रिल्ससाठीचा स्टंट अंगलट आला, चारचाकी गाडीसह युवक 300 फूट दरीत कोसळला; व्हिडिओ व्हायरल

0
1


सातारा : सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेला निसर्गाने नटलेला जिल्हा म्हणजे सातारा (Satara). महाबळेश्वर असेल किंवा प्रतापगड किल्ला असेल निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेला हा प्रदेश. त्यामुळेच, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी पर्यटक येतात. येथील निसर्ग सौंदर्य आणि विविध स्थळांना भेटी देतात. प्रसिद्ध पर्यटनस्थळ (Tourist) असलेल्या अनेक स्थळांपैकीच एक असलेलं सडावाघापूर. येथील उलटा धबधबा पर्यंटकांच्या आकर्षणाचं ठिकाण. मात्र, येथे आल्यानंतर काही तरुणांकडून होणारी हुल्लडबाजी, फोटो आणि रिल्ससाठी (Reels) व्हिडिओ काढताना केले जाणारे स्टंट पाहता पोलिसांनी इथं सध्या विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. कारण, आपल्या चारचाकी कारसह स्टंट करताना एक युवक तब्बल 300 फूट दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. 

सडावाघापूर पठारावरील निसर्ग सौंदर्या बरोबर उलटा धबधबा, येथील परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, येथे येणाऱ्या काही तरुण पर्यटकांची स्टंटबाजी, युवकांची हुल्लडबाजी इथं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ना पोलीस, ना प्रशासनाने तरुणाईच्या या हुल्लडबाजीवर अंकुश ठेवल्याचे पाहायला मिळते. त्यामुळेच, येथे अपघाताच्या घटनाही घडताना चित्र आहे. रिलसाठी स्टंट करण्याच्या नादात तब्बल 300 फूट खोल दरीत पर्यंटकांची गाडी कोसळून भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघाच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, हा युवक कारचा रेस वाढवून गाडी एकाच जागी फिरवत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे फिरता फिरता रिव्हर्स गेअरमध्ये गाडी दरीत कोसळल्याचंही दिसत आहे.  

सुदैवाने बचावला युवक

कराड येथील काही युवक सडावाघापूर येथील उलटा धबधबा पाहून चारचाकी गाडीने गुजरवाडीच्या टेबल पॉईंटवर आले होते. याठिकाणी गाडीतील काही युवक खाली उतरले, तर यावेळी साहिल जाधव या युवकाने मोबाईल रिलसाठी गाडीबरोबर स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. गाडीसोबत स्टंट करताना साहिलचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट 300 फूट खोल दरीत कोसळली. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने गुजरवाडी येथील स्टंटबाज अपघाताचे सत्य बाहेर आले. यावेळी म्हावशी येथील स्थानिक गुराखी मंगेश जाधव व किंगमेकर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अपघातात जखमी झालेल्या साहिल जाधवला बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला. यावेळी पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर हेही घटनास्थळी उपस्थित होते.

हेही वाचा

मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठीची ती अट रद्द, बैठकीत निर्णय; उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला

आणखी वाचा



Source link