रसिक स्पेशल: डॉ. आंबेडकरांच्या जीवनप्रेरणांचा शोध…

0
17
रसिक स्पेशल:  डॉ. आंबेडकरांच्या जीवनप्रेरणांचा शोध…




अवघ्या ६५ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य, दुर्बलांसाठी केलेले कार्य भारताच्याच नव्हे, तर मानवतेच्या इतिहासात अजोड असे आहे. उद्या, १४ एप्रिलला बाबासाहेबांची १३४ वी जयंती साजरी होत आहे. त्या औचित्याने त्यांच्या या असामान्य कार्यामागील जीवनप्रेरणांचा हा वेध… डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रातून त्यांच्या कार्यामागील विविध प्रेरणांचे दर्शन घडते. त्यापैकी कोणत्याही काळातील नव्या पिढीला मिळणारी सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे ‘ज्ञानसाधना’. बाबासाहेबांचे वडील रामजी यांचे इंग्रजी अतिशय चांगले होते. आमच्या घरामध्ये वडिलांनीच शिक्षणाविषयीची आस्था आणि आवड निर्माण केली, असे बाबासाहेबांनी म्हटले होते. रामजी हे कबीरपंथी असल्याने त्यांना भजने आणि अभंग तोंडपाठ होते. शिवाय, घरात रामायण, महाभारत, पांडव-प्रताप आदी ग्रंथांवर निरुपण होत असे. वडील रोज संध्याकाळी संतांचे अभंग आणि कबीराचे दोहे म्हणत, त्याचाही प्रभाव आम्हा भावंडांवर पडला, असे बाबासाहेब सांगायचे. अफाट ज्ञानसाधना, अपार निष्ठा अमेरिकन विदुषी डॉ. एलिनॉर झेलियट यांनी बाबासाहेबांवरील निबंध ग्रंथात त्यांच्या ज्ञानसाधनेबाबत खूप बारकाईने नोंदी केल्या आहेत. विशेषत: बाबासाहेबांचा अमेरिकेतील ज्ञानसाधनेचा कालखंड कसा होता आणि त्यांनी त्यासाठी केलेल्या तपश्चर्येचे वेगळेपण त्यातून समोर येते. अवघ्या बाविसाव्या वर्षी बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडून परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाल्यावर ते अमेरिकेला रवाना झाले. या काळात त्यांनी एम. ए. चा अभ्यास केला. १९१५ मध्ये ही पदवी त्यांना मिळाली आणि १९१६ ला त्यांनी पीएच. डी. पूर्ण केली. म्हणजे अवघ्या तेविसाव्या वर्षी बाबासाहेब सर्वार्थाने उच्चविद्याविभूषित झाले होते. हजारो वर्षे उपेक्षेची आणि वंचनेची वागणूक मिळालेल्या समाजातील हा एक असाधारण तरुण अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जाऊन तेथील सर्वोच्च पदवी संपादन करतो, हे खूप महत्त्वाचे होते. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, भारतातील जातिव्यवस्था यासह प्रगत देशांचे इतिहास आणि त्यांचे साहित्य यांचा सखोल अभ्यास या काळात बाबासाहेब करत होते. त्यांच्या ज्ञानसाधनेने आणि अपार निष्ठेने विद्यापीठातील अनेक प्राध्यापक आणि ग्रंथपाल भारावून गेले होते. १९२३ मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी मिळवली होती. एकूणच बाबासाहेबांची ज्ञानाकांक्षा आणि तिला दिलेली साधनेची जोड ही एक अपूर्व अशी प्रेरणा म्हणता येईल. अस्पृशांच्या वेदनेचा हुंकार बाबासाहेब १९१८ नंतर सामाजिक जीवनात उतरले आणि शेवटच्या श्वासापर्यंत दलित समाजासाठी कार्य करीत राहिले. ‘अ‍ॅनिलिएशन ऑफ कास्ट’ या पुस्तकात त्यांनी या देशातील जातिवादाला वैचारिक आणि तर्कशुद्ध उत्तर देणारे अभ्यासपूर्ण प्रतिपादन केले आहे. त्यावेळच्या सर्वच प्रस्थापित विचारवंतांना आणि नेत्यांना भारतातील जातिव्यवस्थेबाबत एक परखड मांडणी करणारा महान विद्वान आपल्यासमोर उभा ठाकल्याचे लक्षात आले. बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणात ग्रंथलेखनही सुरू केले. केवळ लेखन करूनच नव्हे, तर प्रत्यक्ष अस्पृश्यांचे आणि दुर्बल वर्गाचे प्रश्न मांडून, त्या संबंधीच्या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन वाटचाल करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. ‘मूकनायक’ आणि“बहिष्कृत भारत’ ही त्यांनी सुरू केलेली पाक्षिके त्याचाच परिपाक होता. त्याचप्रमाणे सभा, मेळावे, परिषदांचे आयोजन करून त्यांनी अस्पृश्य वर्गाचे दु:ख आणि दैन्य शब्दश: वेशीवर टांगले. आत्मसन्मानाचा लढा मागास समाजाने कुप्रथांतून बाहेर पडावे, अशी हाक त्यांनी दिली. मढ्यावरचे नवे कापड घेऊन ते घालू नका, मेलेल्या जनावरांचे मांस खाऊ नका, असे त्यांनी ठणकावून सांगायला सुरूवात केली. देशातला हा मोठा समाज आपल्या हजारो वर्षांच्या रुढींमधून बाहेर पडून आत्मसन्मानाच्या जाणिवेने जागा होत होता, ही डॉ. आंबेडकरांच्या लढ्याची फलश्रुती गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी स्वातंत्र्यलढा सुरू असतानाही जाणवू लागली होती. माणगावात भरलेल्या महाराष्ट्र अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते, त्यासाठी करवीर संस्थानच्या शाहू महाराजांनी त्यांना पाठबळ दिले होते. महाड येथे चवदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी त्यांनी मागास समाजाला उभे केले आणि १९२७ च्या मार्चमधील हा लढा डिसेंबरपर्यंत सुरू ठेवला. लंडनला भरलेल्या गोलमेज परिषदेतही त्यांनी अस्पृश्य समाजाची गाऱ्हाणी मांडली आणि त्यासाठी प्रसंगी गांधीजींबरोबर संघर्षही केला. विद्या, स्वाभिमान, शील हीच दैवते बाबासाहेबांना मुंबईत १९५४ मध्ये त्यांच्या हीरक महोत्सवानिमित्त १ लाख १८ हजार रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. त्यांनी ही रक्कम आपल्या प्रकृतीसाठी खर्च करावी, अशी लोकांची इच्छा होती. तथापि, गरीब समाजाकडून अशी थैली स्वीकारणे बेशरमपणाचे आहे, असे परखडपणे सांगत त्यांनी ती देणगी सामाजिक संस्थांच्या इमारत फंडाला दिली. या कार्यक्रमात बाबासाहेबांनी केलेले भाषण फार मोलाचे आहे. त्यांच्या जीवनप्रेरणा कशा स्वरूपात आकाराला आल्या असतील, याचा बोध त्यातून होतो. बाबासाहेब त्यावेळी म्हणाले, ‘माझे आयुष्य तीन गुरु आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे. माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु गौतम बुद्ध, दुसरे गुरु कबीर आणि तिसरे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले.’ जगाचे कल्याण फक्त बौद्ध धर्मच करू शकेल, हे सांगतानाच ज्योतिबा फुले यांचा मार्ग आम्ही कधीच सोडणार नाही, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. वडील कबीरपंथी असल्यामुळे कबीरांच्या विचारांचा परिणाम आपल्यावर झाला. या तिघांच्या शिकवणीने आपले आयुष्य बनले, असे त्यांनी म्हटले होते. विद्या, स्वाभिमान आणि शील ही आपली तीन उपास्य दैवते आहेत. माझे विद्येचे वेड भयंकर आहे. कोणाची याचना करीत नाही, म्हणून मी स्वाभिमानी आहे आणि आयुष्यात दगाबाजी, फसवणूक केल्याचे आपल्याला आठवत नाही, अशा शब्दांत त्यांनी या उपास्य दैवतांचा उल्लेख केला होता. देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही टिकली पाहिजे आणि समाजात बदल घडला पाहिजे, हे स्वप्न बाबासाहेब पाहात होते. त्यासाठी राजकीय लोकशाहीबरोबरच आर्थिक आणि सामाजिक लोकशाही निर्माण व्हावी, ही त्यांची तळमळ होती. त्या दृष्टीने स्वातंत्र्य टिकवणे आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सत्तेच्या जवळपास असणाऱ्या सर्वांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहिले पाहिजे, असे ते सांगत. आज बाबासाहेबांना अभिवादन करताना, त्यांनी दिलेल्या प्रेरणांचे मोल जाणून घ्यायला हवे. त्या केवळ दस्तऐवजांमध्ये किंवा पुस्तकात राहणार नाहीत, तर प्रत्येक पिढीला दीपस्तंभाप्रमाणे दिशा दाखवण्याइतक्या सक्षम आहेत. (संपर्कः arunbk1954@gmail.com)



Source link