लोक – प्रशासन: गणवेश : अंगाला न लावून घेण्याची गोष्ट!

0
25
लोक – प्रशासन: गणवेश : अंगाला न लावून घेण्याची गोष्ट!


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Lover Lok Prashasan Article Written By Shekhar Gaikwad Over Uniform: A Thing Not To Wear

शेखर गायकवाड ​​​​​​​4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

गणवेश घालणारे आणि न घालणारे असे कर्मचाऱ्यांचे दोन वर्ग प्रशासनात आढळतात. बहुतांश शासकीय कार्यालयात ज्या दिवशी कोणी वरिष्ठ अधिकारी किंवा अतिमहत्त्वाची व्यक्ती भेट द्यायला येणार असते, त्या एका दिवसापुरते सगळे कर्मचारी गणवेश घालून येतात. पण, अनेकदा एरवी साध्या वेशात वावरणारा कर्मचारी अचानक गणवेश घालून आल्याने त्याच्या साहेबांनाही ओळखू येत नाही. असे असले तरी गणवेश भत्ता मात्र नियमितपणे न चुकता घेण्याची पद्धत प्रचलित आहे. शासनाच्या काही विभागांमध्ये ठराविक कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कामाच्या स्वरुपानुसार गणवेश निश्चित केलेला असतो. तर, शिपाई आणि ड्रायव्हर या संवर्गासाठी मात्र सर्व खात्यांमध्ये गणवेश खरेदीसाठी भत्ता ठरवून देण्यात आलेला असतो. या गणवेशांच्या बाबतीतसुद्धा गेल्या ६० – ७० वर्षांत अनेक स्थित्यंतरे घडून आली आहेत. पूर्वी गणवेश घेण्यासाठी शासनाच्याच हातमाग किंवा वस्त्रोद्योग महामंडळाकडून कापड पुरवले जायचे. निर्धारित कालावधी संपला, तरी हे कापड काही सर्व कार्यालयापर्यंत पोहोचत नसे. त्यामुळे मग पुढे गणवेश भत्ता देण्याचे ठरवण्यात आले.

ज्यावेळी गणवेशाचे कापड दिले जायचे, तेव्हा ‘कापडाची क्वालिटी चांगली नाही’ किंवा ‘गणवेश लवकर फाटला’ अशा सबबी सांगून शिपाई आणि ड्रायव्हर गणवेश वापरत नसत. नंतर पैसे देण्यास सुरूवात झाल्यावर तर जो एखादा कर्मचारी नियमानुसार गणवेश घालायचा, तो देखील गणवेश न घालता कार्यालयात येऊ लागला. बहुतांश शासकीय कार्यालयात ज्या दिवशी कोणी वरिष्ठ अधिकारी किंवा अतिमहत्त्वाची व्यक्ती कार्यालयाला भेट द्यायला येणार असते, त्या एका दिवसापुरते सगळे कर्मचारी गणवेश घालून येतात. पण, अनेकदा एरवी साध्या वेशात वावरणारा कर्मचारी अचानक गणवेश घालून आल्याने ओळखूच येत नसे. असे असले तरी गणवेश भत्ता मात्र नियमितपणे न चुकता घेण्याची पद्धत प्रचलित आहे. एखादा होतकरू कर्मचारी दररोज गणवेश घालून आला, तर इतर कर्मचारी त्याला वाळीत टाकतात. शिवाय, ‘आम्ही गणवेश घालत नाही, हे तुझ्यामुळं उघड होतं,’ असं म्हणून त्यालाच दम देतात. एखाद्या ठिकाणी फार कडक साहेब आले आणि त्यांनी सर्वांना समज देऊन गणवेश घालायला भाग पाडले, तर पंधरा दिवसांत एक तरी कर्मचारी, ‘मला या कापडाची ॲलर्जी असल्यामुळं त्वचारोग झाला, तर तुम्ही त्याला जबाबदार राहाल,’ असा प्रेमळ धमकीचा अर्ज देऊन जातो!

