमवर्गीय पक्षी वगळले, तर बाकी पक्ष्यांच्या आवाजात कोणता कोणाचा आहे, ते समजत नाही. समजेलही, पण तेवढं लक्ष कोण नि कशाला देत बसेल? चिखल दिसतो रस्त्याच्या कडेनं. बेडकं, त्यांची छोटी पिलं रस्ता क्रॉस करण्यासाठी प्राणाची बाजी लावतात. रस्ते हे जगण्यातले सर्वात मोठे अडथळे आहेत, हे त्यांच्याकडे पाहून लक्षात येत राहतं. हे सगळं काय काय चालू असतानाही कोणीही ध्यान देईनासं झालंय. देशानं निसर्गाला डिस्कनेक्ट करून टाकलंय. बरं, देशानं असं म्हणताना देशातील व्यवस्थेनं की सरकारनं की जनतेनं, असे अनेक प्रश्न पडू शकतात. त्याचं उत्तर महत्त्वाचं नाही. पण, पृथ्वीवरच्या या देशाच्या वाट्याला असलेल्या एकूण जमिनीवरील, जमिनीखालील, आकाशातील जाणिवा म्यूट झाल्या आहेत, असं लक्षात यायला लागलंय. बायकांची नग्न धिंड निघताना तेथील निसर्गातून, आजूबाजूच्या झाडाझुडपांतून येतच असतील ना आवाज कोकिळांचे, कावळ्यांचे किंवा सळसळत असतीलच ना चार-दोन नाचरे पक्षी चेकाळलेल्या गर्दीच्या मागील दाट झुडूपातून? देश जगात अग्रभागी असल्याच्या घोषणा, दंगलीच्या बातम्या, दहा माणसं एकाला मारतानाचे प्रसंग, गळफास घेतानाचे क्षण, खालच्या जातीतल्या, वेगळ्या धर्मातल्या बायाबापड्यां ना विवस्त्र करून राष्ट्राला प्रगतिपथावर नेत असल्याच्या आविर्भावात निघणारे शेकडो लोकांचे चीत्कार आपापल्या मोबाइलवर ऐकताना नि मागोमाग येणारे उत्तेजक रिल्स बघत बुडून जाताना खिडकीच्या गजावर, विजांच्या तारांवर झुलतानाचे पक्षी हे या काळात अनफिट होताहेत. या निसर्गातील हालचालींमुळे माणसाची अशी होत चाललेली उत्क्रांती नीटनेटकी विकसित होण्यात संगीत, निसर्ग, कविता, कथा, विचार, तत्त्वज्ञान आणि धर्मग्रंथ हेही प्रचंड अडथळे आहेत, असं वाटू लागलंय. या नव्या राष्ट्रातील माणसांना वरीलप्रमाणे जीवनशैली गवसली असून, हे केवळ स्वातंत्र्यच नसून, मानवी उत्क्रांतीचे शिखर आहे, असे देश चालवणाऱ्यांना प्रामाणिकपणे वाटत आहे. म्हणूनच ते मानवी उत्क्रांतीच्या या प्रयत्नांना वैश्विक गवसणी घालण्याकडे नेणाऱ्या पायऱ्या वाटत असून, त्या दिशेने दमदार पावलं टाकली जात आहेत. वेशीवेशीवर तैनात असलेले वैचारिक, तात्त्विक पहारे एकेक करत नाहीसे केले जात आहेत आणि वैचारिक, सहिष्णू जगण्यात या राष्ट्राची, या जगाची असंख्य शतके वाया गेल्याचा खेद कारभाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. डिस्कनेक्ट व्हायचं असेल, तर विचारांपासून व्हा, निसर्गापासून व्हा, नेणिवेतील मूळ मानवी प्रेरणेपासून व्हा… जातीपासून, धर्मापासून डिस्कनेक्ट होऊ नका! त्यासाठीच्या अस्तित्वाच्या लढाया सतत लढत राहणं, हीच या राष्ट्राची जाज्वल्य प्रेरणा आहे, या नव्या तत्त्वाचा जोरदार प्रसार पावसाळ्यात कोसळणाऱ्या धबधब्यांना, खिडकीत येऊन बसलेल्या फुलपाखरांना, गायींमागून चरत चाललेल्या बगळ्यांना, बांबूच्या बासरीतून ऐकू येणाऱ्या सुरांना, वावरात उगवलेल्या मक्याला, ज्वारीला, आकाशातल्या पक्ष्यांच्या थव्यांना.. कोणालाच माहीत नाही… त्यामुळे त्यात कोणी लेखक, कवी, संगीतकार, गायक, शेतकरी एकचित्त होऊन जात असेल, तर ते राष्ट्रीय, जागतिक प्रगतीला घातक ठरू लागेल