वेब वॉच: ‘लंपन’ एका अवखळ,  चौकस मुलाची गोंडस गोष्ट…

0
104
वेब वॉच:  ‘लंपन’ एका अवखळ,  चौकस मुलाची गोंडस गोष्ट…


सुहास किर्लोस्कर2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

लंपन या शाळकरी मुलाला त्याचे आईवडील पुण्यातून कोकणातल्या एका छोट्या गावामध्ये आजी-आजोबांकडे राहायला पाठवतात. कालांतराने तो गावातल्या रम्य निसर्गात, शांत वातावरणात, तिथल्या शालेय मित्रांमध्ये रुळतो. प्रकाश नारायण संत यांनी या मुलाच्या दृष्टिकोनातून वनवास, झुंबर, पंखा, शारदा संगीत हे कथासंग्रह लिहिले. त्यातून लंपन, त्याचे आजी-आजोबा, मित्र-मैत्रीण, शेजारपाजारचे काका-काकू अशा पात्रांसह कोकणातले वातावरण जिवंत होते. संत यांनी या शाळकरी मुलाच्या चौकस नजरेतून हे वातावरण अशा ओघवत्या शैलीत उभे केले आहे की आजही हे कथासंग्रह वाचताना आपण ‘बिंज रीडिंग’ करतो. याच कथासंग्रहावर निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘लंपन’ ही वेब सिरीज ‘सोनी लिव्ह’वर नुकतीच रिलीज झाली आहे. तीसुद्धा ‘बिंज वॉच’ करण्यासारखी आहे.

संत यांच्या कथा वाचल्या असो वा नसो; गावाकडच्या रम्य वातावरणाची ओळख नव्याने करून घेण्यासाठी ही वेब सिरीज आवर्जून बघायला हवी. याची मुख्य कारणे दोन – एक म्हणजे निपुण धर्माधिकारींचे दिग्दर्शन आणि अमेय वसंत यांची सिनेमॅटोग्राफी. गावाकडचे घर, त्यातले लाँग शॉट, लहान मुलाच्या दृष्टिकोनातून एखाद्या अळीकडे / फुलपाखराकडे पाहणारे क्लोज-अप, फोकस-आउट ऑफ फोकसचा (रॅक फोकस) खेळ, अंधार – प्रकाशाचा लपंडाव हे सगळेच विलोभनीय आहे. शाळकरी लंपनच्या नजरेतून सांगितलेली ही गोष्ट अवीट झालीय ती गावाकडच्या चित्रीकरणामुळे. गावातला निवांतपणा या सिरीजमध्ये सुरेखपणे उतरला आहे. चित्रपट आणि वेब-सिरीज ही दृश्य माध्यमे दिग्दर्शकाची आहेत.

साहित्यावर आधारित कथा-कादंबरीवर चित्रपट अथवा वेब सिरीज करायची असेल, तर त्याची सुरूवात कशी करावी, शेवट कसा करावा, मूळच्या कथांमधील कोणत्या गोष्टी दृश्य माध्यमात दाखवाव्यात हा निर्णय सर्वस्वी पटकथा लेखक आणि दिग्दर्शकाचा असतो. त्यामुळे वाचकाने ही सिरीज बघताना तिची आपल्या मनातील चित्राशी तुलना न करता दिग्दर्शकाच्या नजरेतून बघाी. चिन्मय केळकर आणि निपुण धर्माधिकारींनी पटकथा लिहिताना कथासंग्रहातील निवडक प्रसंग निवडण्याचे शिवधनुष्य उत्तमरीत्या पेलले आहे.

‘Breaking the fourth wall’ (चौथी भिंत मोडणे) ही संकल्पना धर्माधिकारींनी इथे नेमकेपणाने वापरली आहे. या संकल्पनेत अभिनेता त्या भूमिकेतून बाहेर येऊन प्रेक्षकांशी संवाद साधतो आणि संवादातील ती वाक्ये संपल्यावर तो प्रसंग पुन्हा सुरू होतो, ते जणू काहीच घडले नाही अशा आविर्भावात. अलीकडेच रिलीज झालेल्या चार्ली चोप्रा या वेब सिरीजमध्ये विशाल भारद्वाज यांनी Fourth wall संकल्पनेचा वापर केला होता. त्यात वामिका गब्बी अधूनमधून प्रेक्षकांशी संवाद साधते, हा प्रकार विलक्षण लोभस होता.

