वेब वॉच: कहाणी ‘ब्लॅकबेरी’च्या उदय अन् अस्ताची…

0
15
वेब वॉच:  कहाणी ‘ब्लॅकबेरी’च्या उदय अन् अस्ताची…


सुहास किर्लोस्कर9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

जगभरातील निम्म्या मोबाइल वापरकर्त्यांकडे २००० मध्ये दीड इंच डिस्प्ले असलेला नोकियाचा फोन होता. पुढे आय-फोन, अँड्रॉइड तंत्रज्ञानामुळे ‘स्मार्ट फोन’चे आगमन झाले. त्या बदलत्या तंत्राशी जुळवून घेण्यात उशीर झाल्याने नोकियाचा फोन मागे पडला. दुसरीकडे, १९९९ ते २००७ हा काळ ‘ब्लॅकबेरी’ फोनच्या भरभराटीचा होता. यावर कॉम्प्युटरसारखा की-बोर्ड असल्याने तो वापरून ई-मेल पाठवता येत असत. परिणामी ऑफिसचे बरेचसे काम घरातून करणे शक्य झाले. या सुविधेमुळे एखाद्याकडे ब्लॅकबेरी असणे, हा स्टेट्स सिम्बॉल बनला. तो वापरणाऱ्यांमध्ये जागतिक नेते, मोठे उद्योगपती, अभिनेते अशांचा समावेश होता. ब्लॅकबेरी बाळगणे म्हणजे स्वतः कामात व्यग्र असल्याचे दाखवण्याची फॅशनही रूढ झाली आणि तसे करण्यात ब्लॅकबेरीच्या उच्चपदस्थांचा हात होता. २०११ च्या सप्टेंबरमध्ये जगभरात ब्लॅकबेरी वापरणारे साडेआठ कोटी लोक होते. काही नामांकित कंपन्यांनी उच्चपदस्थांना ब्लॅकबेरी दिला, पण त्यातील कॅमेरा, व्हिडिओ, इंटरनेटवरील अन्य सुविधा वापरण्यावर बंधने घातली आणि त्यात कंपनीचे हित आहे, असा गवगवा करण्यास सुरूवात केली.

खिशात ठेवता येईल अशा अॅपलच्या ‘आय पॉड’चे २००१ मध्ये आगमन झाले. त्यावर दर्जेदार साउंडवर गाणी ऐकता येत होती. २००७ मध्ये आय-फोन लाँच झाला, ज्यामध्ये कॉलिंग, आय पॉड यांबरोबरच इंटरनेटमुळे मेल करण्यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध होत्या. शिवाय, त्या स्क्रीनवर की-बोर्ड हार्डवेअर स्वरूपात दिसणारा नव्हता. यामुळे कॉल करण्यासाठी मोबाइल फोनचा वापर ही संकल्पनाच बदलली आणि अँन्ड्रॉइड – आयफोनच्या या वादळामध्ये ‘ब्लॅकबेरी’चे ग्राहक झपाट्याने कमी होऊ लागले. दोन वर्षांत ब्लॅकबेरीच्या शेअरचा भाव निम्म्यावर आला. आज ‘पुरानी बात’ झालेला ब्लॅकबेरी हा ‘आय-फोन’च्या जन्माला कारणीभूत होता, हे विसरून चालणार नाही.

अशा या ‘ब्लॅकबेरी’च्या उदय-अस्ताची कहाणी उपहासाच्या अंगाने सांगणारा ‘ब्लॅकबेरी’ याच नावाचा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर गेल्या वर्षी आला. मॅट जॉन्सनने याचे दिग्दर्शन, पटकथा सह-लेखन केले आहेच; शिवाय त्याने यामध्ये डो (Dough) या अतरंगी पात्राची भूमिकाही लीलया वठवली आहे. मोबाइल आल्यामुळे पुढे जग कसे बदलेल, याचे भाकीत करणाऱ्या निवेदनाने या चित्रपटाची सुरुवात होते. नवीन संकल्पनेवर एखाद्या कर्मचाऱ्याने रात्रभर जागून काम करायचे आणि मॅनेजमेंटमधल्या उच्चपदस्थाने ते मीटिंगमध्ये प्रेझेंट करायचे, असे आयटी इंडस्ट्रीत नियमितपणे घडणारे प्रसंग यात दिसत राहतात. ३० वर्षापूर्वीच्या छोट्या ऑफिसातील वातावरण दाखवण्यात चित्रपटाची प्रॉडक्शन डिझाइन टीम यशस्वी झाली आहे. जॅकी मॅकनिश आणि शॉन सिल्कॉफ यांच्या ‘लुजिंग द सिग्नल’ या पुस्तकावरुन याची पटकथा लिहिताना मॅट जॉन्सन व मॅथ्यू मिलर यांनी त्या इंडस्ट्रीतील व्यवहारांचे बारकावे उत्तम टिपले आहेत.

आताच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनलेल्या मोबाइलचा उदय कसा झाला, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक मोबाइलधारकाने हा चित्रपट बघितला पाहिजे. आमचा प्रोटोटाइप तयार आहे, असे बिनधास्त खोटे सांगणारे आणि तंत्रज्ञान समजत नसले तरी बिझनेस मीटिंगमध्ये निर्णय घेणारे बॉस, महिनाभराचे काम पाच-दहा दिवसांत करून देण्याचे आश्वासन देणारी मार्केटिंग टीम, अशा अनेक गोष्टी आयटी इंडस्ट्रीमध्ये काम केलेल्या / करणाऱ्या सर्वांना जवळच्या वाटतील. त्यातून टिपलेला उपहास पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित आणेल. आयटी इंडस्ट्रीमधील काम फारच नीरस असते, त्यामुळे त्या कामात आनंद शोधण्यासाठी लोक काय योजना आखतात, नवे काही करू पाहणाऱ्या मॅनेजमेंटला त्या मागची कारणे कशी कळत नाहीत, असे बरेच प्रसंग त्यातल्या संवादाचा आनंद घेत अनुभवण्यासारखे आहेत. मॅट जॉन्सन, ग्लेन हॉवरटन, जे बरुचेल यांनी पात्र रचनेनुसार असा अभिनय केला आहे की जणू ते प्रत्यक्षातही आयटी इंडस्ट्रीत काम करत असावेत, असेच वाटत राहते.

आपल्या हातात कोणत्या कंपनीचा मोबाइल आहे, हा प्रतिष्ठेचा प्रश्न करणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट बघावा. ‘शिकेल तो टिकेल’ तसेच बदलते तंत्रज्ञान जो झटकन आत्मसात करेल, तोच या बदलत्या विश्वात तरेल आणि ज्याला पुढे येऊ घातलेल्या तंत्राचा कानोसा घेता येईल, तो पुढे जाऊ शकेल, याची प्रचिती ‘ब्लॅकबेरी’मुळे येते.

(संपर्क – suhass.kirloskar@gmail.com)



Source link