काही दिवसांनी… एकूणच निसर्गात, मानवी प्रेरणेत, मानवी उत्थानात, सामाजिक क्रांतीत अडकलेली खूप माणसंही निसर्गासारखीच अडगळ वाटतच असतात हल्लीच्या व्यवस्थेला. अशावेळी एखाद्याची विवस्त्र धिंड निघाली की क्रांतीचे आवाज ऐकू येऊ लागतात कानाकोपऱ्यातून आणि हळूहळू तेही क्षीण होत जातात पुढील नवी धिंड निघेस्तोवर… काळोख तर असायचा आधीही गावात, पण पहारे असायचे गावाबाहेर विश्वासाचे.. अंधारातही गाव बिथरायचं नाही त्यामुळे. गाव जिंकण्यासाठी आता मात्र पहारे नाहीसे केले जातात नि गाव ताब्यात घेतलं जातं.. गाव अंधारात असताना अधूनमधून एकच कोपरा कधीतरी उजळतो, ज्या दिशेला मसनवटी असते… आपण कुठं तरी बळजबरीने कनेक्ट करण्यासाठी मोठ्या निसर्ग प्रेरणेपासून डिस्कनेक्ट केले जाऊ लागलो आहोत. आपली दृष्टी, आपली श्रवणशक्ती, आपली आकलनशक्ती क्षीण केली जाऊ लागली आहे. ज्याचा ठपका कोणा दृश्य गोष्टीवर ठेवताच येणार नाही, अशी व्यवस्था उभी राहू लागली आहे. आपल्याला आपल्याच समूहापासून तोडून नवनव्या समूह गटांशी जोडलं जाऊ लागलं आहे. आपल्या जीवनशैलीला नव्या नियमांच्या नव्या घटनेची चौकट बांधली जाऊ लागली आहे. ज्या विचारांना मानवीमूल्यांचा स्पर्शही नाही, अशा विचारांच्या व्यवस्थेचा एक भाग बनवून आपल्या पोटाच्या भुकेला त्या व्यवस्थेशी बांधून टाकण्याचं काम जोरकसपणे सुरू आहे. या नव्या व्यवस्थेत आपल्याला काहीही सोडून जाता येणार नाही किंवा आपलं काहीही धरून ठेवता येणार नाही. आपला मेंदू करप्ट होत चाललाय. आपण आता पुरेसे घेरले जाऊन इच्छा नसताना सामूहिकपणे कुठं तरी ढकलले जातो आहोत आणि आपल्याला विरोधही करता येऊ नये, अशी ही प्रतिसृष्टी उभी राहू पाहातेय… आपल्याला जागं झालं पाहिजे. आपण झाडाझुडपातून येणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजाकडे कान देवून ऐकत राहिलं पाहिजे. आपण मोरांचे, लांडोरींचे आवाज भरून घेत राहिलं पाहिजे. खिडकीशी येणारा पिवळा पक्षी नजरेनं न नाकारता तो स्वत:हून उडून जाईपर्यंत त्याच्या असण्याचा सन्मान केला पाहिजे. पक्ष्यांचे थवे आकाशातून जाताना पार दिसानासे होईस्तोवर त्यांच्याकडे बघत राहिलं पाहिजे. कविता लिहिल्या पाहिजेत. कलकलाटावर.. धबधब्यावर.. कठोर भाष्य केलं पाहिजे विवस्त्र काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीवर.. मारामाऱ्यांवर.. जाती-जातीत लढाया लावून देणाऱ्यांवर.. आपण बोलत नाही. आपण ऐकत नाही. आपण पाहातही नाही. कुणी उचलून भिरकवावा असे आपण धड आश्वासक दगडही राहिलो नाही.. आपल्याला बदललं पाहिजे. आपल्याला धडपडून उठलं पाहिजे. न दिसणारा कडेकोट वेढा भेदून पोवाडे गायले पाहिजेत. आपण निसर्गाचे एक भाग आहोत. किंवा निसर्गाची निर्मिती आहोत. आपण निसर्गाची मानवी प्रेरणा आहोत. आपण तसं वागायला सुरूवात केली पाहिजे पुन्हा. आपल्या आजवरच्या उत्क्रांतीची परीक्षा पाहाणारा हा काळ आहे. आपण हा कोश ताकदीने फोडून बाहेर आलं पाहिजे.. आपण कदाचित खूप उत्क्रांत झालो असल्यानं, अनेक सत्ता धोक्यात येण्याच्या भीतीतूनच आपल्याला घेरून चातुर्यानं वर्तमानाशी डिस्कनेक्ट केलं जात नसेल कशावरून?

dattapatilnsk@gmail.com



Source link