- Marathi News
- Opinion
- Prasad Mirasdar Article On Money Planning | Divya Marathi Rasik Supplement Article
प्रसाद मिरासदार9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
३१ मार्चला स्वत:च्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा घेताना, रोजच्या जगण्यातील आव्हाने अन् संधी, समस्या नि समाधान यांचं संतुलन साधलं जातंय का, हेही जोखायला हवं. खरं तर या दिवसाच्या निमित्ताने स्वत:ला काही प्रश्न विचारुन आयुष्यातील सार्थकतेचा ताळेबंद मांडायला काय हरकत आहे?
दरवर्षी ३१ मार्च जवळ आला की आर्थिक वर्ष संपत आल्याची जाणीव होते आणि वर्षभरातील सगळा हिशेब जुळवायला सुरुवात होते. भारतात कुठेही पाहिले तर मार्चअखेरचे शेवटचे पंधरा दिवस धनवंत उद्योजक, व्यापारी, राजकारणी, समाजकारणी, सरकारी अधिकारी, चाकरमानी असे सारे जण एकदम व्यग्र असतात. प्रत्येकाच्या मुखी एकच वाक्य असतं.. ‘मार्च एंड आहे, त्यामुळं आता एक एप्रिलनंतर पाहू!’
एक एप्रिल या तारखेला ‘एप्रिल फूल’ म्हणण्याची भन्नाट आयडिया कुणाच्या सुपीक डोक्यातून आली कुणास ठाऊक? पण ज्यानं ही कल्पना शोधली त्यानं नक्की ३१ मार्चचा हिशेब संपल्यावर एक तारखेला मनात येणारी भावना प्रामाणिकपणे व्यक्त केली असणार! आर्थिक वर्षाच्या शेवटी लेखाजोखा मांडला आणि आगाऊ (ॲडव्हान्स) कर भरला की पहिला आगाऊ विचार मनात येतो, तो म्हणजे या पृथ्वीतलावर, या देशात राहण्याचं वर्षभरासाठीचं देणं दिलं गेलं..! आता मुक्त मनानं पुढचं वर्ष घालवायला हरकत नाही! आपल्या स्वातंत्र्याची एवढी किंमत तर द्यायलाच हवी नाही का? तीस टक्के कर प्रणालीत बसणाऱ्या धनवंत नोकरदार माणसाला तर नक्कीच वाटतं की, चला, या वर्षाची देशसेवा झाली! आता उरलेले पैसे स्वतःवर खर्च करायला आपण मोकळे! वर्षातील नऊ महिने स्वतःसाठी काम आणि तीन महिने देशासाठी घाम गाळल्यानंतर त्या बदल्यात जर सरकारने विकासाची कामे केली नाहीत किंवा वर्षभरात फक्त भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळ्यांच्याच बातम्या ऐकल्या की नक्कीच एक एप्रिलला मनात फूल बनवल्याची भावना येते. नाही का?
आर्थिक वर्षाचा लेखाजोखा जुळवताना आणखी एक भावना नक्की मनात येते, ती म्हणजे गेल्या वर्षी आपण ठरवलं होतं किंवा नियोजन केलं होतं, त्यापेक्षा जरा कमीच उत्पन्न मिळालं. मग आपलं नियोजन कुठं फसलं, याचा शोध सुरू होतो आणि त्यामुळंही आपण फूल बनल्याची म्हणजे फसल्याची भावना तयार होते. तरीही तितक्याच उत्साहानं आपण नव्या आर्थिक वर्षासाठी नियोजन करायला सुरुवात करतो आणि आर्थिक उलाढालीत कमीत कमी पंचवीस-तीस टक्के वाढ व्हावी, यासाठी आखणी करायला लागतो. अशी फुल चार्ज्ड् स्वप्नं बघण्याच्या आपल्या वृत्तीलाही ‘एप्रिल फूल’ म्हणायचं नाही तर काय म्हणायचं, असा मला प्रश्न पडतो.
असो. तर अशा पद्धतीनं कोणत्याही आर्थिक वर्षाचा लेखाजोखा हा फक्त कागदावरचा आर्थिक ताळमेळ नसतो, तर तो थेट आपल्या आयुष्याशी निगडित असतो. म्हणून तर या आर्थिक वर्षअखेरीच्या निमित्ताने, आपल्या आयुष्यातील अर्थकारणाशी आणि त्यातील ताळमेळाशी आपसा कसा संबंध असतो, ते आपण पाहणार आहोत. आयुष्य म्हणजे आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून निर्माण झालेल्या दृष्टिकोनांची बेरीज असते, असे म्हटले जाते. प्रत्येक अनुभव हा आपला आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन तयार करतो आणि आपली वर्तणूकही बदलवतो. त्यामुळं गेल्या आर्थिक वर्षात आपल्याला असे कोणते आर्थिक अनुभव आले की, ज्यामुळं आपला दृष्टिकोन बदलला, ते पाहणे या निमित्ताने महत्त्वाचं ठरेल, असं मला वाटतं.
आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा भाग आपल्या अर्थकारणाशी संबंधित असतो. आपली चोवीस तासांची दिनचर्या पाहिली, तर लक्षात येते की त्यातले सुमारे आठ ते दहा तास पैसे मिळवण्यासाठी काम करण्यात किंवा कामाची तयारी, प्रवास इत्यादींमध्ये खर्च करतो. आणि उरलेला वेळ झोप, विश्रांती आणि स्वतःसाठी किंवा इतरांसाठी घालवतो. ज्याप्रमाणे एखाद्या संस्थेचे नफा – तोटा पत्रक किंवा ताळेबंद ३१ मार्चला तयार केले जाते, अगदी त्याचप्रमाणे व्यक्तीचेही असते. संस्थेच्या उद्दिष्टाप्रमाणे काम झाले का? फायदा झाला की तोटा झाला? केलेल्या गुंतवणूकीतून किती परतावा मिळाला? सर्व उलाढालीतून मालमत्ता किंवा संपत्ती किती तयार झाली आणि त्याच्यासमोर देणी किती आहेत? संस्थेवर कर्ज किती आहे आणि रोख जमा किती आहे, यावरून तिचे आर्थिक आरोग्य पडताळले जाते. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याचेही असते. आपल्या महत्त्वाकांक्षेप्रमाणे अपेक्षित जगायला मिळाले तर आपल्याला आनंद होतो. पण, आकांक्षेच्या विपरीत घडले किंवा संघर्ष करावा लागला, तडजोड करावी लागली तर दुःख होते. आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेतले आणि उत्पन्नाचे साधन पुरेसे नसेल तर आयुष्यात तणावाची निर्मिती होते. असे न पेलणारे ताण निर्माण होत असतील, तर शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. तणाव सहन करण्यापलीकडे गेला की व्यक्तीचे विचार अगदी आत्महत्या करण्यापर्यंतही पोहोचू शकतात.
आपल्या आयुष्यातील ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त आजार सायको-सोमॅटिक म्हणजेच मनोकायिक किंवा मानसिक आजारांमुळे शरीरावर परिणाम करणारे असल्याने ही मानसिक कारणे शोधावी लागतात. या कारणांमध्ये आर्थिक परिस्थितीचा प्रभाव फार मोठा असतो. गरिबी, पैशांचा अभाव, बेकारी, कर्जबाजारीपणा, व्यसनाधीनता आदी सर्व समस्या आर्थिक ताणातूनच निर्माण होत असल्याने यांचे समायोजन करायचे असेल, तर आर्थिक समतोल साधावा लागतो. आयुष्याचा ताळमेळ जुळवायचा असेल आणि जगण्याचं संतुलन साधायचं असेल, तर आपल्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा घेताना ३१ मार्चला आपल्या आयुष्याचा ताळमेळ जुळतो आहे का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरते. त्या दृष्टीने या दिवसाच्या निमित्ताने स्वत:ला काही प्रश्न विचारले पाहिजेत आणि आयुष्याचा वेगळा ताळेबंदही मांडला पाहिजे.
यातील पहिला प्रश्न म्हणजे, मी समाधानी आहे का? हे स्वतःला विचारणे. समाधानी वाटत नसेल, तर का वाटत नाही, याचा शोध घेणे. हा शोध घेताना कुठे ना कुठे तरी आर्थिक समस्या आहेत, हे लक्षात येईल. समाधानी राहण्यासाठी आपले उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ पाहिला पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या मूलभूत गरजा भागल्यावर पुरेशी बचत गाठीशी असेल, गुंतवणुकीतून मुलांच्या भविष्यातील शिक्षणाची, परदेश प्रवासाची, पेन्शनची, अचानक येणाऱ्या आरोग्य, विमा आदी खर्चाची तरतूद झाली असेल, तर समाधान मिळू शकते. पण, प्रत्यक्षात तसे होत नाही. संपूर्ण अर्थकारण अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे चालते. मानवी इच्छा अमर्यादित आहेत आणि त्या पुरवणारी नैसर्गिक साधने मात्र मर्यादित आहेत. या नियमानुसार आपल्या इच्छा-आकांक्षांना मर्यादाच राहत नाही. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करणे, प्रसंगी कर्ज काढून नवनव्या वस्तू घेणे, इतरांनी मानसन्मान द्यावा किंवा प्रतिष्ठा मिळावी म्हणून लग्नसमारंभ, उत्सव आदी कार्यक्रम थाटात करणे, ध्येयाचा एक टप्पा पार केला की नवे मोठे कर्ज काढून अधिक मोठा व्याप वाढवणे.. असे चक्र सतत चालू असते. यामध्ये समाधानाचा विचार आणि त्यानुसार आचार कधीच होत नाही. महत्त्वाकांक्षा असावी, पण ती आवाक्यातील असावी. व्यवसायात धोका स्वीकारावा, पण तो आकडेमोड करून विचारपूर्वक घ्यावा. सतत सुरक्षेचा विचार करून आर्थिक व्यवहार करावेत आणि मुख्य म्हणजे, जे मिळाले आहे त्याबद्दल आपल्या आसपासचे नातेवाईक, मित्र, शिक्षक, आप्तस्वकीय, उर्वरित समाज आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता बाळगली तर समाधान मिळते. आपल्याला मिळालेल्या पगाराकडे किंवा नफ्याकडे पाहताना, ‘मला आपल्या पात्रतेपेक्षा जास्त मिळाले आहे, तेव्हा आपले समाजातील योगदान वाढवले पाहिजे,’ अशी भावना मनात आली तर आपोआपच समाधानी वाटते.
म्हणूनच ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपताना, सरत्या वर्षातील आर्थिक उलाढालीची आकडेमोड करताना आणि नव्या वर्षाचे नियोजन करताना एक एप्रिल हा ‘फूल्स’ डे न मानता तो आपले अर्थकारण अन् आयुष्याचा ताळमेळ जुळवणारा कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला पाहिजे. तसे झाले तर पुढचे वर्षभर आपल्या जगण्यातील समाधानाच्या, आनंदाच्या ठेवीवरचं व्याज सतत वाढत राहील. अशा नव्या, ‘अर्थ’पूर्ण वर्षासाठी सर्वांना शुभेच्छा!
(संपर्कः prasadmirasdar@gmail.com)



