माझ्या हिश्श्याचे किस्से: ‘अच्छा तो हम चलते हैं..’ ठरले पहिले संवाद गीत; असेच ‘चलते-चलते’ तयार झाले होते…

0
17
माझ्या हिश्श्याचे किस्से:  ‘अच्छा तो हम चलते हैं..’ ठरले पहिले संवाद गीत; असेच ‘चलते-चलते’ तयार झाले होते…


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक9 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

आनंद बक्षींनी लिहिलेल्या ‘अच्छा तो हम चलते हैं, फिर कब मिलोगे..’ या गाण्याच्या दृश्यात राजेश खन्ना आणि आशा पारेख.

मागच्या आठवड्यात मी आनंद बक्षी साहेबांविषयी केलेले लिखाण रविवारी स्वत:च वाचत होतो, तेव्हा बक्षी साहेबांशी माझी झालेली बातचीत, त्यांनी सांगितलेले किस्से आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे माझ्या मनात फेर धरु लागली. बक्षी साहेबांचेे व्यक्तिमत्त्व ज्यावर एक-दोन कॉलममध्ये लिहिता येईल, असे नक्कीच नाही. तरीही मी विचार केला की, त्यांच्यावर आणखी एक कॉलम लिहावा. आणि अशा गोष्टी सांगाव्यात, ज्या कदाचित बहुतांश लोकांना माहीत नसतील.

एका भेटीदरम्यान मी बक्षी साहेबांना विचारले की, तुम्हाला चित्रपटांची गाणी लिहिण्याची आवड कधीपासून लागली? तेव्हा ते म्हणाले की, मला लहानपणापासूनच चित्रपटांची खूप आवड होती. अनेक वेळा तर मी शाळेची पुस्तके विकून चित्रपट पाहिले. का ते माहीत नाही; पण मला लहानपणापासून वाटत होते की, मोठं झाल्यावर मी चित्रपटाची गाणी लिहीन किंवा गाईन. पुढं मी सैन्यात भरती झालो आणि पन्नासच्या दशकात मुंबईला आलो. खूप प्रयत्न करुन थकलो आणि आता इकडं परत कधीच यायचं नाही, अशा विचाराने परतलो. त्यानंतर पुन्हा सैन्यात भरती झालो, लग्न केले, मुलेही झाली. १९५६ मध्ये पुन्हा मुंबईला परत आलो, कारण मन ऐकायला तयार नव्हते. माझा चित्रपटाचा, गाण्याचा छंद मला मुंबईत येण्यासाठी भाग पाडत होता. मुंबईला आलो, प्रयत्न केला. पण, यावेळीही पुन्हा माझा धीर खचला. विचार केला की, आता मी परत निघून जायचं आणि पुन्हा कधीच यायचं नाही. माझ्याकडं खर्चापुरतेही पैसे नव्हते, म्हणून मी एका मित्राला सांगितले की, माझे परतीचे तिकीट काढून दे, मला परत जायचंय. माझ्यापेक्षा त्या मित्राचा माझ्यावर जास्त विश्वास होता. तो म्हणाला, मी तुला जाऊ देणार नाही. तुझ्यात खूप प्रतिभा आहे आणि तू मोठा गीतकार होशील, याची मला खात्री आहे. त्याने माझे सामान उचलले आणि मला त्याच्या घरी घेऊन गेला. त्याने मला त्याच्या घरी ठेवले. तो कामावर जायचा, तेव्हा मला काम मिळवण्यासाठी पैसेही देऊन जायचा. मी ६ वर्षे या मित्राच्या घरी राहिलो. त्याने मला साथ दिली नसती, तर आनंद बक्षी आज आनंद बक्षी नसता. खरी मैत्री ही अशी असते.

त्यानंतर बक्षी साहेबांनी सांगितले.. मी एकदा स्टुडिओत गेलो आणि योगायोगाने मला भगवानदादा भेटले. मी गाणी लिहितो, असे म्हणाल्यावर त्यांनी ‘आता लिहून दाखव’ असे मला सांगितले. मी लिहायला बसलो. भगवानदादांना ते आवडले. गाणी रेकॉर्ड झाली, चित्रपटही तयार झाला. पण, माझ्या करिअरला वेग आला नाही. कारण कोणतेही गाणे गाजले नाही आिण चित्रपटही चालला नाही. माझा स्ट्रगल सुरूच राहिला. बक्षी साहेब सांगत होते.. माझी सुनील दत्त यांच्याशी ओळख होती, म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी माझ्यासाठी राज कपूर यांच्या नावाने पत्र लिहून दिले आणि म्हणाले, ‘हे घेऊन जा, ते तुम्हाला नक्कीच काम देतील’. मी राज कपूर यांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे त्यांचे सेक्रेटरी हिरेन खेरा होते. मी त्यांना सर्व काही सांगितले. ते म्हणाले, राज कपूर तुम्हाला भेटतीलच आणि गाणी लिहिण्याची संधी मिळेलच, याची मी खात्री देऊ शकत नाही. पण, मी कधी निर्माता झालो, तर तुमच्याकडून गाणी नक्की लिहून घेईन. त्यांनी आपला शब्द पाळला. निर्माता झाल्यावर त्यांनी मला बोलावले आणि गाणी लिहायला सांगितली. चित्रपटाचे नाव होते, “मेहंदी लगी मेरे हाथ.’ त्याची गाणी अजिबात चालली नाहीत. या चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज प्रकाश होते. त्यांनी दुसरा चित्रपट बनवला, तेव्हा गाणी लिहिण्यासाठी मलाच बोलावले. त्यांच्या या दुसऱ्या चित्रपटाचे नाव होते ‘जब जब फूल खिले’. त्याचे संगीत, गाणी इतकी हिट झाली की, त्यानंतर मला कधीही मागे वळून बघावेे लागले नाही. या चित्रपटात मी एक गाणे लिहिले होते.. मैं यहाँ अजनबी हँू… ते मी खूप मनापासून लिहिले होते, कारण मी मुंबईत फिरायचो, तेव्हा माझ्या मनात नेहमी एकच विचार यायचा की, मी इथे अनोळखी आहे. पण, एक दिवस लोक मला ओळखतील. ती भावनाच गाण्यात उतरली होती.