‘अॅनी हॉल’, ‘अमेरिकन सायको’, ‘द वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’, ‘कल हो ना हो’ अशा चित्रपटांत तसेच हाऊस ऑफ कार्ड्स सारख्या वेब सिरीजमध्ये या संकल्पनेचा उत्तम वापर केला आहे. ‘लंपन’ मालिकेमध्ये, यातील नायक असलेला मुलगा लंपन प्रसंग सुरू असताना मधूनच प्रेक्षकांशी संवाद साधतो आणि त्यामुळे त्या प्रसंगांची खुमारी वाढते. खरे तर, ‘लंपन’मध्ये प्रकाश नारायण संत यांनी जणू स्वतःचीच गोष्ट सांगितली आहे. त्यामुळे त्या मुलाच्या मनात काय चालले आहे, हे प्रेक्षकांना समजण्यासाठी इथे हे तंत्र योग्य ठरले.

सिरीजच्या सुरूवातीलाच शाळेतल्या वर्गात खेळणाऱ्या मुलांच्या पार्श्वभूमीवर खिडकीतून बाहेर डोकावणारा लंपन प्रेक्षकांशी बोलू लागतो आणि आपण ‘लंपन’मय होऊन जातो. लंपनची भूमिका साकारणारा मिहीर गोडबोले या सिरीजचा खरा नायक आहे. लंपनला सतत पडणारे प्रश्न, त्याचे मनोगत, वर्गातल्या गुंड मुलाची त्याला वाटणारी भीती हे सगळे बालसुलभ आहे. लंपन उगाच अतिहुशार वाटत नाही, त्याला पडणारे प्रश्न निरागस वाटतात. ही निरागसता दाखवण्याच्या अभिनयाचे कौशल्य मिहीरचे आहेच, शिवाय त्याचे श्रेय दिग्दर्शकालाही जाते. गीतांजली कुलकर्णींनी साकारलेली आजी कमाल आहे. नातवावरचे प्रेम, व्यक्तिमत्वातील शिस्त, स्वयंपाकघरात चुलीसमोर वावर अशा अनेक प्रसंगातून गीतांजली यांनी काया-वाचा-मने उभी केलेली आजी दीर्घकाळ लक्षात राहील. कादंबरी कदम आणि पुष्कराज चिरपुटकर यांनी लंपनच्या आई-वडिलांची भूमिका उत्तमरीत्या केली आहे. चंद्रकांत कुलकर्णी एकाच चेहऱ्याने का वावरले आहेत, ते समजू शकत नाही. अशोक लोकरे, ए. ऋचा यांनी प्रॉडक्शन डिझाइनमधून गावाकडचे वातावरण आणि वेगवेगळे प्रसंग, तिथल्या वाड्यात, घरात दिसणाऱ्या जुन्या-पुराण्या वस्तूंमधून उत्तमरीत्या साकारले आहे. सुचित्रा साठेंचे संकलन सिरीजमधली गावाकडची संथ लय टिकवून ठेवते. या सिरीजच्या टायटल्स आणि क्रेडिटच्या वेळी दिसणारी चित्रे दखल घेण्यासारखी आहेत, ती ‘स्किप’ करू नयेत.

सौरभ भालेराव यांचे पार्श्वसंगीत प्रत्येक प्रसंगाची खुमारी वाढवणारे आहे. लंपनच्या विशिष्ट प्रसंगात कॅस्टनेट वाजते. ‘आपण कधी होणार फुलपाखरू?’ असं लंपन मित्रांना विचारतो अन् त्याचवेळी घंटा वाजते. हे सगळेच नर्मविनोदी वातावरण निर्मितीसाठी समर्पक आहे. शिवाय, लंपनची चौकसबुद्धी सारखी स्वभाववैशिष्ट्ये अधोरेखित करणारे आहे. मराठीतील दर्जेदार साहित्यावर ही तितकीच दर्जेदार चित्रनिर्मिती केल्याचे श्रेय श्रीरंग गोडबोले, विभावरी देशपांडे यांना द्यायला हवे. कारण हिंदीसह अन्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असणाऱ्या या वेब सिरीजमुळे ओटीटीवरील अन्य भाषिक प्रेक्षकांपर्यंत मराठी साहित्याचा कसदारपणा नक्की पोहोचेल.

(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)



Source link