महापालिकेमध्ये स्वच्छता कामगार, अग्निशमन दलातील जवान, सिक्युरिटी गार्ड, नर्स, वॉर्डबॉय, सॅनिटरी इन्स्पेक्टर अशा बहुसंख्य कर्मचाऱ्यांना गणवेश वापरावा लागतो. पण, शासनाचे काही विभाग एवढे छोटे असतात की, तिथे गणवेशातील कर्मचारी फार कमी संख्येत असतात. एकेकाळी लालपट्टा घालणारा तहसील कार्यालयाचा कर्मचारी जमीन महसूल वसूल करण्यासाठी दारात येऊन उभा राहिला, तर पंचक्रोशीत प्रचंड चर्चा व्हायची. शासकीय वसुली करण्यासाठी प्रसंगी असा महसूल बुडवणाऱ्याची आजूबाजूच्या लोकांपुढं नाचक्की व्हावी म्हणून त्याच्या घरासमोर पट्टेवाला कर्मचारी उभा केला जायचा. पुढं पुढं हा लालपट्टा वापरणे बंद झाले आणि लोकही सवयीने कर्ज, महसूल बुडवायला सरावले! गणवेश घालण्याचे प्रयोजनच या साऱ्या गदारोळात पूर्णपणे हरवून गेले. गणवेश आणि त्याच्या वापराबाबतच्या अशा सगळ्या बदलांमधून कर्मचारी युनियनला एक नवीनच काम मिळाले. ज्या शासकीय खात्यामध्ये गणवेशाचा निधी अद्याप आला नाही, तेथे जावून निवेदन देणे, गणवेश घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना युनियनमध्ये वाळीत टाकणे, गणवेशाचे कापड खराब असेल, तर त्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणे इ. कामे नव्या जोमाने पार पडू लागली.

एकीकडे ही स्थिती असली, तरी गेल्या ७० – ७५ वर्षांमध्ये शासन – प्रशासनाबाहेरच्या जगात रिक्षावाले, टॅक्सीवाले, ड्रायव्हर यांना गणवेश वापरताना नागरिक फारसे पाहू शकलेले नाहीत. परदेशात फिरायला गेल्यावर तिकडचे किंवा थायलंड, जपानमधील ड्रायव्हर किती नम्र असतात, याचे आपण गोडवे गातो. पण, आपल्याकडच्या रिक्षा ड्रायव्हरला साधा गणवेश घालायला भाग पाडण्यास आपण यशस्वी झालेलो नाही, हेही वास्तव आहे. गणवेश घालणारे आणि न घालणारे असे कर्मचाऱ्यांचे दोन वर्ग प्रशासनात आढळतात. काही काही वेळा एरवी गणवेश न घालणारा कर्मचारी अचानक राष्ट्रीय दिनानिमित्त गणवेश घालून आला, तर साहेबालाही तो ओळखू येत नाही. एक ५५ वर्षांचे साहेब त्यांच्या कार्यालयावर मोठा मोर्चा येणार असल्याने लवकर ऑफिसला आले. मोर्चेकरी मोठ्या संख्येने आवारात जमले. ते मोठमोठ्याने घोषणा देत होते. मोर्चाचे आठ जणांचे शिष्टमंडळ भेटीला येणार होते, तेव्हा साहेबांनी त्यांच्या पी. ए. ला इंटरकॉमवरून आत बोलावले.

तेवढ्यात शिपाई आणि स्वच्छ, पांढऱ्या गणवेशातील एक उंचीपुरी व्यक्ती आत आली. साहेब गोंधळले. त्यांना वाटले की, हे मोर्चातील लीडर आहेत. तेवढ्यात ती व्यक्ती ‘गुड मॉर्निंग’ म्हणाली. साहेबांना उठून उभे राहावे असे वाटले. शिवाय, त्या व्यक्तीला कुठं तरी पाहिले आहे, असा त्यांना भास झाला. दोन – तीन मिनिटांनंतर ही असामी म्हणजे आपलाच पी. ए. असल्याचा साक्षात्कार झाला. एरवी रंगीबेरंगी कपडे घालणारा ही स्वीय सहायक सफेद गणवेशधारी झाल्यावर साहेबच गोंधळले! (संपर्क- shekharsatbara@gmail.com)



Source link