शिंदे विश्रांतीसाठी दरेगावात! चर्चा मात्र जिल्हा परिषदेच्या जोडणीची, साताऱ्यात शिवसेनेचं ठरलं

0
4


सातारा: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी दोन दिवस मुक्कामी आहेत. हा उपमुख्यमंत्र्यांचा विश्रांती दौरा असला तरीसुद्धा या ठिकाणी राजकीय चर्चांना उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरेगावी असल्यामुळे त्यांच्या पक्षाचे नेते किंवा राष्ट्रवादीचे काही नेते त्यांना भेटण्यासाठी येतात का याबाबत सध्या चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेकांचं लक्ष या घडामोडींकडे लागलेलं आहे.

सातारा जिल्हा परिषदेमध्ये त्रिशंकू परिस्थिती आहे. बहुमतासाठी 33 चा आकडा कोणालाच गाठता आला नाही. अशा परिस्थितीत भाजपला 27 जागा जिंकता आल्या आहेत, तर राष्ट्रवादीने 20 जागा जिंकल्या आहेत. तसेच शिवसेनेने 15 जागा जिंकल्या आहेत. यामुळे सत्ता कोण स्थापन करणार याकडे जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापन करतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात पाहायला मिळते. यामुळे एकनाथ शिंदे या ठिकाणी आल्यानंतर काही घडामोडी घडतात का याबाबत सातारा जिल्ह्यात सध्या चर्चा सुरू आहे. 

सातारा जिल्हा परिषद संख्याबळ : एकूण जागा 65

  • भाजप : 27
  • राष्ट्रवादी काँग्रेस : 20
  • शिवसेना : 16
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना : 01
  • काँग्रेस : 01
  • अपक्ष : 01

एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल

साताऱ्यात राष्ट्रावादी काँग्रेसचे 20 आणि शिवसेनेचे 16 सदस्य एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. स्वबळावर निवडणूक लढवलेल्या भाजपचेही प्रयत्न सुरू आहेत. परंतु, निवडणुकीच्या काळात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार टीका झाल्याने या दोन्ही पक्षांचे एकमेकांशी बिनसल्याची माहिती आहे. 

साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यास ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजपकडून प्रयत्न सुरू

दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ स्तरावर बोलत आहेत असं मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं. साताऱ्यात महायुती म्हणून पुढे जाऊ. तसे न घडल्यास चमत्कार करायची इच्छा नाही, पण वेळ पडल्यास चमत्कार करून दाखवावा लागेल असंही जयकुमार गोरे म्हणाले. 

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link