चित्रपटगीतामध्ये आनंद बक्षींनीच पहिल्यांदा संवाद वापरल्याचे मी कुठेतरी ऐकले होते. जसे की.. ‘अच्छा तो हम चलते हैं, फिर कब मिलेंगे, जब तुम कहोगे..’ याविषयी विचारल्यावर बक्षीसाहेब मोठ्याने हसले आणि म्हणाले, हे खरे आहे. पण, मी हे गाणे तसा विचार करून लिहिलेे नव्हते. तेे कसे बनले, हेे मी तुम्हाला सांगतो. ‘आन मिलो सजना’ हा चित्रपट होता. मी, लक्ष्मीजी आणि प्यारेजी बसलो होतो. निर्माता-दिग्दर्शक मुकुल दत्तही तिथे होते. गाणं काही केल्या तयार होतं नव्हतं. आज गाणं तयार होत नाही, आपण नंतर बसू, असे म्हणत आम्ही निघण्यासाठी उठलो. मी म्हणालो, “अच्छा तो अब चलते हैं..’ त्यावर लक्ष्मीजींनी विचारले, “फिर कब मिलोगे?’ मी म्हणालो, ‘जब तुम कहोगे?’ ते म्हणाले, ‘जुमे रात को?’ अचानक माझ्या डोक्यात काही आलं. मी बोललो, एक मिनिट थांबा.. सगळे म्हणाले, “काय झालं?’ मी म्हणालो, ‘मुखडा तयार झाला, हाच मुखडा आहे, सगळे बसा.’ नंतर बक्षीसाहेब म्हणाले, ‘अच्छा तो हम चलते हैं, फिर कब मिलोगे, जब तुम कहोगे, जुमे रात को, हां हां आधी रात को। कहां, वहीं जहां कोई आता जाता नहीं।’ लक्ष्मीजींनी त्याला लगेच चाल लावली. अशाप्रकारे गाण्यात संवाद असलेले हे पहिले गाणे ठरले. त्यानंतर गाण्यात संवादाची प्रथाच पडली. यावरुन मला प्रसिद्ध शायर कौसर सिद्दीकी यांचे दोन शेर आठवताहेत…

नाम तेरा जो लिखा काग़ज़ पर,

प्यार का फूल खिला काग़ज़ पर,

जौहरी खुद ही खिंचे आएंगे,

अपने जौहर तू दिखा काग़ज़ पर।

बक्षीसाहेब हे अशा गीतकारांपैकी एक आहेत, ज्यांनी संगीत विश्वातील पिता-पुत्रांसोबत काम केले. त्यांनी कल्याणजी-आनंदजींप्रमाणे आणि विजू शाह यांच्यासोबतही काम केले. रोशन यांच्याप्रमाणे राजेश रोशन यांच्यासोबतही काम केले. एस. डी. बर्मन यांच्याप्रमाणेच आर. डी. बर्मन यांच्यासोबतही काम केले. चित्रगुप्त यांच्याप्रमाणे त्यांचे पुत्र आनंद मिलिंद यांच्यासोबतही काम केले. बक्षीसाहेबांनी नेहमीच आपल्या नावावर एक विक्रम केला. आम्ही चित्रपट बनवतो, संगीत संयोजन करतो. पण, आजही सर्व दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शकांना बक्षीसाहेबांची उणीव जा‌णवते. गेल्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितले की, त्यांनी हॉस्पिटलमधून लिहिलेले शेवटचे गाणे माझ्या “हम किसी से कम नहीं’ चित्रपटासाठी होते आणि त्यांचा शेवटचा प्रदर्शित झालेला ‘मेहबूबा’ हा चित्रपटही माझाच होता. बक्षीसाहेबांची सगळी हिट गाणी तुम्ही ऐकली असतीलच, पण आज त्यांच्या आठवणीत “आन मिलो सजना’मधील हे संवाद असलेले हे गाणे ऐका…

अच्छा तो हम चलते हैं,

फिर कब मिलोगे,

जब तुम कहोगे…

स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.



Source link